हाजमे की गोली! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

आमचे आध्यात्मिक तारणहार इम्रानखांसाहेब औलिया ह्यांची कदमबोसी करून, मत्था टेकूनच आम्ही येथे आलो आहो! नुकतीच आमची औलियासाहेबांशी मुलाकात झाली. तो एक दैवी अनुभव होता, येवढेच आम्ही तूर्त म्हणू. बाबा, औलिया आदी लोगांना गाठून त्यांचा अनुग्रह मिळवण्याचा आम्हाला जबर्दस्त शौक आहे. तसे आम्ही अनेक बाबालोग पाहिले आहेत, पण गेले काही साल आम्ही इम्रान औलिया ह्यांच्याबद्दल सुनून (यानेकी : ऐकून) होतो. प्रत्यक्ष अनुभव परसों आला.
दरअसल (याने की : वास्तविक) आमचे मत त्यांच्याविषयी फारसे बरे नव्हते. कां की त्यांचा इतिहास तितकासा बरा नाही. फास्ट बोलिंग करून प्रतिस्पर्धी फलंदाजास औट करणाऱ्या ह्या हिंस्र गोलंदाजास निकाहनामे पढण्याचा शौक लागला, हे आम्हाला आवडले नव्हते. लेकिन त्यांच्या तळहाथावर किस्मत की लकीर ऐसी काही उमटली की हातातला बॉल-इ-क्रिकेट जाऊन हुकूमत-ए-पाक त्यांच्या हातात आली. माणसाला पावर आली की त्याचे सगळे बरोबर असते, हे सौफीसदी सच आहेच. त्यात औलियासाहेबांना अचानक उपरती होऊन ते सत्यवादी, अहिंसावादी आणि करुणावादी झाले, हेही तिहेरी सच आहे. मालूम आहे ये कैसे हुआ? तो सुनो!!
...आम्हाला अनुग्रह देताना त्यांनी मोरपीसाचा झाडू आमच्या डोसक्‍यावर तीनदा हापटला व म्हणाले : ‘‘अबे, कीडेमकौडे...सुधर जा!’’  औलिया इम्रान ह्यांनी आम्हाला कीडेमकौडे म्हटले म्हणून तुमच्या कपाळाला आठ्या आल्या ना? आमच्याही आल्या होत्या. लेकिन ही तुमची गलतफहमी आहे. पुढे ऐका, म्हंजे कळेल!!  
‘‘सुधर जा बे, सुधर जा...इस लडाईसे किसी का कुछ भला नहीं होनेवाला!,’’ त्यांनी मोरपीसाचा पंखा पुन्हा उगारला. शेजारी ठेवलेली उदाची धुरी त्यांच्या नाकाखाली धरावी, असा हिंस्र विचार तेव्हा आमच्या दिलात डोकावून गेला होता. झूठ बोले कौव्वा काटे!! पण आम्ही सब्र केली. दरअसल त्यांनी आम्हाला नव्हे, स्वत:च्याच डोसक्‍यात भरलेल्या हिंसक विचारांना सांगितले होते की ‘अबे, सुधर जा!’
‘‘हथियार मेरे भी हाथ में है...’’ ते म्हणाले. त्यांनी हातात आता चिमटा घेतला होता. आम्ही दोन पावले मागे सरकलो.
‘‘हथियार तेरे भी पैरों में है...’’ ते हंसून म्हणाले. आमच्या पायात कोल्हापुरी पायताण होते. आम्ही दोन पावले (अर्थातच) पुढे सरकलो.
‘‘इसका मतलब, लडाई करना फिजूल है...’’ ते म्हणाले. ‘लडाईमध्ये जीत कुणाचीच होत नाही, इन्सानियत हार जाती है’ असा एक विचार-इ-सु (याने की : सुविचार...तुम्हाला काय वाटले आं?) त्यांनी ऐकवला. हे भलतेच होते. आम्ही च्याटंच्याट पडलो. त्यांनी पुन्हा अहिंसेचे तत्त्व आम्हाला समजावून सांगितले. एखादा मच्छर फार चावत असेल तर त्याला टाळी वाजवून चिरडू नये, -उडू द्यावे! थोडे बसू द्यावे!! छटाकभर खून गमावल्याने आपले काय जाते? पण मच्छरांची खानदाने पोसली जातात. केवळ ह्या इन्सानियतच्या रिश्‍त्याने त्यांनी दहशतगर्दांना अनुग्रह दिला. बॉम्बचे कारखाने काढले. वगैरह. वगैरह.
‘’आओ, बैठ के प्यार की बातें करते है...’’त्यांनी मोरपीसाचा पंखा आमच्या गालावरुन फिरवला. आम्ही महिरलो! खरेच, ह्या इसमाच्या तोंडी अंहिंसेची भाषा शोभत नाही. हे म्हंजे कसायाने एकादशीचे महत्त्व विशद केल्यापैकी झाले!! पण हे अचानक असे झाले? आखिर आम्ही त्यांना जाब विचारलाच. तर विव्हळून त्यांनी हातातला मोरपंखा फेकला.
‘‘कल रात साडेतीन बजे मला जोराचा दृष्टान्त झाला. तुमच्या हिंदुस्थानी जमालगोट्याने हाजमा ठिकाणावर आला आहे...अब सब खैरियत है!,’’ औलियासाहेब कण्हत म्हणाले.
बस, इतनाही!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com