दलबदलूंचे अभंग! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang
Updated on: 

आपुलिया बळे। नाही मी बोलत ।
आहे जे नियत। तेचि घडे ।।

पंचमीचे रंगी। रंगलो सचैल ।
झालो थोडे सैल। धुळवडीत ।।

आता रंगी ऐश्‍या। न्हालो मन:पूत ।
चढले की भूत। इलेक्‍शनी ।।
 
आम्ही तो बापुडे। द्यावे आम्हा मत ।
आमुची रयत। मायबाप ।।

कसली पक्षनिष्ठा। मूल्येबिल्ये काय ।
गेले दोन पाय। नाकामधी ।।

आम्ही न करितो। विचारबिचार ।
आम्हा मतदार। देव आहे ।।

आज होतो येथे। उद्या तेथे असू ।
परवा कुठे बसू। नाही ठावे ।।

अद्वैताचे रंग। ऐसे भेटतात ।
सर्व प्राणिजात। आपुलेचि ।।

इलेक्‍शनकाळी । पक्षांची वारुळे ।
भूमीखाली बिळे । सटकाया ।।

आम्ही भूमिगत। बिळातले हिरे ।
किंवा सर्पंचरे। म्हणा तुम्ही ।।
 
आम्ही तो कुक्‍कुट। पाहुनिया वात ।
करु कन्नीकाट । संधी येता ।।

वाहणारे वारे । हेरुनिया चोख ।
बदलावा रोख । आपुलाही ।।

कुंपणाचे वरी । हाले सरडोका ।
दृष्टीला गे धोका । त्याला देऊ ।।

रंगबदलाचा । आमुचा हुन्नर ।
थक्‍क यक्षकिन्नर। पाहोनिया ।।

ऐसे काही येर । बदलू आम्ही रंग ।
बघोनिया दंग । होतील की ।।

पावसात फुटे । बेडकांचे पेव ।
तोचि खरा देव । आमुचा हो ।।

घटकेत तीर । कमळाचे पान ।
किंवा हात छान । कोणाचाही ।।

मारु उड्या आम्ही । जमेल तितुक्‍या ।
म्हणा बोंबिलभिक्‍या । आम्हालागीं ।।

पक्षनिष्ठेपायी । किती होते बोअर ।
दिल मांगे मोअर । आमुचे बा ।।

एका पक्षामध्ये । रहावे किती नीट ।
ह्यास काही लिमिट । असते ना? ।।

इलेक्‍शनालागी । असे सर्व काही ।
सारे ‘तोचि’ पाही । वरोनिया ।।

नंदी म्हणे ऐशा । अलौकिक नरां ।
महाग पैजारा । नका मारु ।।

ऐशा दलबदलूंना । द्यावा जमालगोटा ।
त्यासाठी बा ‘नोटा’ । आहे आहे ।।

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com