esakal | मुलं पळवणारी टोळी! (ढिंग टांग)
sakal

बोलून बातमी शोधा

dhing tang

मुलं पळवणारी टोळी! (ढिंग टांग)

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

डिअरम डिअर होम्मिनिष्टरसाहेब यांना म. पो. ह. बबन फुलपगार (कदकाठी ५ फू. सहा इं, उमर सव्वीस, कमर सव्वीस, छाती सव्वीस, फुगवून सव्वीस) ह्याचा सलाम. लेटर लिहिनेस कारन का की सध्या महाराष्ट्रे राज्यात इलेक्‍शनचे वातावरन असून माहौल टाइट होत असून, सर्व पक्षांमध्ये उलाढाली चालू आहेत, असे एका खबरीने आपल्याला सांगितले. खबरी म्हनाला की सध्या महाराष्ट्र राज्यात पोलिटिकल फ्यामिलीमधली मुले पळविनारी टोळी सक्रिय झाली असून, सर्वांनी सावध राहावे!! मुले पळविनाऱ्या टोळीचा बंदोबस्त करनेसाठी वेगळी तजवीज करावी लागेल, हे सांगन्यासाठी सदर निवेदण (नशापानी न करता) लिहिले असे.

साहेब, मुले पळविनाऱ्या टोळ्यांनी हैदोस घातल्यामुळे महाराष्ट्रातील गुन्हेगारी जगत हादरून गेले असून, एकसे एक नामचीन व दाखलेबाज मुलेचोर टोळीत सामील झाल्याची खबर आहे. ह्या टोळीचा वेळीच बंदोबस्त न झाल्यास महाराष्ट्र राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्मान होऊ शकतो, ह्याची कृपया नोंद घेनेचे करावे.
सदर मुले पळविनाऱ्या टोळीची मोडस आपरेंडी वेगळी आहे. पूर्वीच्या काळी भांग पाजून अथवा नशिल्या पधार्थांचे सेवन करायला लावून मुले पळविन्याचे काम होत असे. त्यात लेडीज मेंबरेही सामील असत. शिवाय ही पळविलेली मुले न्हानीदेखील असत. पन आता सज्ञान मुलांचेही अपहरन होनेची वेळ आली आहे! चांगले दोन मुलांचे बापई लोक दिवसाढवळ्या पळविले जातात. आच्चिर्याची गोष्ट म्हंजे ह्यापैकी एकही केस कुठल्या बी पोलिस ठाण्यात नोंद झालेली नाही!! खबरीने टिप दिली असता जागोजागचे सीसीटीव्हीचे फूटेज तपासन्यात आले. काहीही आढळून आले नाही. परंतु सदर गुन्हा मीडियाच्या क्‍यामेऱ्यासमोरच राजरोस घडत असल्याचे निष्पन्न झाले!!
पळविनारी ही टोळी महिनादोन महिने एखांदे पोलिटिकल घराने हेरते. माती जरा मऊ दिसली की खनावयास घेते. आच्चर्य म्हंजे आपले मूल पळवून नेन्याची मूकसंमती त्या मुलांचे पालकच देतात, असे आमच्या पोलिस तपासात निष्पन्न झाले असून, त्यामुळे पोलिसात गुन्ह्याची नोंद होत नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. पालकांचाच पाठिंबा आसंल तर गुन्हा कसा नोंद होनार?

सदर टोळी हेरलेल्या मुलाला चाकलेट देते. सदर चाकलेटात नशिला पधार्थ मिक्‍स केला आहे का, हे तपासण्यासाठी चाकलेटचा नमुना प्रयोगशाळेत पाठविणेत आला असून, आठ दिवसात त्याचा रिपोर्ट येईल, असे सांगन्यात येते. हेरलेल्या मुलास ‘तुला उत्तम कपडे, मोटार, शिक्षन आनि नौकरी देऊ’ असे आश्‍वासन देन्यात येते. त्या कारनाने मुलाचे डोके फिरून तो घर सोडून निघतो! ह्या गुन्ह्याच्या कामी हेलिकाप्टर, फायू ष्टार हॉटेले, गुप्त मीटिंगा अशा गोष्टींचा अवलंब सदर टोळी करीत असून, आजवर अशी किमान अर्धा डझन मुले पळविन्यात आली, असा प्राथमिक अंदाज आहे. भविश्‍यात अशी किमान शंभर मुले पळविली जातील असा दोन नंबरचा अंदाज आहे!!

मीडियासमोर मुले पळविन्याचा गुन्हा घडत असेल तर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न गंभीर झाला असेच म्हनावे लागेल. सदर मुले पळविनाऱ्या टोळीने डोकॅलिटी लढवून मुले पळविली असून, त्याचा डायरेक संबंध इलेक्‍शनशी आहे, हे उघड आहे. इलेक्‍शननंतर सदर पळविलेली मुले घरी वापस येतील की नाही, सांगता येत नाही. म्हनून सदर मुले पळविनाऱ्या टोळीच्या सदस्यांचे साधारन वर्नन व मुलेचोरांचे रेखाचित्र जारी करनेत यावे व सदर गुन्हेगारांना ताबडतोबीने गजाआड करावे ही विनंती! आपला आज्ञाधारक. ह. बबन फुलपगार.

loading image