
"Analyzing Pakistan’s political and military leadership to understand strategic decision-making."
Sakal
राष्ट्रहिताच्या नजरेतून, - शेखर गुप्ता
मध्यभागी डोनाल्ड ट्रम्प, त्याच्या उजव्या हाताला शाहबाज शरीफ आणि पाकिस्तानचे सैन्यप्रमुख मुनीर हे त्यांच्या डाव्या बाजूला असे एक छायाचित्र नुकतेच आपल्याला पाहायला मिळाले आहे. भारताच्या दृष्टीने पाहायचे झाल्यास यातून स्पष्ट होणारे भूराजकीय समीकरण आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. मला हे छायाचित्र पाहिल्यानंतर १९५०मधील नर्गीस आणि दिलीपकुमार यांच्यावर चित्रित झालेले एक गाणे गुणगुणायची खूप इच्छा होत आहे; दुनिया बदल गई, मेरी दुनिया बदल गई.... पण मी असे करणार नाही. याचे कारण ही रचना गुणगुणायला लागल्यावर मनात खेदाची भावना निर्माण करेल एवढ्यापुरतेच मर्यादित नसून; भूराजकीय समीकरणे आणि त्यातही भारत आणि अमेरिका या दोन सामर्थ्यसंपन्न देशांच्या संबंधांचे अवलोकन करताना ते बॉलिवूडमधल्या कथानकातील प्रेमाच्या त्रिकोणापेक्षाही गुंतागुंतीचे आहेत. त्यामुळे एवढ्या एकाच गोष्टीने खेद वाटून घेण्यात अर्थ नाही, कारण याला अनेक आयाम आहेत. पहिला म्हणजे अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातील औपचारिक द्विपक्षीय संबंध हे भारताशी असलेल्या संबंधांपेक्षा अधिक जुने आणि अधिक घट्ट आहेत. अमेरिकेने अबोटाबादमध्ये ओसामा बिन लादेनचा शोध घेऊन त्याचा खातमा केल्यानंतर या दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला असला तरी त्यांच्यातील नैसर्गिक नाते मात्र टिकून राहिले.