पाहुण्यांच्या सरबराईत यजमान महाराष्ट्र तसूभरदेखील कमी पडला नाही, याचा खरे तर सर्वांनाच अभिमान वाटायला हवा. पण म्हणतात ना, भलाईची दुनियाच राहिली नाही.
‘यूं सजा चांद के झलका, तेरे अंदाज का रंग…’ ही गुलाम अली आणि आशा भोसले यांच्या स्वर्गीय सुरातली गजल गुणगुणत विधिमंडळाच्या आवारातून काही महानुभाव बुधवारी आपापल्या घरी परतले असतील, तेव्हा त्यांच्या मुखात त्रयोदशगुणी विडा आणि पोटात तृप्तीचा ढेकर असणार. हे महानुभाव देशभरातील सरकारांना काटकसरीचे धडे देणाऱ्या अंदाज समित्यांचे मान्यवर सदस्य होते.