
कागदी पतंगांचा वावर आभाळात सुरु झाला की, मकर संक्रांती जवळ आली असे समजावे. या काळात ‘कैपोऽचेऽऽ’ च्या आरोळ्यांनी गुजरात-काठियावाडचे आभाळ दुमदुमू लागते, तर उत्तरेत पतंगांचे विहरणे बराच काळ सुरु असते. तिथे तर भाद्रपदात राखीपौर्णिमेच्या सुमारास पतंग उडवण्यालाही बहर आलेला असतो. रामायणाच्या बालकांडातही पतंग उडवण्याचा उल्लेख आहे. ‘राम इक दिन चंग उडाई, इंद्रलोक में पहुंची जाई’ अशा कौतुकाच्या पंक्तीच आहेत. महाराष्ट्रात आणि विशेषतः नाशिक जिल्ह्यात मकर संक्रांतीच्या आसपास पतंगबाजीच्या स्पर्धा आटोकाट खेळल्या जातात. गच्ची किंवा मोकळ्या मैदानात पतंग बदवणारा एखादा वीर आणि त्याच्या पाठीशी मांजाची फिरकी धरुन अधीरतेने आपल्या पतंगाकडे बघणारा त्याचा पठ्ठ्या, यांची चढाओढ अन्य पतंगवीरांशी लागलेली असते.