एक से भले तीन! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

रागा : (फोनमध्ये खेळीमेळीने) हलोऽऽऽ...हाय दीदी! सबकुछ ठीकठाक?
दीदी : (आणखीनच खेळीमेळीने) कूल! कुठे आहेस?
रागा : तेलंगणा!
दीदी : वॉव! मला आवडलं असतं यायला! पण आमच्या नशिबात फक्‍त यूपीच दिसतेय!
रागा : तू यायला पाहिजेस इथं! इथं मस्त आहे!
दीदी : (कुरकुरत) मला यूपीत पाठवून स्वत: मात्र देशभर फिरतो आहेस! धिस इज नॉट डन!!
रागा : (दुर्लक्ष करत) दीदी, लेट मी टेल यू, इथले लोक खरंच मजेदार आहेत! मला भरपूर मतं देणार आहेत, ह्यात काही शंका नाही!
दीदी : (शंकेखोरपणाने) कशावरून?
रागा : (सहजपणे) कशावरून म्हंजे? मी लोकांना हात केला की ते उलटा हात करतात!
दीदी : (गोंधळून) म्हंजे?
रागा : (समजावून सांगत) म्हणजे मी स्टेजवरून गाडीच्या काचा बाहेरून पुसल्यासारखा हात करतो ना! तसं केलं की समोरचं पब्लिक आतून काचा पुसतं! हाहा!!
दीदी : (टोमणा मारत)...ते ठीक आहे, पण कधीतरी अमेठीतसुद्धा येत जा!! शेवटी तुझा मतदारसंघ आहे!!
रागा : (मायेनं) तू आहेस ना? मग मला कसली चिंता? उलट माझी मतं वाढतील!!
दीदी : (बहिणीचा उपदेश...) आपला मतदारसंघ आहे तर आपण येत-जात राहावं! मग लोक नावं ठेवत नाहीत!!
रागा : (बेफिकिरीने) अमेठीतून निवडून यायला तिथं जायला कशाला हवं? कुणालाही पाठवलं तरी तिथले मतदार आपल्यालाच मतं देणार! तशी त्यांना हॅबिटच आहे!!
दीदी : (सावधगिरीची सूचना करत) डोण्ट टेक एनिथिंग फॉर ग्रॅंटेड हं!! माणसानं नेहमी सावध असावं!!
रागा : (किंचित वैतागून) कमॉन दीदीऽऽ...मम्मा पण सारखं हेच सांगत असते! आता तूसुद्धा तेच सांग!
दीदी : (समजूत घालत) ‘काळजी घे’, असं आपल्या भावाला बहिणीनंच सांगायचं असतं ना?
रागा : (निवळत) काळजी घेतोय मी! म्हणूनच दुसरीकडेही उमेदवारी अर्ज भरला आहे! एक से भले दो!!
दीदी : (विचार करत) केरळातल्या वायनाडमधून ना? पण तिथं डावे लोक तुला कसं जिंकू देतील?
रागा : (उत्साहात) आरामात निवडून येईन मी दोन्ही ठिकाणी! बघशीलच तू!!
दीदी : (समाधानाने) तसं झालं तर चांगलंच आहे! पण मला वाटतं, तुला आणखी थोडी काळजी घ्यायला हवी!! मम्माचंही असंच म्हणणं आहे!!
रागा : (कपाळाला आठी घालत) आणखी किती काळजी घेणार?
दीदी : दोन्हीकडे जिंकलास तर ठीकच आहे! पण दोन्हीकडे काही विपरीत घडलं तर? मला तर वाटतं की तू आणखी एका ठिकाणी उभं राहायला हवंस!
रागा : (उडवून लावत) हा नकारात्मक विचार आहे! असं होऊच शकत नाही!! आता जागाही वाटून झाल्या! सगळे मतदारसंघ बुक झालेत! तो विषय बंद!!
दीदी : (हट्‌टाने) बंद कसा? आणखी एक भरवश्‍याचा मतदारसंघ उरला आहे की!! खास तुझ्यासाठी रिकामा ठेवला आहे! तिथून अर्ज भरलास की झालं!!
रागा : (कुतूहलानं) कुठला? आणि मला कसा माहीत नाही?
दीदी : (कोडं घालत) ओळख पाहू? एनी गेसेस?
रागा : (ओठ काढत) नाही लक्षात येत!
दीदी : चहात, आमटीत आणि लक्षात आलं हे पाहिजेच!!
रागा : (तोंड वाकडं करत) वाईट जोक!
दीदी : (जबर्दस्त सूचना करत) तू पुण्यातून का नाही उभा राहात? नाही तरी आपल्याला तिथं उमेदवार कुठे मिळतोय?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com