...सुजय असो! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
गुरुवार, 14 मार्च 2019

आमच्या पार्टीचा सुजय असो! आदरणीय नमोजींच्या मार्गदर्शनाखाली औंदाच्या निवडणुकीत आमची पार्टी शतप्रतिशत सुजयी ठरेल, ह्याबद्दल आमच्या मनात संदेह उरला नाही. आपणही ठेवू नये, ही विनंती! कां की सुजयी सु-उमेदवारांनाच यंदाच्या सु-इलेक्‍शनमध्ये सुसंधी देण्याचा सुनिर्णय आमच्या सुपार्टीने घेतला आहे. त्यामुळे आमचा सुजय सुनिश्‍चित आहे. पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांना पुढील निवडणुकीच्या वेळी ‘बघू’ असे आश्‍वासन देण्यात येत असून, त्यावर त्यांनी समाधानी राहावे. निष्ठावंत कार्यकर्त्यांनी उगीचच पक्ष कार्यालयात गर्दी करू नये.

आमच्या पार्टीचा सुजय असो! आदरणीय नमोजींच्या मार्गदर्शनाखाली औंदाच्या निवडणुकीत आमची पार्टी शतप्रतिशत सुजयी ठरेल, ह्याबद्दल आमच्या मनात संदेह उरला नाही. आपणही ठेवू नये, ही विनंती! कां की सुजयी सु-उमेदवारांनाच यंदाच्या सु-इलेक्‍शनमध्ये सुसंधी देण्याचा सुनिर्णय आमच्या सुपार्टीने घेतला आहे. त्यामुळे आमचा सुजय सुनिश्‍चित आहे. पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांना पुढील निवडणुकीच्या वेळी ‘बघू’ असे आश्‍वासन देण्यात येत असून, त्यावर त्यांनी समाधानी राहावे. निष्ठावंत कार्यकर्त्यांनी उगीचच पक्ष कार्यालयात गर्दी करू नये. सतरंज्या, झांजा आणि तानपुऱ्यांचा पुरवठा थेट सभास्थानी करण्यात येणार असून, थेट तेथेच पोचावे!!
सध्या आपल्या पक्षात इनकमिंग जोरात सुरू असून, सुजयी उमेदवारांचा प्रचंड प्रतिसाद पाहता येत्या काही दिवसांत आपली पार्टी जगातली नव्हे, तर ब्रह्मांडातली सर्वांत मोठी पार्टी बनेल, अशी शक्‍यता आहे. त्यासाठीच आम्ही पक्ष कार्यालयाबाहेरील पडवीत टेबल टाकून बसलो आहो! इच्छुक उमेदवारांनी खालील सूचनांचे तंतोतंत पालन करून पक्ष व्यवस्थापनास सहकार्य करावे, ही विनंती.

१. रांगेचा फायदा सर्वांना!
२. इनकमिंग सुजयी उमेदवारांनी सकाळी आठ वाजता पक्ष कार्यालयासमोर रांगेत नंबर धरावा. उशिरा येणाऱ्यास दुसऱ्या दिवशी प्राधान्य मिळणार नाही, ह्याची नोंद घ्यावी.
३. मागल्या दाराशीही दुसरे टेबल मांडण्यात आले असून, अडीअडचणीला तेथूनही प्रवेश दिला जाईल!
४. पक्ष कार्यालयाच्या तळमजल्यावरील खोल्यांच्या खिडक्‍याही पुढील काही दिवस उघड्या राहतील!
५. पहिल्या मजल्यावर कोणीही पाइपच्या आधारे चढून जाऊ नये. तसे करताना अपघात घडून शरीराचे काही अवयव शेकल्यास पक्ष जबाबदार राहणार नाही.
६. सर्वप्रथम पुढील मेजावरील कारकुनाकडून प्रवेश अर्ज मागावा. शेजारील खिडकीच्या गजांना दोरीने पेन अडकविलेले आहे. त्या पेनाने अर्ज तेथल्या तेथे भरून क्रमांक दोनच्या मेजावरील कारकुनाकडे द्यावा. पुढील मेजावर बसलेल्या वरिष्ठ गृहस्थांकडे अर्जाची छाननी होईल. सदर वरिष्ठ गृहस्थ हे कारकून नाहीत, ह्याचे भान उमेदवारांनी ठेवावे! ते कोल्हापुरचे आमचे प्रसिद्ध नेते आहेत व त्यांची थेट पक्षाध्यक्षांशी ओळख आहे!! असो!!
७. छाननी झालेले अर्ज पलीकडल्या दालन क्रमांक एकमध्ये बसलेल्या मुलाखतकारांकडे जातील. तेथे मधोमध बसलेल्या गृहस्थांकडे बघूनच उत्तरे द्यावीत. डावीकडे बसलेल्या व्यक्‍तीकडे बघू नये!!
८. मुलाखतीत सिलेक्‍ट झालेल्या उमेदवारांसाठी लगतच्या दालन क्रमांक दोनमध्ये हार तुऱ्यांसकट स्वागत सोहळा पार पाडण्याची तजवीज करण्यात आली आहे. तेथे (गळ्यात) हार घालून घ्यावा!
९. हार-तुरे, पेढ्यांचा बॉक्‍स आदी स्वागतसाहित्य उमेदवाराने स्वत:च आणावयाचे आहे! ज्याच्याकडे ते नसेल, त्याला अल्पसा मोबदला देऊन साहित्य विकत मिळेल!
१०. पक्षाचा ध्वज घेऊन माध्यमांच्या क्‍यामेऱ्यांसमोर पोझ व बाइट देण्यासाठीची सोय दालन क्रमांक तीनमध्ये करण्यात आली आहे.
११. चहा-नाश्‍ता मिळेल! ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे, त्यांनी अर्जात तसे नमूद केल्यास साखरविरहित चहाची सोय करणे सोपे पडेल! कृपया सहकार्य करावे!!
१२. अर्ज भरताना प्रत्येकाने आपल्या नावापुढे ‘सु’ लावणे अनिवार्य आहे. उदाहरणार्थ : सु-जय, सु-रणजित, सु-नरेंद्र. सु-देवेंद्र, सु-गिरीश आदीप्रमाणे.
१३. उमेदवारास पक्ष, शिक्षण, वय, विचारधारा (हाहा!!) अशा जाचक अटी नाहीत!
१४. सर्वांना सामावून घेण्याचा उदार दृष्टिकोन पक्षाने ठेवला असून, येणाऱ्या प्रत्येकाला पक्षात जागा मिळेल ह्याची दक्षता घेण्यात येत आहे. तथापि, काही पात्र उमेदवारांस काही कारणांमुळे पक्षात स्थान मिळू शकले नाही, तरी संबंधितांनी नाराज होऊ नये! त्यांची मित्रपक्षामध्ये सोय लावण्यात येईल!!
...तेव्हा कमळ पार्टीचा सुजय असो!!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial dhing tang british nandi article