पीके! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

प्रि य मित्र श्रीमान उधोजीसाहेब यांसी, शतप्रतिशत प्रणाम, दंडवत, मुजरा आणि सा. नमस्कार! फार दिवसांत गाठभेट नाही. आमचे पक्षाध्यक्ष श्रीमान मोटाभाई तूर्त भलतेच काळजीत पडले आहेत. गेले अनेक दिवस ते तुमचा फोन ट्राय करत होते. परंतु, तुमचा फोन व्यग्र असून ‘कृपया प्रतीक्षा करें’ असे सांगण्यात आले. त्यांनी मला फोन करुन ‘बद्धा ठीक छे ने?’ असे विचारले. मी स्वत: एकूण चोवीस फोन केले. तीच सूचना : कृपया प्रतीक्षा करें!! एकदा तर तुमच्याच आवाजात ही सूचना ऐकू आल्याने (पक्षाध्यक्षांच्या आदेशानुसार) शेवटी पत्र लिहायला घेतले. सदर पत्र एका अपरिचित गृहस्थाबरोबर हॅंड डिलिव्हरीने पाठवत आहे. पत्र वाचून सदर गृहस्थाचे म्हणणे ऐकून घ्यावे. (त्यास चहा पाजण्यासही हरकत नाही.) सदर गृहस्थ दिसायला शाळामास्तरासारखा दिसत असला तरी तो अत्यंत हुशार, नावाजलेला निवडणूकतज्ञ आहे. त्याला जाड भिंगाचा चष्मा असल्याने त्याचे गणित अत्यंत उत्तम आहे. त्याच्या रणनीतीनुसार निवडणुका खेळल्यास विजय शतप्रतिशत मिळतो असा अनेकांचा अनुभव आहे. भल्या भल्या नेत्यांना त्याने अचूक सल्ला देऊन निवडणुकीत विजय मिळवून दिला आहे. बिहारमधील एका उमेदवाराला तर निवडणुकीचा अर्जदेखील न भरता त्याने भरघोस मतांनी विजय मिळवून दिला, अशी आख्यायिका आहे. निवडणूक रणनीतीचे कंत्राट त्यास दिले तर आधी मंत्रिमंडळ स्थापन करुन नंतर निवडणूक लढवली तरी चालते!! तेव्हा त्याला जरुर चहा पाजणे!! बाकी भेटीअंती बोलायचेच आहे. पण भेट कधी होणार? कळावे.
आपला जीवश्‍च कंठश्‍च मित्र. नाना फडणवीस.
ता. क. : सदर गृहस्थाचे नाव सांगायला विसरलो!! पीके...त्याचे नाव पीके असे आहे!!
* * *
नाना-
श्रीमान पीके ह्यांची भेट झाली. दारात येऊन उभेच राहिले. प्रारंभी मला वाटले, की विजेच्या मीटरचे रीडिंग घेण्यासाठी वीज कंपनीचा माणूस आला आहे. ‘इलेक्‍ट्रिक मीटर’ऐवजी ‘इलेक्‍शन मीटर’ असे म्हणत असेल. त्याला म्हटले, ‘‘हमारे घर में खासदार लोगों की बैठक सुरू हय, नंतर आ जाव!’’ पण मनुष्य सूचक हसला. त्याने त्याचे व्हिजिटिंग कार्ड पुढे केले. ‘पीके- हमारे यहां सब तरह की इलेक्‍शन का काम लिया जायेगा. ग्यारंटी के साथ जिताया जायेगा’ असे त्या कार्डावर लिहिलेले होते. त्याला ताबडतोब घरात घेतले. बैठकीतील खासदारांसमोर त्याने ‘आदमी डर गया, समझो मंदिर गया’ हा डायलॉग म्हणून दाखवला. आमीर खानच्या ‘पीके’ सिनेमातला हा डायलॉग आहे, हे आमचे सामनावीर संजयाजी राऊत ह्यांनी ओळखले. मग बराच वेळ आमची बोलणी झाली.
पीके अत्यंत बुद्धिमान आहेत, हे लगेच कळले. त्यांनी कॅलक्‍युलेटर काढून इलेक्‍शनचे गणितच मांडले. एकूण चार पर्याय त्यांनी सांगितले. ते असे : १. युती करू नये. २. युती करावी ३. युती केल्यासारखे दाखवावे आणि करू नये, आणि ४. युती न केल्यासारखे दाखवावे, पण करावी!!
आमच्या खासदारांना तसाच प्रश्‍न विचारला. युती झाली नाही तर लढणार का? सगळे होऽऽ म्हणाले. युती केली तर लढणार का? असे विचारल्यावर होऽऽऽ असा मोठा होकार आला. त्याच्या गणिताची उत्तरे आमच्याकडे रेडी आहेत, हे कळल्यावर पीके पुन्हा बिहारला निघून गेले आहेत. बाकी पुढचे पुढे बघू!! वाट पहा!! कळावे. उधोजी.
ता. क. : तुमचे पत्र त्याने आमच्या हातात दिलेच नाही. आमचा फोन सध्या चार्जिंगला आहे!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com