।।मतदेवस्तोत्र।। (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
मंगळवार, 12 मार्च 2019

ॐ नमोजी लोकतंत्रा। लोकभूलीच्या मायामंत्रा।
अवघ्या देशाचिया चरित्रा। मनोभावे तुज नमो।।

अगा करुणाकरा गुणतिलका। सर्वपापविघ्नेक्षालका।
एका व्होटच्या मालका। चरणारविंदी आलो पैं।।

हे तो पंचवार्षिक व्रत। पाळितो आम्ही अलबत।
विश्‍वमौलिक तुझे मत। द्यावे आता मजलागीं।।
 
जय जयाजी मतदारा। जय जयाजी तारणहारा।।
तुझिया नामाचा नारा। देत असे म्यां उच्चरवी।।

जय जयाजी व्होटिंग मशीन । जय जयाजी त्याचे बटण।
जय जयाजी मतदान। मुजरा माझा साऱ्यांसी।।

तो एक गरीब बिचारा। ज्यासी देसी तूच थारा।
तुझियाभोवती माहौल सारा। फिरविला आहे म्यां।।

ॐ नमोजी लोकतंत्रा। लोकभूलीच्या मायामंत्रा।
अवघ्या देशाचिया चरित्रा। मनोभावे तुज नमो।।

अगा करुणाकरा गुणतिलका। सर्वपापविघ्नेक्षालका।
एका व्होटच्या मालका। चरणारविंदी आलो पैं।।

हे तो पंचवार्षिक व्रत। पाळितो आम्ही अलबत।
विश्‍वमौलिक तुझे मत। द्यावे आता मजलागीं।।
 
जय जयाजी मतदारा। जय जयाजी तारणहारा।।
तुझिया नामाचा नारा। देत असे म्यां उच्चरवी।।

जय जयाजी व्होटिंग मशीन । जय जयाजी त्याचे बटण।
जय जयाजी मतदान। मुजरा माझा साऱ्यांसी।।

तो एक गरीब बिचारा। ज्यासी देसी तूच थारा।
तुझियाभोवती माहौल सारा। फिरविला आहे म्यां।।

करोनी मतदार यादीचे वाचन। फुटले आमुचे लोचन।
तरीही करितो कष्ट निसदिन। निवडणुकीचे कारणीं।।

झुळझुळीत जाहीरनामे। छापियलेले अतिसुगमे।
विविध घोषणांची कामे। त्यात असतील छापिली।।

घेवोनी तुझे मंगल दर्शन। स्वहस्ते तुजला वाहीन।
आश्‍वासनांची शिंपण। तुझिया दारी मतदारा।।

आले आले दिवस तुझे। बाकी सर्वहि होते माझे।
पाच वर्षात एकदा वाजे। बेंडबाजा ऐसा हो।।

चौफेर झिरमिळ्या। विविध पक्षांच्या चिरफळ्या।
जेथ भोपळ्याचे विळ्या। सख्य सुखे जमविले।।

येथोनी गेले गयाराम। ह्या दारें येती आयाराम।
तुवा म्हणावे ‘हे राम’। पाहूनी साऱ्या येरझारा।।

आता सजतील सारे तिठे । गल्ल्या, अड्‌डे नि पाणवठे।
कॉलेजे नि विद्यापीठे। मागे कशाला राहतील।।

सर्वत्र आणि सर्वकाळ । प्रचाराची उडेल राळ।
थांबून राहील काळ। तीन मास पुढील हे।।

आता फिरतील दारोदार। कोण कुठले उमेदवार।
ओळखही दावतील फार। जणू नाते जन्मांतरी।।

जोडोनिया दोन्ही कर। मनोभावे नमस्कार।
आश्‍वासनांचा महापूर। धडकेल अपुल्या अंगणी।।

परंतु ते सारे नतद्रष्ट। दुष्ट आणि पूर्णभ्रष्ट।
एकलाची येथ सुष्ट। गर्दीमध्ये येथल्या।।

सर्वांकडे करोनी दुर्लक्ष। मतदारा तू राही दक्ष।
उभा न करणे कुठलाही पक्ष । मत द्यावे मजलागी।।

सत्ताधीशांनी आणिला आव। विरोधकांनी सोडिला ठाव।
ऐशा वेळी तुझा भाव। वधारेल मतदेवा।।

एरवी तुजला विचारिते कोण। नशीबाचे चढते लोण।
तू तो रिकामी फाटकी गोण। एरव्ही रे मतदारा।।

एरवी तुजला नाही भाव। कुणीही न पुसे तुझे नाव।
भाकरीसाठी धावाधाव। आहेच तुझ्या नशिबी।।

एवढे जाण रे लवलाही। ऐशी सुगी पुन्हा नाही।
परीक्षा पाहते ही लोकशाही। तुझी आणि माझीही।।

सुरेख सरळ अंगुळीका। नखे जैसी चंद्रलेखा।
काळ्या शाईचा ठिपका। आणील शोभा तुज पै।।

म्हणोनी म्हणतो हाचि नंदी। इलेक्‍शने म्हणजे चाराचंदी।
रणांगणी ह्या अनंत फंदी। फितुरांची झुंबड।।

परमप्रिय आवडिच्या मतदेवा। नको खाऊ फुका भावा।
आशीर्वादाचा येऊ द्यावा। प्रत्यय आता जाणिजे।।


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial dhing tang british nandi article