
प्रस्थापित व्यवस्था बदलण्याची घोषणा करुन लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार होता येते; पण ती क्षणिक ठरणार असेल तर मात्र लोकप्रियतेच्या भरतीचे ओहोटीमध्ये रुपांतर व्हायलाही वेळ लागत नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांंच्या बाबतीत नेमके हे घडत आहे. प्रस्थापित घडी विस्कटून जागतिक व्यापाराची नवी रचना करु पाहणारे ट्रम्प यांचे मनसुबे फोल ठरताहेत. अमेरिकेतील ‘आंतरराष्ट्रीय व्यापार न्यायालया’ने मनमानी धोरणांबद्दल त्यांना फटकारले आहे. अधिकारकक्षेबाहेर जाऊन त्यांनी विविध देशांवर आयातशुल्क लादल्याचा ठपका न्यायालयाने ठेवला आहे. अमेरिकेच्या घटनेनुसार परदेशी व्यापार नियंत्रणाचा अधिकार केवळ अमेरिकी काँग्रेसला असून तो अध्यक्षांना असलेल्या आपत्कालिन आर्थिक अधिकारांमुळे बाधित होत नाही, असा निकाल देत ट्रम्प यांनी लादलेली बहुतांश आयातशुल्क न्यायालयाने रोखली आहेत. ट्रम्प प्रशासनाने निकालाला आव्हान दिल्याने आयातशुल्कावरुन आंतरराष्ट्रीय व्यापारात होणारी उलथापालथ सुरू राहील.