खड्‌डे : एक चिंतन! (सखोल आणि उथळ...) (ढिंग टांग)

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जुलै 2018

ज्या  मानवाचा जन्मच मुळी गुहेत झाला व डोंगरदऱ्यांत, खड्ड्याखुड्ड्यांमध्ये सहस्त्र वर्षे फिरून मगच त्यास उत्क्रांतीचा दिवस दिसला, त्या मानवाला हल्ली रस्त्यावरच्या साध्यासिंपल खड्ड्यांचाही त्रास व्हावा, हे आम्हांस अनाकलनीय वाटते. ‘दाग अच्छे होते हैं’, ह्या चालीवर ‘खड्‌डे भी अच्छे होते हैं’ हे सत्यदेखील स्वीकारणे गरजेचे आहे, असे आमचे मत आहे. खड्ड्यात कोण जात नाही? सगळेच जातात. किंबहुना जो खड्ड्यात जात नाही, तो तातडीने जावा, ह्यासाठी इतरजन किती प्रयत्नशील असतात. एखादा मनुष्य आपले अगदी ऐकत नसेल, तर त्यास आपण सहजच ‘गेलास खड्ड्यात’ अशा शुभेच्छा देतो.

ज्या  मानवाचा जन्मच मुळी गुहेत झाला व डोंगरदऱ्यांत, खड्ड्याखुड्ड्यांमध्ये सहस्त्र वर्षे फिरून मगच त्यास उत्क्रांतीचा दिवस दिसला, त्या मानवाला हल्ली रस्त्यावरच्या साध्यासिंपल खड्ड्यांचाही त्रास व्हावा, हे आम्हांस अनाकलनीय वाटते. ‘दाग अच्छे होते हैं’, ह्या चालीवर ‘खड्‌डे भी अच्छे होते हैं’ हे सत्यदेखील स्वीकारणे गरजेचे आहे, असे आमचे मत आहे. खड्ड्यात कोण जात नाही? सगळेच जातात. किंबहुना जो खड्ड्यात जात नाही, तो तातडीने जावा, ह्यासाठी इतरजन किती प्रयत्नशील असतात. एखादा मनुष्य आपले अगदी ऐकत नसेल, तर त्यास आपण सहजच ‘गेलास खड्ड्यात’ अशा शुभेच्छा देतो. ह्याचाच अर्थ असा की खड्‌डा ही काही वाईट गोष्ट नाही. किंबहुना ‘काशीस जावें, नित्यं वदावे’ ह्या उक्‍तीप्रमाणे ‘खड्ड्यात जावे, नित्य वदावे’ असा नवा सुविचार आम्ही येथे देऊ.

खड्‌डा ही अशी गोष्ट आहे की, जिथे जाण्यासाठी फार वेळ लागत नाही. तेथे जाण्यासाठी कुठे जावेही लागत नाही. बसल्याजागी माणसाला खड्ड्यात जाता येते. खड्ड्यात जाणे ही इतकी नैसर्गिक गोष्ट असताना सध्या ह्या खड्ड्यांवरून विरोधकांनी जे काही राजकारण चालवले आहे, ते पाहून आम्ही बुचकळ्यात पडलो आहोत.

खड्‌डे प्राय: दोन प्रकारचे असतात. रस्त्यातले आणि सस्त्यातले! पैकी रस्त्यावरील खड्‌डे हे भौतिक जगात अनुभवास येतात. हे खड्‌डे अतिउपद्रवी आणि टीव्हीवर चमकणारे असतात. उदाहरणार्थ, विहीर हादेखील एक प्रकारचा खड्‌डाच असतो, पण त्यास टीव्हीवर तितकीशी प्रसिद्धी मिळत नाही. क्‍वचित कधी कुणी त्यात उडी घेतल्यास, अथवा ‘आर्ची-परशा’छाप जोडीने तीत रोमांस केल्यास तीस प्रसिद्धीचा अनुभव येतो. बिबट्या विहिरीत पडल्यानेही काही विहिरीसदृश खड्‌डे प्रसिद्धी पावले आहेत. पण ते अपवाद मानावेत. कां की, बिबट्यांसाठी सदर विहिरी हे शतप्रतिशत खड्‌डेच असतात.

दुसरे खड्‌डे हे सस्त्यातले असतात. ते प्राय: नशिबाला पडलेले असतात. बसल्याजागी जेथे जाता येते, ते हेच खड्‌डे!! असे खड्‌डे आम्ही बालपणापासून पाहून ऱ्हायलो आहो! काही लोक नुसत्या जिभेच्या जोरावर खड्ड्यात गेलेले आम्ही पाहिले आहेत. आमच्या नागपूर साइडला खड्ड्यांना ‘गड्‌डे’ असे म्हटले जाते. गड्‌डे! कानाला किती गोड वाटते ना गड्‌डे? (खुलासा : हे ‘गड्‌डे’ लाडातले!) रस्त्याला खळी पडल्यासारखे वाटते. रस्ताही लाजत असणार! गड्ड्यात पडले किंवा गेले तरी फारसे वाईट वाटत नाही. मुळात ‘गेलास गड्ड्यात’ असे म्हणतच नाहीत मुळी!!

खड्‌डे हा खास मुंबईचा अलंकार आहे. खड्‌डे नसते तर मुंबई नसती! मुंबई ही सात बेटांमुळे झाली आहे, असे म्हंटात. आम्हाला मान्य नाही! मुंबई ही खड्ड्यांमुळे झाली आहे. माणूस झोपी गेला की त्याला स्वप्ने पडतात. त्याचप्रमाणे मुंबईचे रस्ते झोपी गेले की त्यांनाही स्वप्ने पडतात, पण त्यांनाच खड्‌डे असे म्हणतात. अशा ह्या खड्ड्यांना जेव्हा नावे ठेवली जातात, तेव्हा आमच्या पोटात खड्‌डा पडतो. हे काय भलतेच चालू आहे? असे वाटू लागते.

म्हणूनच ‘ज्या रस्त्यावरून पाच लाख लोक जातात, त्या रस्त्यावर पाच ‘खड्‌डे-बळी’ गेले, तर त्यात रस्त्यांचा काय दोष?’ हा मा. चंदुदादा कोल्हापूरकर ह्यांनी केलेला सवाल आम्हाला चिंत्य वाटतो. आम्हाला मुंबईच नव्हे, तर एकूणच महाराष्ट्रातील खड्ड्यांचा विलक्षण अभिमान आहे. उद्या कुणी आम्हाला ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?’ हा बहुचर्चित सवाल केला तर आम्ही छप्पन इंची छाती आणखी चार इंच फुगवून बोट एखाद्या छानदार खड्ड्याकडेच बोट दाखवू !! कारण खड्‌डे अच्छे होते हैं, हे आम्हांस पटले आहे. इति.

Web Title: editorial dhing tang british nandi article