आहे ‘मनोरथ’ तरीही... (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 एप्रिल 2017

निवडणूक जिंकण्याच्या रणनीतीप्रमाणेच देशात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याच्या रणनीतीवर, त्यासाठीचा वैचारिक आराखडा तयार करण्यावर भाजपला भर द्यावा लागेल. 

भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांचा सारा भर पुढील निवडणुका जिंकण्याची तयारी करण्यावर असल्याचे दिसते. ज्या राज्यांमध्ये पक्षाची स्थिती फारशी मजबूत नाही, तेथेही पक्षसंघटनेने आपला पाया निर्माण करावा-विस्तारावा, अशी रणनीती आखली जात आहे आणि भुवनेश्‍वरला बैठक आयोजित करणे हादेखील तशाच डावपेचाचा भाग होता. उत्तर प्रदेशातील मोठ्या विजयानंतर पक्षाध्यक्ष आणि त्यांच्या टीमचे बाहू फुरफुरू लागणे स्वाभाविक आहे. ज्या राज्यांमध्ये प्रबळ प्रादेशिक पक्ष आहेत, तेथेही भाजपला स्थान मिळवायचे आहे. ओडिशात बिजू जनता दलाच्या नवीन पटनाईक यांनी सलग चार वेळा मुख्यमंत्रिपद भोगले आहे आणि तेथे प्रस्थापितांविरोधी जनभावना निर्माण झाली तर तिचा फायदा घेण्यासाठी काँग्रेसला मागे टाकून भाजपला पुढे येता येईल, असा पक्षनेत्यांचा होरा आहे. या राज्यात अलीकडेच झालेल्या पंचायत समित्यांच्या निवडणुकांत काँग्रेसला मागे टाकून दुसरे स्थान मिळविण्यात पक्षाला यश आल्याने त्यांच्या आकांक्षा उंचावल्या असणार. ‘उत्तम रणनीतिकार’ असा उल्लेख करून मोदींनी अमित शहा यांचा जो गौरव केला आणि पंचायतींपासून पार्लमेंटपर्यंत शत-प्रतिशत भाजपचा शहा यांनी जो नारा दिला, तो या सगळ्याशी सुसंगतच होता; परंतु सुजाण नेतृत्व तेच असते जे पराभवाच्या काळात जसे कठोर आत्मपरीक्षण करते, तसे यशाच्या-विजयाच्या काळातही सतत स्वतःला तपासत राहते. आपली मर्मस्थाने कोणती, कच्चे दुवे कोणते, याचीही धीटपणे चर्चा करते. तशा खुल्या चर्चेला पक्षात स्थान दिले जाईल,असे वातावरण निर्माण केले जाते. या दृष्टीने पाहिले तर भुवनेश्‍वरच्या कार्यकारिणीचे चित्र काय दिसते?

 ‘माईक समोर दिसला म्हणून बेतालपणे बडबडण्याची गरज नाही,’ अशा कानपिचक्‍या मोदींनी पक्षातील काहींना दिल्या खऱ्या; पण त्यापलीकडे पक्षाच्या सध्याच्या वाटचालीपुढे कोणी आरसा धरला, असे दिसले नाही. संघटना, नेतृत्वाभोवतीचे वलय आणि वैचारिकता हे पक्षाच्या वाढीचे तीन महत्त्वाचे घटक विचारात घेतले तर पहिल्या दोन गोष्टी भाजपकडे आज आहेत, हे पक्षाचे विरोधकही अमान्य करू शकणार नाहीत; परंतु पक्षाचे तत्त्वज्ञान वा वैचारिक भूमिकेत स्पष्टता असायला हवी. संख्यात्मक वाढ होत असताना तत्त्वज्ञान पक्षाला होकायंत्रासारखे उपयोगी पडते. परंतु, आज त्याचा अभाव दिसत असल्याने ‘मोदीब्रॅंड’वर मिळत असलेल्या जनादेशांचा अन्वयार्थ पक्षातील आणि परिवारातील अनेक घटक आपापल्या सोईनुसार लावताहेत. कायदा हातात घेण्यापर्यंत काहींची मजल गेली आहे. काँग्रेसचा सेक्‍युलॅरिझम हा ‘स्यूडो सेक्‍युलॅरिझम’ अशी घणाघाती टीका भाजप करीत असे; पण मग पक्षावर जबाबदारी येऊन पडते ती खरी धर्मनिरपेक्षता स्पष्ट करण्याची. त्यावर आधारित कार्यक्रम तयार करण्याची. अशी स्पष्टता असती तर गोरक्षणाची हाळी देऊन मनमानी करणाऱ्यांना केव्हाच खडसावता आले असते. त्यासाठीची पृष्ठभूमी तयार झाली असती. ‘ट्रिपल तलाक’विषयी मोदींनी मांडलेली भूमिका रास्त आहे; परंतु तिच्यामागे खऱ्याखुऱ्या धर्मनिरपेक्ष विचारांचे पाठबळ उभे करावे लागेल. त्याविषयी खुल्या चर्चेला नेते उत्सुक असल्याचे दिसत नाही. 

पराभवाचे जसे काही साइड इफेक्‍ट असतात, तसे विजयाचेही असतात. भारतीय जनता पक्षाला सध्या ते भेडसावत असून, त्यामुळेच उत्साहाचे रूपांतर उन्मादात होऊ नये, असे आवाहन करण्याची वेळ पंतप्रधानांवर आली आहे. पण वैचारिक स्पष्टतेचा हा दोष केवळ धर्मनिरपेक्षतेच्या विचारांपुरता मर्यादित आहे, असेही नाही. ज्या विकासाच्या मुद्द्यावर भर देत मोदी २०१४ मध्ये पंतप्रधानपदी आरूढ झाले, त्या मुद्द्याबाबतही सखोल आणि प्रांजळ मीमांसा व्हायला हवी. त्यातील आव्हानांबाबत लोकांना विश्‍वासात घ्यायला हवे. आर्थिक सुधारणा कार्यक्रमाची गरज मोदी सरकारला मनापासून पटली असेल, तर त्याचाही ‘रोडमॅप’ लोकांसमोर ठेवायला हवा. येत्या २६ मे रोजी मोदी सरकार तीन वर्षे पूर्ण करणार आहे. तोपावेतो असा धांडोळा घेणे हे आवश्‍यकही आहे. पण कधी विकास, कधी हिंदुत्व; कधी आर्थिक सुधारणांची भाषा, तर कधी सरकारचा हस्तक्षेप वाढवीत नेण्याची कृती असे संभ्रमात टाकणारे चित्र सध्या उभे राहताना दिसते. मोदींकडून फार मोठ्या जनसमूहाला प्रचंड अपेक्षा आहेत; परंतु त्यांना पुरे पडणे ही गोष्ट देशापुढचे गुंतागुंतीचे प्रश्‍न लक्षात घेता सहजसाध्य नाही. याही दृष्टीने भाजपला निवडणूक जिंकण्याच्या रणनीतीप्रमाणेच देशात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याची रणनीतीही तेवढ्याच कसोशीने आखावी लागेल. तशी ती आखण्यासाठी ‘नेता बोले, दल डोले’, असे वातावरण कधीच उपयोगी पडत नाही. हवी असते, ती खुल्या विचारमंथनाची संस्कृती. पण विजयाच्या जल्लोषात हे कटू वास्तव ऐकायची पक्षातील कोणाची तयारी आहे काय? ती असेल तरच ओडिशातील पक्षाच्या मनोरथांना व्यापक अर्थ लाभेल आणि नवभारताच्या घोषणांना आशय प्राप्त होईल.

Web Title: Editorial on bjp