अवनी : पार्ट टू! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
मंगळवार, 6 नोव्हेंबर 2018

मिसेस वाघ : (पंजा उडवत) अहो, शुक शुक!...
मि. वाघ : (गुरमाळलेल्या आवाजात) ऊंऽऽ....
मिसेस वाघ : (मिश्‍या फेंदारून) मेलं सतत काय ते लोळत पडायचं? उठा की आता!!
मि. वाघ : (डोळे मिटूनच) अजून पाचच मिनिटं!!
मिसेस वाघ : (वैतागून) दिवाळीच्या दिवसांत कसली मेली ती इतकी झोप? उठा, तोंडबिंड घ्या विसळून!!
मि. वाघ : (डोळे मिटलेल्याच अवस्थेत) शेर को कभी मूंह धोते देखा है?
मिसेस वाघ : (शेवटी विषयाला तोंड फोडत) अहो, ऐकलंत का? ती पांढरकवड्याची बया होती नं... ती गेली!!
मि. वाघ : (एक डोळा उघडून) ती ‘अवनी’? ती सुंदर पट्ट्यांची? नुकतीच तिची डिलिव्हरी झाली होती ना?

मिसेस वाघ : (संशयानं) तुम्हाला बरी ठाऊक ‘अवनी’? आम्ही तिला ‘टी-वन’ ह्या सरकारी नावानंच ओळखतो!!
मि. वाघ : (खुलासा करत) फेमस वाघीण होती... ताडोबातल्या जंगलातला तो राजासुद्धा मध्यंतरी विचारत होता...
मिसेस वाघ : (कंटाळून) काय विचारत होते राजाभावजी?
मि. वाघ : (बेसावधपणाने) तो सरकारी आयटम आलाय का तुमच्या एरियात म्हणून!
मिसेस वाघ : (खवळून) आयटम?
मि. वाघ : (घाबरून) न्यूज आयटम ह्या अर्थानं!
मिसेस वाघ : (सात्विक संतापानं) गेली बिचारी! चार-सहा माणसं काय खाल्ली, तर गोळीच घातलीन त्यांनी! तिची बिचारी दोन बछडी अनाथ झाली हो! कोण त्यांना सांभाळणार आता?
मि. वाघ : (वनखात्याची चमचेगिरी करत) वनमंत्री सुधीर्जी मुनगंटीवार शत्रू आहेत का, वाघांचे? उलट त्यांचं कित्ती प्रेम आहे वाघांवर! त्यांच्या गाडीत कायम एक फायबरचा वाघ ठेवलेला असतो! कुणीही समोर आलं की भेट देतात! हिनंच नको तिथं जबडा उघडलान! काय करणार?
मिसेस वाघ : (उसळून) काही सांगू नका त्या मुनगंटीवारसाहेबांचं! आपला माणूस वाटला होता, पण शेवटी उलटलाच!! सगळी माणसं मेली अशीच!!
मि. वाघ : (समजूत घालत)... एरवी जीपमध्ये फिरुन आपल्यालाच बघत हिंडतात ना हे लोक? त्यांची काय चूक? ह्या बयेनं माणसं मारायला जायचं कशाला?
मिसेस वाघ : (उसळून) काही बाजू घेऊ नका त्यांची! हा सरळ सरळ खून आहे खून! मर्डर!!
मि. वाघ : (कान उडवत) काहीतरीच तुमचं! मर्डर काय असा दोनतीनशे लोक गोळा करून, पेपरात बातम्या देऊन करतात का?
मिसेस वाघ : (शेपूट उगारत) त्या मनेकाबाईंचं मला पटतं! डोकं फिरलेल्या वाघिणीला झोपंचं इंजेक्‍शन देऊन पकडून नीट पिंजऱ्यात ठेवलं असतं, तरी चाललं असतं! गोळ्या घालायची हौसच भारी तुमच्या मुनगंटीवारसाहेबांना! आता मेलेला वाघ भरून मिळणार आहे का?
मि. वाघ : (शास्त्रोक्‍त दृष्टिकोनातून) मेलेला वाघ हल्ली भरूनच मिळतो बाईसाहेब! टॅक्‍सीडर्मी म्हणतात त्याला!!
मिसेस वाघ : (जबड्याचा चंबू करत) अय्याऽऽ...म्हणजे ‘टी-वन’ वाघीणसुद्धा भरून ठेवणार? काय बाई हा भयानक छंद एकेकाचा!!
मि. वाघ : (गुप्तहेरासारखा चेहरा करत) माझ्या मते भुसा भरून ठेवणार तिला! ‘पांढरकवड्याची नरभक्षक अवनी’ म्हणून तिकीट लावून प्रदर्शन मांडणार तिचं!! तोच इरादा दिसतोय मला तरी!!
मिसेस वाघ : (सुस्कारा सोडत) मरावे परी मूर्तीरुपे उरावे!!
मि. वाघ : (संशयाने डोळे बारीक करत) मला तर वाटतं, की पेंढा भरलेली ही ‘अवनी’ वाघीण अमर होईल!
मिसेस वाघ : (कुतुहलानं) कशी?
मि. वाघ : (गूढ हसत) मुनगंटीवारसाहेब पेंढा भरलेली ‘अवनी’ बांदऱ्याचे शिकारी उधोजीसाहेबांना भेट म्हणून देतील...आणि मग युती झालीच म्हणून समज!

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial dhing tang british nandi article