

India US trade deal impact analysis
sakal
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-अमेरिकेदरम्यानच्या बहुप्रतीक्षित व्यापार कराराची एकतर्फी घोषणा करून त्याविषयीची उत्कंठा संपुष्टात आणली आहे. वर्षभरापासून खोळंबलेला हा करार जेवढा भारतासाठी महत्त्वाचा होता, तेवढीच त्याची अमेरिकेलाही गरज होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्यात सोमवारी दूरध्वनीवरून संवाद झाल्यानंतर तो मार्गी लागला. ट्रम्प यांच्या घोषणेला प्रतिसाद देताना पंतप्रधान मोदी यांनी ‘धन्यवाद’ म्हटले असले, तरी त्यातून कोणाचा किती आणि काय फायदा होणार याविषयी २४ तास उलटून गेले तरीही तपशील समोर आलेला नाही. गेल्या नऊ एप्रिल रोजी ट्रम्प यांनी भारतासह जगातील अनेक देशांवर २५ टक्के आयात शुल्क लादले होते. चार महिन्यांनंतर रशियाकडून स्वस्त खनिज तेल खरेदी करून युक्रेनविरुद्ध चार वर्षांपासून युद्ध करत असलेल्या रशियाचे अप्रत्यक्षपणे वित्तपोषण करीत असल्याचा आरोप करीत ट्रम्प यांनी ऑगस्ट महिन्यात भारतावर २५ टक्के अतिरिक्त असे एकूण ५० टक्के आयात शुल्क लावून गेल्या सात महिन्यांपासून भारताची व्यापार कोंडी केली होती. त्यामुळे आधीच चीन, बांगलादेश, व्हिएतनाम, कंबोडिया, थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया यासारख्या देशांशी स्पर्धा करावी लागत असलेल्या भारताची अमेरिकेला निर्यात करताना गेल्या वर्षभरात पुरती दमछाक झाली होती.