आगांतुक अनुवादक! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

अंग झेजरून निघाले आहे ! पाठीस पलिस्तर मारले आहे !! डावा डोळा पूर्णत: मिटून ‘प्रिया प्रकाश वारियरा’वस्थेत गेला आहे !! आमची ही अवस्था मराठी भाषा दिनाच्या आदले दिवशी झाली, हे सांगताना आम्हाला मराठीत भयंकर सॉरी वाटत आहे. ह्याच कारणास्तव आम्ही औंदाच्या मराठी भाषा दिनी ‘याभये अव्हासी भाग्य ओलतो अराठी’ हे गीत जखमी अवस्थेत म्हणावे लागले. (खुलासा : संपूर्ण हनुवटीखालुनु मस्तकावरुनु ब्यांडेजपट्‌टी बांधुनु सदर काव्यओळी म्हटल्यास अशाच उमटतात. जिज्ञासूंनी तपासून पाहावे!)

वास्तविक आम्ही मराठी भाषेचे प्राचीन पुरस्कर्ते आहो. मातृभाषेवरील प्रेमाखातर आम्ही इंग्रजीचा पेपरही शुद्ध मराठीत लिहिल्यामुळे सातव्या यत्तेनंतरच आम्हाला शिक्षणाचे वाढप बंद करण्यात आले. पण आम्ही डगमगलो नाही. इंग्रजी पर्वडणार नाही, हे वळखून आम्ही फार लहान उमरीतच ‘देशी’चे व्रत स्वीकारले होते, हा आमच्या क्रांतिकार्याचा आणखी एक पैलू आहे. परंतु तो आजचा विषय नव्हे ! सारांश, जीवनाशी दोन हात करत आम्ही असंख्य ठिकाणी नोकऱ्या मिळवण्याचा यत्न केला. काहीच उपाय चालेना, म्हटल्यावर आम्ही शेवटी पत्रकार झालो !!

पत्रकार म्हणून आमची कारकीर्द तशी आपल्यासमोर आहेच. मराठी भाषेतील एक आघाडीचे साहित्यिक आणि पत्रकारितेच्या गळ्यातील टाइट... आपले सॉरी... ताईत म्हणून आमची सर्वदूर वळख निर्माण झाली, ती आमच्या माय मराठी भाषेमुळेच. याखातर आम्ही माय मराठीला अंत:करणापासून आम्ही थॅंक्‍यू व्हेरी मच असे म्हणतो. मराठी भाषेवरील आमच्या प्रभुत्वाबद्दल आम्हीच काय बोलावे? सबब, राज्यपालांच्या अभिभाषणाचा अनुवाद करण्यास सध्या कोणीही उपलब्ध नसल्याने आपण यावे, अशी गळ आम्हांस घालण्यात आल्याने आम्ही केवळ मराठी भाषेची सेवा करण्याची संधी मिळेल, ह्या हेतूने हो म्हणून बसलो. तथापि, हे भाषण सोमवारी भल्या सकाळी असल्याचे आम्हाला उशिरा कळले. उशिरा म्हंजे सोमवारी सकाळी उशीर झाल्यानंतरच कळाले !!

अभिभाषणाचा अनुवादक वेळेत न आल्याने आरडाओरड झाली. ती संधी साधून एका आगांतुक अनुवादकाने आमच्या गैरहजेरीत अनुवादकाच्या खोलीचा ताबा घेऊन सुघड, सुबोध आणि सुलभ असा अनुवाद करण्यास प्रारंभ केला. आम्ही पोचलो तरी त्यांनी माइकचा ताबा सोडला नाही. हे आमच्या अधिकारावरचे अतिक्रमणच होते. शिवाय मराठी माणसावर अन्यायदेखील होताच. साहजिकच आमचा पारा चढला. पारा चढला की आम्ही हिंदीत बोलू लागतो. ‘‘धिस इज टू मच...ऐसा नहीं करनेका...अब्बी के अब्बी निकलो यहांसे!’’ आम्ही डरकाळलो.

‘‘तोंड सांभाळून बोल रे..! एकतर लेट येतोस आणि आम्हाला *** * *** *!!!’’ आगांतुक अनुवादकाने आम्हाला उगीचच प्रतिकार केला. परिणामी, आम्ही थोडीफार शाब्दिक झटापट केली. आगांतुक अनुवादक आणि आम्ही ह्यांच्यातील ही झटापट नेमकी कानात तेल ओतून अनुवाद ऐकण्याची खटपट करणाऱ्या राष्ट्रवादी धनाजीराव मुंडेजी ह्यांनी ऐकली. आमच्या शाब्दिक झटापटीत काही हिंदी शब्दही आले होते. त्यातील काही शब्द त्यांना गुजराथी वाटले!! (हिंदीतील काही शेलके शब्द गुजराथीच्या जवळ जाणारे आहेत. जिज्ञासूंनी तपासून पाहावेत! असो!!) परिणामी, विरोधकांनी गदारोळ करून शिमगा तीन दिवसावर आल्याची जाणीव करून दिली. अखेरीस आम्ही महत्प्रयत्नांनंतरही आगांतुक अनुवादकास रोखण्यात अपयशी ठरून पराभूत अवस्थेत तेथून निघालो.

...कसे होणार माय मराठीचे? ह्या विवंचनेत आम्ही विधिमंडळाच्या आसपास हिंडत असताना ते घडले ! पाठोपाठ आलेल्या त्या आगांतुक अनुवादकाने गचांडी पकडून आम्हाला मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला (उरलेली) चिक्‍कार हिंदी व गुजराथी भाषा शिकविली. आम्ही ती निमूटपणाने शिकून घेतली. ते (व आमचे व्यक्‍तिमत्त्व) पाहून रेल्वे स्थानकातील प्रवाशांना आम्ही पाकिटमार असल्याचे वाटले आणि...तूर्त ही अवस्था प्राप्त झाली आहे. जायबंदी आणि घायाळ! ...आमच्या माय मराठीसारखीच !!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com