जाहीरनामा! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
गुरुवार, 4 एप्रिल 2019

तीर्थस्वरूप अण्णासाहेबांना कोण ओळखत नाही? आयुष्यातली उणीपुरी पन्नास वर्षे ते जनसेवेत अगदी बुडून गेले आहेत. दारिद्य्र, अज्ञान आणि रोगराईने बुजबुजलेल्या समाजाला हात द्यावा आणि नशिबाच्या खातेऱ्यातून त्यांना कायमचे बाहेर काढावे, ह्या एकमेव उद्देशाने गेली पन्नास वर्षे ते झटत आहेत. गरिबी हटली पाहिजे, माझ्या देशबांधवांच्या हातात मुबलक पैसा खुळखुळला पाहिजे, आपल्या महान देशाचे नाव सातासमुद्रापार गाजले पाहिजे, ह्या तळमळीने ते कार्य करत राहिले आहेत.

तीर्थस्वरूप अण्णासाहेबांना कोण ओळखत नाही? आयुष्यातली उणीपुरी पन्नास वर्षे ते जनसेवेत अगदी बुडून गेले आहेत. दारिद्य्र, अज्ञान आणि रोगराईने बुजबुजलेल्या समाजाला हात द्यावा आणि नशिबाच्या खातेऱ्यातून त्यांना कायमचे बाहेर काढावे, ह्या एकमेव उद्देशाने गेली पन्नास वर्षे ते झटत आहेत. गरिबी हटली पाहिजे, माझ्या देशबांधवांच्या हातात मुबलक पैसा खुळखुळला पाहिजे, आपल्या महान देशाचे नाव सातासमुद्रापार गाजले पाहिजे, ह्या तळमळीने ते कार्य करत राहिले आहेत.
‘‘ह्याचसाठी ना आम्ही स्वातंत्र्य मिळवले?,’’ असे त्यांनी कळवळून विचारले की उपस्थितांचे डोळे इमिजिएट पाणावतात. स्वातंत्र्य चळवळीतही ती. अण्णासाहेबांचे मोठे योगदान आहे. तेव्हा चौपाटीवर झालेल्या विशाल सभेत सर्वांत मागल्या रांगेत उभ्या असलेल्या ती. अण्णासाहेबांच्या सर्वांत मागच्या बाजूला सर्वांत पहिले निर्दय पोलिसांचा पहिला दांडका पडला होता...

‘‘हा मुलगा मी देशाला वाहिला!’’ असे उद्‌गार त्यांच्या तीर्थरूपांनी बालपणी (खुलासा : ती. अण्णासाहेबांच्या बालपणी हं! ) काढले होते. ‘देशाला’च्या ऐवजी त्यांनी चुकून ‘गावाला’ असा शब्द वापरल्याचे काही लोक सांगतात; पण ते जाऊ दे. स्वातंत्र्याच्या ओढीने ते वडिलांच्या खिशातील विडीच्या बंडलातील एकच एक विडी सपकन ओढून काढत; पण तेही जाऊ दे.

...कार्यकर्त्यांच्या हट्टाखातर ती. अण्णांनी पुढे राजकारणात प्रवेश केला. कार्यकर्त्यांनीच प्रचंड हट्ट धरल्यामुळे त्यांना सरकारात मंत्रिपदही घ्यावे लागले. ‘‘सत्ता ही विषासमान आहे. जनसेवेचे व्रत घेतलेल्याने खरे तर सत्तेच्या खुर्चीपासून दूर राहिले पाहिजे’’ असे त्यांचे मत अजुनी आहे. पण रयतेची बाजू ठामपणे मांडण्यासाठी कुणीतरी सत्तेत नको का? ती. अण्णा दरवेळी निवडणुकीला उभे राहिले की आपला स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध करतात. पहिल्या निवडणुकीच्या वेळचाच मजकूर ते दरवेळी पुनर्मुद्रित करतात, असा आरोप त्यांचे नतद्रष्ट विरोधक करतात; पण ते जाऊ देच!

गरिबांचा वाली कोण असतो? ज्या रंजल्या गांजल्यांना जो आपुले म्हणतो, तो! ती. अण्णासाहेब ह्या व्याख्येत अचूक बसतात. रंजल्या गांजल्यांनी सदैव आपल्यापाशी राहावे, आपण त्यांच्यापाशी राहावे, ह्याची ते नेहमी काळजी घेतात. इतकेच नव्हे, तर ते पिढ्यानपिढ्या रंजले गांजले राहावेत, ह्याचीही ते काळजी घेतात. त्यामुळे साहजिकच रंजल्या गांजल्यांना तेच आपले प्रतिनिधी म्हणून हवे असतात.
यंदाच्या निवडणुकीलाही ती. अण्णासाहेब उभे आहेत. ‘जनमंदिर’ हा त्यांचा छोटेखानी बंगला म्हणजे कार्यकर्त्यांचे दुसरे घरच म्हणावे लागेल. छोटेखानी बंगल्याला बारा एकराचे छोटे आवारदेखील आहे आणि मागल्या बखळीत ती. अण्णासाहेबांचे हेलिकॉप्टर सदैव उभे असते. बंगल्याबाहेर ती. अण्णांसाठी चौदा परदेशी गाड्या उभ्या आहेत, पण ती. अण्णा स्वत: मात्र साधीशी मर्सिडिझच वापरतात.

‘‘हे सारे माझे नाही... माझ्या जनतेचे आहे!’’ असे ते निर्ममपणे म्हणतात. किती खरे आहे! कारण ह्या स्थावर जंगम प्रॉपर्टीपैकी काहीही त्यांनी स्वत:च्या नावावर ठेवलेले नाही. त्यांचा राहता (छोटेखानी) बंगलासुद्धा त्यांच्या ड्रायव्हरच्या नावे आहे!! त्यांना धनसंपदेची विलक्षण चीड आहे. ते म्हणतात : ‘‘नोटा काय जाळायच्या आहेत?’’ गेल्या नोटाबंदीच्या वेळी त्यांनी संतापून शेकडो कोटींच्या नोटा खरोखर जाळल्या होत्या, हे किती लोकांना माहीत आहे? पण ते आता जाऊ दे.
ती. अण्णांचा यंदाचा जाहीरनामा सांगतो, की गरिबी नष्ट व्हायला हवी. गरिबाच्या घरी शौचालय हवे. गरिबाच्या खात्यात पैसे हवेत आणि सैपाकघरात ग्यासही हवा! गरिबाचे कर्ज हे माझे कर्ज!! गरिबाची सेवा हीच खरी सेवा...
ह्या बदल्यात ती. अण्णासाहेबांना हवे तरी काय असते? तर तुमचे एक साधेसे मत! द्याल ना?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial dhing tang british nandi article