अवनीती! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
शनिवार, 8 डिसेंबर 2018

वनमंत्री महाराष्ट्र राज्य.
विषय :
पांढरकवडा वनक्षेत्रातील नरभक्षक अवनी ऊर्फ टी-वन वाघिणीचा सरासर निर्घृण खून झाल्याचा अहवाल ह्याबाबत.

वनमंत्री महाराष्ट्र राज्य.
विषय :
पांढरकवडा वनक्षेत्रातील नरभक्षक अवनी ऊर्फ टी-वन वाघिणीचा सरासर निर्घृण खून झाल्याचा अहवाल ह्याबाबत.
आधी ठरल्याप्रमाणे व अपेक्षेनुसार टी-वन ऊर्फ अवनी वाघिणीचा खून झाल्याचा अहवाल राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने दिला असून, सदर खून करणाऱ्या मारेकऱ्यास ऊर्फ शिकाऱ्यास विनाविलंब दंड व्हावा, अशी शिफारस करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे अवनी वाघिणीच्या अकाली मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आपल्यालाही चौदा दिवस वनवासाची शिक्षा का ठोठावू नये, अशी नोटीस देणेत येत आहे. आधीच वाघांची संख्या रोडावलेली असताना असा आततायीपणा कां केलात? ह्याचा चोवीस तासांत खुलासा करावा. सोबत आमचा अहवाल जोडत आहोत. त्यातील कळीच्या मुद्‌द्‌यांवर खुलासा अपेक्षित आहे. मुद्‌दे येणेप्रमाणे :
१. अवनी वाघिणीवर आधी भुलीच्या इंजेक्‍शनाचा डार्ट मारण्यात आला. त्यानंतर तीनच सेकंदांनी चालत्या जीपमधून शिकाऱ्याने बंदुकीची गोळी झाडली. अवनीस पुरेसे बेशुद्ध तरी होऊ दिले पाहिजे होते. तुमचा दुखरा दात काढताना दंतवैद्याने विदाऊट भूल काढला असता तर चालले असते का? खुलासा व्हावा.
२. सदर शिकाऱ्याकडे बंदुकीचा परवाना नव्हता व त्याच्याकडे परवाना नाही, हे अवनीस माहिती नव्हते.
३. अवनीस आधी नोटीस देणे गरजेचे होते.
४. शिकारीचे कुठलेही नियम सदर शिकाऱ्याने पाळले नाहीत.
५. शिकार करताना संयम पाळणे गरजेचे असते.
६. शिकारी पथकातील कोणालाच शिकारीचा अनुभव नव्हता.
...वरील मुद्‌द्‌यांवर तातडीने स्पष्टीकरण द्यावे.
कळावे.
मा. वाघ सदस्य, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण.
* * *
मा. मा. वाघ, सदस्य,
रा.व्या. सं. प्रा.

आपली नोटीस मिळाली. वाचून वाईट वाटले. अवनी वाघिणीस मारण्याचा आमचा कुठलाही हेतू नव्हता, असे मी बहुधा अवनी वाघिणीच्या जन्माअगोदरपासूनच सांगतो आहे. अवनीने काही माणसे मारल्यानंतर तिला हाणावे, असे कित्येक लोकांना मनापासून वाटत होते. इथे माणसे मेल्याचे दु:ख कोणालाही होत नाही, एक डोके फिरलेली वाघीण मारली तर सगळ्यांना त्रास होतो, हे अनाकलनीय आहे. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे वाघांची संख्या फार रोडावलेली नाही. (आपण स्वत: एक वाघ आहातच!!) मुंबईतसुद्धा वाघ भेटतात. बांदऱ्यास जाऊन यावे.
आपण घेतलेल्या आक्षेपांना उत्तरे येणेप्रमाणे :
१. दंतवैद्याकडल्या आठवणी अजूनही अधूनमधून ठणकतात; पण मी साधा माणूस होतो व आहे. दंतवैद्याकडे कुणी नरभक्षक खुर्चीत जाऊन बसला तर मला वाटते, दंतवैद्य बरेच वेगळे दात उपटेल!! असो.
२. सदर शिकाऱ्याकडे वाहनचालक परवाना होता. मला वाटते, तेवढा पुरेसा आहे. एटीएमच्या गुरख्यांकडे कुठे असतो बंदूक परवाना?
३. अवनीस नोटीस दिली होती; पण ती तिने (दाताने) फाडली! हे कृत्य सरकारविरोधी समजण्यात यावे.
४. शिकारीला एकच नियम असतो. : तू की मी? मला वाटते, शिकारी ह्यावेळी जिंकला!!
५. शिकारी पथकाने प्रचंड संयम पाळला. अवनीस लोळवल्यानंतर साऱ्यांनी मिळून साबुदाणा खिचडी खाल्ली. त्याआधी जंगलात उन्हातान्हात फिरताना पाणीही कमी पिण्यात आले.
६. शिकारी पथकातील कोणालाही शिकारीचा अनुभव नव्हता, हे प्रमाणपत्र म्हणून वनखात्याच्या भिंतीवर टांगण्यात येईल. ह्या राज्यात शिकारीला परवानगीच नसल्याने अनुभव कोठून मिळणार? तेव्हा थॅंक्‍यू!!
...आपल्या आक्षेपांना यथामती उत्तरे दिली आहेत. उर्वरित आक्षेपांचे निरसन करण्यासाठी पांढरकवड्याच्या जंगलात समक्ष हिंडून यावे. कळावे. आपला. वनमंत्री.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial dhing tang british nandi article