
नव्या वर्षाचा नवा सूर्य उगवतीला येऊन उभा राहिलेला असताना ‘कधी उजाडेल?’ हा प्रश्न फिजूल वाटेल. कारण याचे उत्तर पूर्वेचे क्षितिज देतच असते. परंतु, हे उजाडणे सृष्टीसंमत झाले. प्रश्न पडला आहे तो भवतालात दाटलेल्या काळोखाचा. नव्या वर्षात नवी मांडणी करुन नवा डाव रचू पाहणाऱ्या महायुतीच्या सरकारसमोर सरत्या वर्षात संकट उभे राहिले. पहिल्याच घासाला खडा लागावा, आणि दातातून कळ उमटावी, असा प्रकार बीडमधील मस्साजोग गावात घडला. तेथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर संशयाचा सारा रोख जिल्ह्यातल्या तालेवार नेत्यांकडे वळला.