
महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करून एकच खळबळ
आघाडीधर्माला छेद
ए खादी राजकीय आघाडी जेव्हा स्थापन होते, तेव्हा त्यातील घटकपक्षांचे वर्तन हे आघाडीधर्माशी सुसंगत असावे लागते. याचे कारण आघाडी ही जागावाटप समझोत्याच्या पलीकडची आणि तुलनेने अधिक टिकाऊ स्वरुपाची व्यवस्था असते.
पण हे लक्षात न घेता उक्ती-कृती केली, तर त्याचे परिणाम विपरीत होऊ शकतात. या वास्तवाची आठवण करून देण्याची वेळ आली ती महाविकास आघाडीतील अलीकडच्या काही घटनांमुळे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘वंचित बहुजन आघाडी’शी हातमिळवणी करून जेमतेम आठवडा उलटायच्या आतच त्या आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आपली वेगळी रेघ दाखवून देण्याचा खटाटोप सुरू केला.
त्यांनी महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करून एकच खळबळ उडवून दिली. शिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार सीबीआय तसेच ईडी या तपास यंत्रणांच्या करीत असलेल्या वापराचेही त्यांनी समर्थन केले आहे.
अशा वक्तव्यांमुळे आपण नव्याने मैत्री केलेल्या उद्धव ठाकरे यांचीच पंचाईत होऊ शकते, एवढेही भान त्यांना उरले नसेल, असे म्हणता येणे कठीण आहे. प्रकाश आंबेडकर राजकारणात मुरलेले आहेत.
त्यांना निवडणुकांमध्ये मोठे यश मिळालेले नसले तरीही त्यांच्या मतांची टक्केवारी ही त्या त्या मतदारसंघातील निवडणुकांचा निकाल फिरवण्यास पुरेशी असते, असे गेल्या दोन-अडीच दशकांत सातत्याने दिसून आले आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीतही वरळी तसेच पूर्व मुंबईत त्यांना बऱ्यापैकी मते मिळाली होती आणि उद्धव ठाकरे यांनी त्या मतांवर डोळा ठेवूनच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत त्यांना सोबत घेतले असणार हे उघड आहे. तसे त्यांनी करायला कोणी आक्षेप घेण्याचे कारण नाही. परंतु याबाबत महाविकास आघाडीतील अन्य नेत्यांशी चर्चा करायला हवी, याचा त्यांना कसा विसर पडला, हे समजू शकत नाही.
उद्धव ठाकरे यांची शिवसेना हा ‘महाविकास आघाडी’तील एक प्रमुख घटक आहे, याकडे प्रकाश आंबेडकर यांनीही दुर्लक्ष केलेले दिसते. त्यांनी आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात सूर लावला. ते वादग्रस्त वक्तव्यांबाबत प्रसिद्ध असले, तरी आता शिवसेनेशी हातमिळवणी करून ‘शिवशक्ती-भीमशक्ती’च्या गर्जना केल्यानंतर त्यांनी किमान शिवसेनेचे अन्य मित्रपक्षांशी असलेले संबंध विचारात घेणे अपेक्षित होते.
प्रत्यक्षात त्यांनी या गर्जनेनंतर दोन-चार दिवसांतच त्यांनी थेट शरद पवार यांना टीकेचे लक्ष्य केले. ‘पवार हे भारतीय जनता पक्षाचेच आहेत!’ या त्यांच्या विधानानंतर गदारोळ उठणे, साहजिक होते. पवार यांच्या काही शिलेदारांनी प्रकाश आंबेडकर यांना ‘रोखठोक’ उत्तरे दिली. मात्र, खुद्द पवार यांनी आंबेडकर यांच्याबाबत काहीही बोलणे टाळून, उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात काय चालले आहे, त्याची आपणास कल्पना नाही, असे विधान केले.
याचा अर्थ ‘वंचित’बरोबर आघाडी करण्याआधी त्याची कल्पना ठाकरे यांनी ‘महाविकास आघाडी’तील अन्य मित्रांना दिली नव्हती, असाच होतो. ही सारी वक्तव्ये भाजपविरोधी फळीत सारेच काही ‘आलबेल’ नाही, असे दाखवून देत आहेत.
विविध पक्षांची आघाडी होते, तेव्हा त्यांचे सारेच आचार-विचार सारखेच असतात, असे गृहीत धरण्याचे काहीच कारण नसते. विचार वेगवेगळे असल्यामुळेच हे विविध पक्ष स्थापन झालेले असतात. मात्र, जेव्हा हे पक्ष आघाडी करू इच्छितात, तेव्हा सर्वसाधारणपणे समान मुद्यांवरच चर्चा होत असते.
किमान समान कार्यक्रमावर भर देणे आणि एकमेकांची उणीदुणी काढण्याचे टाळणे हा ‘आघाडीधर्म’ असतो. प्रकाश आंबेडकर आता उद्धव यांच्या ‘महाविकास आघाडी’तील मित्रांना लक्ष्य करून नेमका त्यालाच छेद देऊ पाहत आहेत. उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेतले ते मुंबई महापालिकेची निवडणूक ही त्यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई असल्यामुळेच; आणि आंबेडकर यांनी ही आघाडी केली ती ‘वंचित’ला मुंबईत विस्तारता यावे म्हणून.
पण ‘यासंबंधात आपल्याला काहीच कल्पना नव्हती’, असे पवार यांनी सांगितल्यामुळे ठाकरे यांनी पवार यांना अंधारात ठेवूनच हा नवा घरोबा केल्याचे दिसत आहे. ‘आम्हाला उद्धव ठाकरे यांच्या या आघाडीबाबत माध्यमांतूनच समजले,’ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही सांगितले आहे. मात्र, उद्धव यांची ही नवी सोयरिक फार पुढचा म्हणजे लोकसभा वा विधानसभा निवडणुका ध्यानात घेऊन केलेली दिसत नाही.
त्यावेळच्या जागावाटपाचे प्रश्न आणखी तीव्र असणार आहेत. मात्र, आता खरा प्रश्न या नव्या सोबत्याला साथीस घेऊन, उद्धव ठाकरे हे पुढचे राजकारण कसे करणार हा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला ‘महाविकास आघाडी’ टिकवण्यात रस असल्याचे त्या पक्षाच्या गेल्या आठवड्यातील बैठकीत स्पष्ट झाले.
‘आपण स्वत: जयंत पाटील यांच्या समवेत उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा करू,’ या अजित पवार यांच्या वक्तव्यामुळे तशी चिन्हे दिसत आहेत. मात्र, ‘राष्ट्रवादी’च्या या बैठकीनंतरही आंबेडकर यांची वादग्रस्त वक्तव्ये सुरू आहेत. त्यामुळे त्यांच्या हेतूंविषयी शंका घ्यायला जागा निर्माण झाली आहे.
प्रकाश आंबेडकर यांना खरोखरच भाजपविरोधात उभे राहायचे असेल तर त्यांनी आपल्या जिभेला लगाम घालायला लागेल आणि तसे त्यांना सांगण्याचे काम उद्धव ठाकरे यांनाच करावे लागेल. त्यामुळे या तारेवरच्या कसरतीतून उद्धव ठाकरे यांनीच काही मार्ग काढला नाही, तर महाविकास आघाडीला तडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
केक अशा रीतीने कापला पाहिजे, की प्रत्येकाला वाटेल, आपल्यालाच जास्त भाग मिळाला. यालाच म्हणतात तडजोडीची कला.
- एरिक एर्हार्ड, प.जर्मनीचे माजी चॅन्सलर