ही गर्दी कोणासाठी? (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

करवीरनगरीच्या तपोवन मैदानात आईतवारी झालेल्या महायुतीच्या अति अति अति अति विराट ऐतिहासिक सभेला आम्ही स्वत: जातीने उपस्थित होतो. महाराष्ट्रधर्म चोहीकडे जणू वोसंडून वाहत होता. बराचसा खुर्चीत बसला होता, उरलेला बराचसा मंचावर उपस्थित होता. मंचावरील सर्वांत मागल्या रांगेत डावीकडील माणसाच्या बाजूच्या विंगेतून दिसणाऱ्या दूरवरल्या विजेच्या खांबावरील तिसरी व्यक्‍ती म्हणजे आम्ही!! महायुतीच्या प्रचाराचे श्रीफळ आज खुद्दांकडून वाढविले जाणार, ह्या जाणिवेने सकाळपासोनच अंगावर रोमांच आले होते. येवढ्या ऐतिहासिक सभेचे वृत्तांकन करण्याची नैतिक जबाबदारी आपणावरच आहे, ह्या जाणिवेने आम्ही तेथे गेलो होतो...

एवढेच म्हणू, की येवढी अति अति अति अति विराट सभा गेल्या दहा हजार वर्षांत ना कुठे झाली, आणि ना कुठे होईल!! साक्षात मा. उधोजीसाहेब आणि मा. नानासाहेब (फडणवीस) येकत्र, येकदिलाने, येका ठिकाणी, येकागळीं उपस्थितांच्या डोळियाचे पारणें फेडावयास अवतीर्ण झाले, तेव्हा तपोवन मैदानातील वातावरण तापून पलाष्टिकच्या काही खुर्च्या वितळल्या. असे ऐकतो. आम्ही खांबावर असल्याने खुर्च्या वितळून आलेल्या अनवस्था प्रसंगाला तोंड (किंवा अन्य काही) देण्याचा प्रसंग आमच्यावर आला नाही. असो.

‘‘ही गर्दी नेमकी कोणासाठी आहे?’’ मंचावर बैसलेल्या मा. उधोजीसाहेबांनी मोठ्या अपेक्षेने शेजारी बैसलेल्या मा. नानासाहेबांना विचारले. मा. नानासाहेब (पहिल्यापासूनच) तल्लख बुद्धीचे!! त्यांनी तात्काळ म्हटले, ‘‘अर्थात, तुमच्यासाठीच!’’
...साहेब मनोमन खूश झाले. एक चांदीचे सलकडे काढून आपल्या कर्तव्यनिष्ठ कारभाऱ्यास देण्यासाठी त्यांनी मनगटाकडे हात नेला. पण... सलकडे नव्हते! पुढच्या टर्मला देऊ असा पोक्‍त विचार करून साहेबांनी मनगट नुसतेच चोळले, आणि गर्दीकडे अभिमानाने पाहिले.
...पलीकडे कराडात ५६ पक्ष एकत्र येऊनही इतकी गर्दी नाही. आमच्याकडे पाहा, म्हणावे!! मुदलात विरोधकांकडे छप्पन पक्ष आहेत की तेवढ्या संख्येची माणसे? संशयास जागा आहे!!... साहेबांचा ऊर दाटून आला. एवढी गर्दी केवळ आपल्याला पाहण्या-ऐकण्यासाठी आली आहे, ह्या कल्पनेने त्यांना खूप म्हंजे खूपच बरे वाटले. मनात आले : बरे झाले, आणि ऐनवेळी सुबुद्धी झाली, युती केली! अन्यथा येवढी गर्दी कोठून आली असती?
 शेजारी बसलेल्या नानासाहेबांच्या मांडीवर थाप मारत उधोजीसाहेबांनी आपली खुशी जाहीर केली. वास्तविक त्यांना या घटकेला त्यांचा गालगुच्चा घ्यावासा वाटत होता. पण पलीकडल्या खुर्चीतून करवीरनगरीचे जादूगार चंदूदादा कोल्हापूरकर तिरक्‍या डोळ्यांनी त्यांच्याकडेच पाहत होते. हे गृहस्थ सगळ्यांकडेच तिरक्‍या नजरेने कां पाहतात बरं? त्यांचाही गालगुच्चा घ्यावा का..अं?
‘‘नानासाहेब, मला तुमचा अभिमान वाटतो...’’ हे वाक्‍य उधोजीसाहेबांनी भरभाषणात लाखो लाखो लाखो श्रोत्यांच्या समोर उच्चारिले, तेव्हा नानासाहेबांनी गहिवरून उपरण्याचा बोळाच तोंडात कोंबला. हे वाक्‍य साहेबमुखातून ऐकण्यासाठीच ना गेली चार वर्षे कष्ट उपसले!!

‘‘कारण तुम्ही शब्द दिलात..,’’ तोंडातून काढलेला बोळा कोंबल्याचे आम्ही आमच्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिले. प्रत्यक्ष साहेबांनी पाठीवर मारलेली ही शाबासकीची जाहीर थाप विश्‍वास बसण्याजोगी नव्हती, तरीही खरी होती. काही काही थापा खऱ्या ठरतात, त्या अशा!!
थापांवरून आठवले!
एक शीघ्र कवी नेता व्यासपीठावरून आत्मविश्‍वासाने आपले अप्रतिम सुंदर काव्य ऐकवत होता...
आमच्यासाठी जमली एवढी मोठी गर्दी
ती पाहून विरोधकांना झाली सर्दी!
...ते ऐकून आम्ही दोन्ही हातांनी टाळ्या वाजवायला गेलो, आणि खांबावरून धाडकन खाली पडलो. चालायचेच! बाकी सभा अति अति अति अति विराट होती हे तर खरेच.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com