मुलाखतीनंतरची मुलाखत! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
बुधवार, 3 एप्रिल 2019

(आम्ही न घेतलेली...)

(आम्ही न घेतलेली...)

देशाच्या राजकारणाचा चेहरामोहरा बदलून टाकणारी, जागतिक पातळीवर एक प्रकारचा भूकंप घडवून आणणारी जगातली सर्वांत स्फोटक, धगधगती मुलाखत घेण्याचा मान आम्हाला मिळाला, हा आमचा गौरवच म्हणावा लागेल. आमच्या परंप्रिय साहेबांची ही मुलाखत घेण्यासाठी आम्ही (अर्थातच) प्रचंड पूर्वतयारी केली होती व अनेक अभ्यासू प्रश्‍न आम्ही विचारले. मिळालेली उत्तरेही तितकीच विद्वत्तापूर्ण आणि गांभीर्यपूर्ण होती, हेही ओघाने आलेच. ह्या ऐतिहासिक मुलाखतीचा एक अंश येथे वानोळा म्हणून देत आहो. सध्या आम्ही इस्पितळाच्या खाटेवर असून तीनेक महिन्यात हिंडू-फिरू लागलो की उर्वरित प्रदीर्घ मुलाखत वाचकांसमोर आणूच.
सुरवात अर्थातच जाम खेळीमेळीने झाली. कारण साहेबांच्या हातात एक चेंडू होता. त्यांनी तो बसल्या बसल्या आमच्याकडे फेकला. आम्ही परत त्यांच्याकडे फेकला. त्यांनी परत आमच्याकडे! असे दोनेक तास चालले. शेवटी चेंडू पलंगाखाली घरंगळत गेल्यानंतर आम्ही दोघांनीही नाद सोडला. येवढे वाकणार कोण? साहेब कोणाहीसमोर वाकत नाहीत आणि आमची वाकण्यासारखी शारीरिक ठेवण नाही. शेवटी काय करायचे? म्हणून मुलाखतीकडे वळलो. पुढे...
आम्ही    :    प्रश्‍न फार महत्त्वाचा आणि गंभीर आहे, साहेब!
साहेब    :    येऊ द्या!
आम्ही    :    आता कसं वाटतंय?
साहेब    :    (खवळून) भयंकर गार वाटतंय! मुंबई म्हणजे ह्या दिवसात शिमलाच! तुमचं काय मत?
आम्ही    :    (घाम पुसत) बरं बरं! ते राहू दे. थेट मुलाखतीलाच सुरवात करू...ब्रेकअपनंतर पुन्हा नव्याने संसार सुरू केलात, त्याबद्दल सांगा ना...
साहेब    :    (दातओठ खात) सगळ्या जोडप्यांना असले पांचट प्रश्‍न विचारता का हो तुम्ही?
आम्ही    :    बरं, तेही राहू दे...युतीमध्ये पंचवीस वर्षं सडली असं तुम्ही म्हणालात. ते का?
साहेब    :    हो, हो, केला! पण तुम्ही का तुमच्या तोंडाची डबडी वाजवताय? ‘सडली’ ह्या शब्दाचा अर्थ समजून घ्या आधी तुम्ही! कुरकुरीत डोसे तव्यावर घालण्याआधी तांदूळ आणि उडीद डाळ भिजवून त्याचं पीठ आंबवावं लागतं! पण आपण आंबूस काहीतरी खातो आहोत, असं म्हणता का तुम्ही तेव्हा?
आम्ही    :    इडली म्हणायचं असेल का तुम्हाला?
साहेब    :    (ठामपणाने) डोसा म्हंजे डोसाच!
आम्ही    :    (बेसावधपणे) चालेल!
साहेब    :    चालेल काय? बाहेर हो रे तू आधी!!
आम्ही    :    (चिकाटीने) ‘मोदी है तो मुमकीन है’ असं म्हटलं जातं! मग त्याच चालीवर ‘‘साहेब है तो टिंब टिंब टिंब’... अर्धवट वाक्‍य पूर्ण करा!
साहेब    :    (मिटक्‍या मारत) साहेब है तो नमकीन है!
आम्ही    :    (दाद देत) वाह! नमकीन म्हणजे ढोकळा, फाफडा, गाठिया, शेव, फरसाण...झालंच तर आपलं ते हे...वडापाव!
साहेब    : (संशयानं) मी नुसती कोटी केली होती! पण तुम्हाला भूक लागली आहे असं दिसतंय!
आम्ही    : नाही हो! युतीची नवी क्‍याचलाइन सांगा ना...
साहेब    : (आदेश देत) पलंगाखाली गेलेला तो चेंडू काढून द्या आधी! मग सांगतो!!
आम्ही    :    (चपळाईने पलंगाखाली शिरत) हां, आता सांगा! काय आहे युतीची नवी क्‍याचलाइन?
साहेब    :    (दाराआडून ब्याट काढून परजत) सांगतो ना सांगतो!!
आम्ही    :    आधी सांगा! चेंडू सापडला असला तरी क्‍याचलाइनशिवाय पलंगाखालून बाहेर येणार नाही!!
साहेब    :    (ब्याट उगारत) क्‍याचलाइन हवी ना? हे घे : दगा देणार नाही, दगा देऊ नका!! दगा दिलात तर...तर...फाट, फाट, फटॅक...फुस्स..!!
आम्ही    :    (निपचित पडण्यापूर्वी) ओय, ओय, ओय!
जय महाराष्ट्र.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial dhing tang british nandi article