टाइम प्लीज! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
मंगळवार, 19 मार्च 2019

इतिहासपुरुष रुसला आहे! फुगला आहे! फुरंगटला आहे! त्याने ठरविले आहे की आम्ही आता लिहिणार नाही, आम्ही आता खेळणार नाही, आमची आता ‘टाइम प्लीज’! इतिहासपुरुष उठला आणि पाय हापटत घरात जाऊन फडताळात बसला. डोक्‍याला मुंग्या आल्या की तो असाच फडताळात जाऊन बस्तो!! त्याचे असे झाले की...

इतिहासपुरुष रुसला आहे! फुगला आहे! फुरंगटला आहे! त्याने ठरविले आहे की आम्ही आता लिहिणार नाही, आम्ही आता खेळणार नाही, आमची आता ‘टाइम प्लीज’! इतिहासपुरुष उठला आणि पाय हापटत घरात जाऊन फडताळात बसला. डोक्‍याला मुंग्या आल्या की तो असाच फडताळात जाऊन बस्तो!! त्याचे असे झाले की...
नियतीचा छान छान खेळ डायरीत टिपोन ठेवायला इतिहासपुरुषाला भारी आवडे. अशा कितीतरी गोष्टी पाहिल्या पाहिल्या त्याने डायरीत नोंद करून ठेविल्या आहेत. विशेषत: त्याचे लक्ष मुंबैच्या शिवाजी पार्काकडे फार अस्ते. का विचारा? कारण तिथेच तर महाराष्ट्राच्या राजकारणाला जबर्दस्त वळणे मिळतात. तेथल्या कृष्णकुंजगडावर किनई महाराष्ट्राच्या राजकारणातल्या उलथा आणि पालथी घडतात. कधी कधी दोन्ही एकदम, म्हंजे उलथापालथी घडतात. औंदा असेच काही घडेल असे इतिहासाला वाटले होते. पण घडले पालथीउलथा!! म्हंजे काहीच्या काहीच!!

त्याचे असे झाले की...
महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचे नवधुरंधर राजेसाहेब गेल्या नऊ तार्खेला म्हणाले की ‘‘लौकरच दिल्ली काबीज करू. मोहीमशीर होऊ...फकस्त तारखेकडे लक्ष ठेवा...’’ झाले! इतिहासपुरुषाला वाटले की आता दिल्लीश्‍वरांचे काही खरे नाही. गेले, गेले! सिंहासन उलथले त्यांचे! साक्षात राजे मोहीमशीर होणार म्हटल्यावर आता काय कुणाचे उरले? चला लागलाच निक्‍काल त्यांचा!
इतिहासपुरुषाने घाईघाईने कागदाचे ताव आणले. त्यावर रेघोट्या मारोन समास आखले. नवी कोरी शाईची दऊत आणिली. सारा जामानिमा मांडोन ठेविला. मनाशी मांडे खात म्हणाला, ‘‘ऐसा लिहितो इतिहास की म्हणाल आता बास रे बास!’’
इकडे राजियांनी थोडका विचार करोन वावभर तावाचा कागुद आणविला. रंगनळ्या मागिवल्या. ब्रशे पुसोन तय्यार केली. इतिहास पुरुषास वाटले की एवढे एक व्यंग्यचित्र काढून जाहले की राजे थेट घोड्यावर खोगीरच चढवोन मोहिमेवर कूच करणार. दिल्ली दिग्विजयाचा मार्ग इंजिनाच्या वेगाने धडाधड कांपणार! इतिहासपुरुष लेखणी सर्सावोन बस्ला. कुठल्याही क्षणी खबर येईल आणि युद्धाला तोंड फुटेल. ब्रेकिंग न्यूजचा चान्स गेला तर काय घ्या? पण काही घडेचिना...
पळे गेली, घटका गेली, तास वाजे घणाणा
आयुष्याचा नाश होतो राम का रे म्हणा ना?
...इतिहासपुरुष कंटाळला. कारण राजियांनी व्यंग्यचित्र गुंडाळोन आता हातात वर्तमानपत्र घेतले होते. वर्तमानपत्र वांचता वांचता त्यांनी नकळत लेखणी उचलली. पण छे, त्यांनी शब्दकोडे सोडवायला घेतले होते. शब्दकोडे सोडवून झाल्यावर त्यांनी टीव्हीचा रिमोट उचलला आणि इतिहासपुरुषाचा धीर सुटला...

आत्ता मोहीमशीर होतो, ऐसे म्हणोन तयारीसाठी शस्त्रागारात गेलेल्या योद्‌ध्याने हातात कंगवा घेऊन बाहेर यावे, ऐसी गती! त्यास इतिहासपुरुषाने काय करावे? कपाळावर हात मारोन इ. पु. स्वत:शीच म्हणाला, ‘‘राजे, निघा हो आता तरी...वेळ निघोन चालली! घड्याळ चालूच आहे, आपणही घड्याळाची वेळ पाळावी. आपणच असे आरामशीर पेपरे वाचत बस्लात, तर आम्हास फेफरे येईल, त्याचे काय? मग आम्ही काय लिहावे? काय ब्रेकिंग न्यूज द्यावी?’’
पुढे जे घडले त्याने इतिहासपुरुष रुसला, फुगला आणि फुरंगटला!! त्याचे असे झाले की...
...तेवढ्यात राजियांनी कोणाला तरी फोन करून मोहीम रद्द झाल्याचे सांगितले. फोनवर ते म्हणाले, ‘‘फस्क्‍लास सिनेमा बघणाराय. मोहीमबिहीम रद्द! ह्यावेळी नो दिल्ली, नो बिल्ली, नो मोहीम! घर कू जाव!’’
इतिहासाने इथेच म्हटले ‘टाइम प्लीज!’ पुढे तो फडताळात बसोन चिंता करीत स्वत:शीच म्हणाला, की ‘राजे औंदा मतदानाला तरी जाणार ना?’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial dhing tang british nandi article