ईव्हीएम पुराण ! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
गुरुवार, 31 मे 2018

मित्रांनो, आपला भारत हा एक लोकशाही देश आहे. लोकशाही म्हंजे लोकांनी लोकांसाठी चालविलेली लोकांची शाही ! लोकशाही ही एक यंत्रणा असते. याचा अर्थ ती यंत्रावर अवलंबून असते. त्यांना ईव्हीएम यंत्रे असे म्हणतात. ईव्हीएम यंत्राचा शोध खूप वर्षांपूर्वी भारतातच कोणीतरी लावला. त्याच्या जनकाचे नाव मतदानासारखेच गुप्त ठेवण्यात आले आहे. केशकर्तनालयात काणामागूण लाइण मारणाऱ्या ‘मशिनी’चा शोध कोणी लावला? हे जसे कोणालाही माहीत नसते, तसेच ईव्हीएमचा जनक कोण, हेही कोणाला ठाऊक नसते. सदर ईव्हीएम यंत्र निर्माण करणारा शास्त्रज्ञ (मारहाण होईल, ह्या भीतीने) कायम गुप्त नावाने बेनामी आयुष्य जगतो, असे सांगितले जाते.

मित्रांनो, आपला भारत हा एक लोकशाही देश आहे. लोकशाही म्हंजे लोकांनी लोकांसाठी चालविलेली लोकांची शाही ! लोकशाही ही एक यंत्रणा असते. याचा अर्थ ती यंत्रावर अवलंबून असते. त्यांना ईव्हीएम यंत्रे असे म्हणतात. ईव्हीएम यंत्राचा शोध खूप वर्षांपूर्वी भारतातच कोणीतरी लावला. त्याच्या जनकाचे नाव मतदानासारखेच गुप्त ठेवण्यात आले आहे. केशकर्तनालयात काणामागूण लाइण मारणाऱ्या ‘मशिनी’चा शोध कोणी लावला? हे जसे कोणालाही माहीत नसते, तसेच ईव्हीएमचा जनक कोण, हेही कोणाला ठाऊक नसते. सदर ईव्हीएम यंत्र निर्माण करणारा शास्त्रज्ञ (मारहाण होईल, ह्या भीतीने) कायम गुप्त नावाने बेनामी आयुष्य जगतो, असे सांगितले जाते. खरे खोटे लोकशाही जाणे !

ईव्हीएमविषयी थोडेसे : ईव्हीएमचा शोध त्रिखंडनायक व थोर इतिहास संशोधक नमोजी ह्यांनी लावला, असे (भारतात) सर्वसाधारण मत आहे. नमोजी हे नाव जपानी वाटल्याने सदर शोध जपान्यांनी लावला असाही एक पूर्वापार समज होता. पण तसे नाही. हे नमोजी शतप्रतिशत भारतीय निघाले !

ईव्हीएम हे एक सपाट यंत्र असते. त्याला एकाखाली एक अशी अनेक बटणे असतात. बटणांसमोर रंगीत चित्रे असतात. त्यातील आपल्या आवडीच्या चित्रासमोरील बटण, आपण म्हंजेच मतदारांनी दाबले रे दाबले की त्यातून मोठ्‌ठा आवाज येतो.  
ह्या यंत्राला लागून आणखी एक यंत्र हल्ली लावतात. हे जोड यंत्र व्हीव्हीपॅट नावाने ओळखले जाते. हे यंत्र पावती देते. ‘पावती मिळाली नाही, तर तुम्हाला पॉपकॉर्न फुकट’ असे मल्टिप्लेक्‍स किंवा मॉलमधल्या स्टॉलवर लिहिलेले असते की नाही? तस्सेच !! ईव्हीएम नसतील, तर लोकशाहीच चालणार नाही. लोकशाही नाही, ह्याचा अर्थ...मग काहीच नाही ! हो की नाही?

ंमित्रांनो, भारतातील हवामान लहरी असते, हे तुम्हाला माहीत आहेच. हवामानाच्या लहरी स्वभावामुळे ईव्हीएम यंत्रेही काहीशी लहरी वागतात. उदाहरणार्थ, ईव्हीएम यंत्रे उन्हाळ्यात उन्हामुळे, हिवाळ्यात थंडीमुळे आणि पावसाळ्यात पाण्यामुळे चालू किंवा बंद पडतात, अशा तक्रारी आहेत. नुकत्याच पालघर आणि भंडारा-गोंदिया येथे झालेल्या इलेक्‍शनात ही यंत्रे सणकून तापली. ती उन्हामुळे तापली असे सांगितले गेले. ॲक्‍चुअली, त्या दिवशी हवामान तितकेसे लहरी नव्हते. परंतु विरोधकांनी हवा तापवल्याने साहजिकच ईव्हीएम यंत्रेही तापली, असा खुलासा करण्यात आला आहे. ईव्हीएम यंत्रे तापू नयेत, म्हणून ती बर्फाच्या लादीवर लादावीत, अशीही एक सूचना पुढे आल्याने निवडणूक यंत्रणा गार पडली आहे, असे ऐकिवात आहे. बर्फाचे जमत नसेल, तर किमान एक निवडणूक अधिकारी पंखा हलवत यंत्राशी उभा करण्याची सूचनाही करण्यात आली असून, आगामी सर्वसाधारण निवडणुकीनंतर खांदे निखळलेले निवडणूक अधिकारी बघायला मिळतील, असे वाटते ! पण ते एक असो.
जो उमेदवार जिंकेल, त्याला ईव्हीएम यंत्रे भारी आवडतात व जे उमेदवार पडतात, त्यांना ईव्हीएम अजिबात आवडत नाहीत, हा लोकशाहीचा ताजा इतिहास आहे. निवडणुकीत मार खाल्लेल्यांना विचाराल, तर ही यंत्रे ताबडतोब भंगारात विकून पुन्हा कागदाच्या मतपत्रिकांचा वापर व्हावा, असे ते छातीठोकपणे सांगतील. निवडणूक जिंकलेल्यांना विचाराल, तर तंत्रयुगात ईव्हीएमला पर्याय नाही, असे ते छप्पन इंची छाती पुढे काढून सांगतील. तर ज्या दिशेने वारा वाहील, तेथे पाठ फिरवणारी ही यंत्रे, साधीसुधी यंत्रे नसून यंत्रमानव आहेत, असे काही लोकांना वाटते. ट्यूबलाइटचे बटण दाबल्यावर पंखा चालू होणाऱ्या स्विचबोर्डाप्रमाणे काही वेळा ही यंत्रे वागतात, असे दिसते. असे असले तर त्यावर उपायही साधा आहे. मुलांनो, कुठला बरे?
...तर पंखा चालू करायचा असेल तर ट्यूबलाइटचे बटण दाबायचे हाच ! कळले? ह्यालाच म्हंटात लोकशाही. ती चिरायू होवो !

Web Title: editorial dhing tang british nandi article