भैय्या ना धरो..! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

दादू : (खट्याळपणे फोन फिरवत) हालोव...कौन बात कर रहा है? सदूभय्या है का?
सदू : (नम्रतेची मात्रा वाढवत) जी, बोल रहा हूं? आपका शुभनाम?
दादू : (हसू दाबत) हनुमान चालीसा पढे हैं का?
सदू : (कपाळावर आठी) नहीं! क्‍यूं?
दादू : (मोकळ्या गळ्याने) जय हनुमान ज्ञान गुन सागर। जय कपिस तिहुं लोक उजागर।
सदू : (कपाळावर आणखी एक आठी...) हलोऽऽ...
दादू : (दुर्लक्ष करत) रामदूत अतुलित बल धामा। अंजनिपुत्र पवनसुत नामा...हर हर महादेऽऽव!
सदू : (चटकन ओळखत) दादू, चेष्टा नको हं!

दादू : (खट्याळपणे फोन फिरवत) हालोव...कौन बात कर रहा है? सदूभय्या है का?
सदू : (नम्रतेची मात्रा वाढवत) जी, बोल रहा हूं? आपका शुभनाम?
दादू : (हसू दाबत) हनुमान चालीसा पढे हैं का?
सदू : (कपाळावर आठी) नहीं! क्‍यूं?
दादू : (मोकळ्या गळ्याने) जय हनुमान ज्ञान गुन सागर। जय कपिस तिहुं लोक उजागर।
सदू : (कपाळावर आणखी एक आठी...) हलोऽऽ...
दादू : (दुर्लक्ष करत) रामदूत अतुलित बल धामा। अंजनिपुत्र पवनसुत नामा...हर हर महादेऽऽव!
सदू : (चटकन ओळखत) दादू, चेष्टा नको हं!
दादू : (आश्‍चर्यानं) कसा काय ओळखलास माझा आवाज? मला वाटलं की मी अस्सल यूपीतल्या शुद्ध घीमधल्या आवाजीत तुला हनुमान चालिसा ऐकवत होतो!!
सदू : (थंड खर्जात) तुझ्या आवाजीत शुद्ध घी नव्हे, आंबट वरण ठिबकत होतं!!
दादू : (खिजवत) आता यापुढे तुला आम्ही राजाभय्या म्हणणार हं का!!
सदू : (खवळून) दादू!!  
दादू : (आणखी डिवचत) ऐकली तुझी कालची उत्तर भारतीय महापंचायतीतली नस्ती पंचाईत!! हाहा!! मराठीचा स्वाभिमान गुंडाळून ठेवून थेट हिंदीत भाषण ठोकलंस! शाब्बास!!
सदू : (तक्रारीच्या सुरात) तुम्ही तर थेट अयोध्येत जाऊन हिंदीत मखलाशी करून आलात! आम्ही कांदिवलीपर्यंतसुद्धा जायचं नाही का?
दादू : (डोळे मोठ्ठे करत) शरयूचं पाणीही प्यायलास म्हणे!!
सदू : (छद्मी हसत) तुम्हाला शरयूच्या तीरावर जाऊन पाणी प्यावं लागलं! आमच्यासाठी स्वत: शरयू कांदिवलीत आली!!
दादू : (‘टुक टुक माकड’ची ॲक्‍शन करत) लेकिन बुंद से गयी वो हौदसे नहीं आती!! तुझ्या आधी मी उत्तर भारतीय बांधवांशी दोस्तीचा करार करून टाकलाय! माझं डायरेक्‍ट भांडण कधी नव्हतंच म्हणा त्यांच्याशी!! पण तुझी गोष्ट वेगळी आहे...
सदू : (शंकेखोरपणाने) काय वेगळी आहे? सगळं डिट्टो तसंच तर आहे की!!
दादू : (खुलासा करत) तू त्या लोकांची किती टाळकी सडकलीस!! टॅक्‍सीवाले, फेरीवाले, मच्छीवाले, रेल्वे भर्तीवाले, खोमचेवाले...कोण्णालाही सोडलं नाहीस!! तू कितीही दोस्तीसाठी हात पुढे केलास तरी तुझं खळ्ळ खट्यॅक कसे विसरतील ते?
सदू : (चतुराईने) वेळ लागेल, पण विसरतील!! बघशीलच तू!! माझं त्यांच्याशी भांडण नाहीच्चे मुळी!! माझे कितीतरी मित्र भय्ये...आय मीन...उत्तर भारतीय आहेत...!
दादू : (दुप्पट चतुराईने) बाकी तू एकदम स्टॅंण्ड बदलून टाकलास हं! एका हातात काठी आणि दुसऱ्या हातात लॉलीपॉप ही तुझी नवी पॉलिसी सॉल्लिड आहे!! व्हिलनच्या भूमिकेची स्क्रीन टेस्ट देऊन थेट हिरोचा रोल ढापलास!! शाब्बास!! हिंदीत भाषण काय, मैत्रीची भाषा काय...कमाल आहे बुवा एका माणसाची!!
सदू : (लाजून) खरंच वाटतं असं तुला?
दादू : (हरभऱ्याच्या झाडावर चढवत) म्हंजे काय? खरंच वाटतं!! मागल्या खेपेला तू गुजराथी बांधवांनाही पटवून आला होतास ना?
सदू : (ओशाळून) पटवापटवी कसली रे दादूराया!! उगीच दुश्‍मनी का घ्यायची सगळ्यांशी!! आधीच हे लोक आपल्याला मतं देत नाहीत!!
दादू : (प्रश्‍नार्थक) आता देतील असं वाटतं तुला?
सदू : (खांदे उडवत) का नाही देणार? मी इतकं गोड बोलून आलोय की द्यावंच लागेल ना त्यांना मत!!
दादू : (अजीजीच्या सुरात) मग एक काम कर ना!! जरा आपल्या मराठी मतदारांना पटवायचा ट्राय कर ना!! ते तरी कुठं देतायत मत?...काय? हाहा!!! जय हिंद. जय महाराष्ट्र. जय श्रीराम!!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial dhing tang british nandi article