वाघ वाचवा! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
शुक्रवार, 9 मार्च 2018

स्थळ : ताडोबा अभयारण्य.
वेळ : सकाळची.
प्रसंग : न्याहारीचा.
पात्रे : मिस्टर अँड मिसेस वाघ.

स्थळ : ताडोबा अभयारण्य.
वेळ : सकाळची.
प्रसंग : न्याहारीचा.
पात्रे : मिस्टर अँड मिसेस वाघ.

मिस्टर वाघ : (पडेल आवाजात) ऐकलंत का?
मिसेस वाघ : (पंजाने वारत) छुत छुत...!
मि. वाघ : (आणखी पडेल आवाजात) अहो, मी काय बोका आहे का, छुत छुत करायला? नऊ वाजून गेले, चहा नाही झाला अजून !!
मिसेस वाघ : (पेपर वाचता वाचता) तुम्हीच ठेवा आज चहा !
मि. वाघ : (हबकून) मी?
मिसेस वाघ : (फणकाऱ्यानं) आज महिला दिन आहे म्हटलं ! मेला, आज तरी आयता कपभर चहा मिळू दे आम्हाला !!
मि. वाघ : (अजीजीनं) चहाशिवाय हातपाय चालत नाहीत हो आमचे !! पहिला तुम्हीच करा, दुसरा हवंतर मी ठेवतो !!
मिसेस वाघ : (निष्ठूरपणे)..नाऽऽही ! मी तर म्हणते ब्रेकफास्टचीही तयारी करून ठेवा !!
मि. वाघ : (शरणागती पत्करत) मला आमलेट चालेल !!
मिसेस वाघ : (पेपर आपटत) एखादा जातिवंत वाघ असता तर छान ससाबिसा मारून आणला असता ! अंडी खातायत, अंडी !! सदोदित मेलं ते लक्ष वनरक्षकांच्या डब्याकडे !! ते येऊन गवत कापत बसले की तुम्ही टिफिन पळवून आणणार ! तेवढीच मर्दुमकी उरलीये का तुमच्यात?
मि. वाघ : (खोल आवाजात) अहो, किती टाकून बोलाल !! हल्ली शिकार मिळणं किती दुरापास्त झालंय नोटाबंदीनंतर ! फुकट येते का शिकार? काळविटावर तर अठ्ठावीस टक्‍के जीएसटी लागलाय ! पेपर वाचता ना तुम्ही?
मिसेस वाघ : (पेपरकडे पाहून नाक मुरडत) आहे काय त्या पेपरात? हु:!!
मि. वाघ : (चेवात येत) महाराष्ट्रातल्या चिमूर जिल्ह्यात अठ्ठेचाळीस तासांत सात वाघ जिवानिशी मेलेत !! वाचा बातमी पेपरात !!
मिसेस वाघ : (आश्‍चर्यानं) माय गॉड ! मी कशी नाही वाचली बातमी? सात वाघ मेले?
मि. वाघ : (डोळे मिटून) आजारीच होते...पण  गेले हे खरं !
मिसेस वाघ : (चिंतातुर सुरात) आपल्या त्या तमकीचा बछडा होता नं चिमूर डिव्हिजनमध्ये? त्याचं तर नाही ना बरंवाईट काही झालं?
मि. वाघ : (सुस्कारा सोडत) आपण हयात आहोत हे काय कमी आहे? दिवस बरे नाहीत एवढं मात्र खरं ! तसं काळजीचं कारण नाही म्हणा !! आपल्या मुनगंटीवारसाहेबांनी चौकशीचे आदेश दिलेच आहेत ! दोन दिवसांत अहवाल येतोय म्हणे ! बघू या, काय होतं ते !!
मिसेस वाघ : (आणखी काळजीत पडून) आणि आपल्या मुंबईच्या वाघांचं काय?
मि. वाघ : (त्रयस्थ सुरात) त्यांचं काय? बोरिवलीचे बिबटे मजेत आहेत ! खायला प्यायला भरपूर !! हॅम, पोर्क, हॉट डॉग काय म्हणशील ते हजर आहे त्यांना !! डुकरं, कुत्री मारून खातायत लेकाचे !!
मिसेस वाघ : इश्‍श... त्या बिबट्यांचं काय सांगताय? भुरटी मांजरं आहेत ती !! मुंबईचे खरेखुरे वाघ म्हणतेय मी...ते...ते...बांदऱ्याचे !!
मि. वाघ : त्यांचं बरं चाललंय की वाईट हेच अजून ठरत नाहीए !! पण ‘आम्ही त्यांच्याकडे लक्ष ठेवून आहो,’ असं मुनगंटीवारसाहेबांनी सांगितलंय !
मिसेस वाघ : लक्ष ठेवून आहो, म्हंजे काय? हे काय बोलणं झालं?
मि. वाघ : (दोन्ही पंजे डोक्‍यामागे टाकत) मुंबई हे वाघांचं सर्वांत मोठं अभयारण्य आहे बाईसाहेब ! तिथल्या वाघांना काहीही प्रॉब्लेम नाही ! विदर्भातल्याच वाघांची अवस्था शेतकऱ्यांसारखी झाली आहे !!
मिसेस वाघ : (शेपूट वेळावत) मी काय म्हणते... नाहीतरी तुम्ही शिकारबिकार सोडलीच आहे ! नुसत्याच डरकाळ्या मारत बसता ! ...आपण मुंबईतच स्थलांतर करूया का? चार घास बरे पोटात जातील तरी !!
काय?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial dhing tang british nandi article