काळ्या पेटीचे रहस्य! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
मंगळवार, 16 एप्रिल 2019

देशाचे प्रधानसेवक श्रीमान नमोजी ह्यांनी आठवड्याभरापूर्वी कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे प्रचार सभा घेतली. त्या सभेसाठी ज्या हेलिकॉप्टरमधून ते आले, त्यातून एक संशयास्पद, गूढ एवं काळ्या रंगाचा एक पेटारा गपचूप बाहेर काढण्यात आला व जवळच उभ्या असलेल्या आणखी एका संशयास्पद, गूढ एवं पांढऱ्या रंगाच्या मोटारीतून वेगाने नेण्यात आला. ह्या घटनेने देशभर खळबळ माजली. ह्या पेटाऱ्यात नेमके काय असावे? ह्याबद्दल उलटसुलट अंदाज व्यक्‍त करण्यात आले. अत्यंत विचलित झालेल्या कांग्रेस पक्षाने तांतडीने निवडणूक आयोगाकडे तक्रार करुन चौकशीची मागणी केली.

देशाचे प्रधानसेवक श्रीमान नमोजी ह्यांनी आठवड्याभरापूर्वी कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे प्रचार सभा घेतली. त्या सभेसाठी ज्या हेलिकॉप्टरमधून ते आले, त्यातून एक संशयास्पद, गूढ एवं काळ्या रंगाचा एक पेटारा गपचूप बाहेर काढण्यात आला व जवळच उभ्या असलेल्या आणखी एका संशयास्पद, गूढ एवं पांढऱ्या रंगाच्या मोटारीतून वेगाने नेण्यात आला. ह्या घटनेने देशभर खळबळ माजली. ह्या पेटाऱ्यात नेमके काय असावे? ह्याबद्दल उलटसुलट अंदाज व्यक्‍त करण्यात आले. अत्यंत विचलित झालेल्या कांग्रेस पक्षाने तांतडीने निवडणूक आयोगाकडे तक्रार करुन चौकशीची मागणी केली. काळ्या पेटीचे हे गूढ उकलण्याची क्षमता फक्‍त तुमच्या ठायीच आहे, असे सांगत आम्हाला तपासासाठी गळ घालण्यात आली. आम्हाला नाही म्हणता येईना!! अखेर हे गूढ आम्ही साधारणत: साडेतीन मिनिटांत सोडवले. त्याचीच चित्तथरारक तपासकथा येथे थोडक्‍यात सांगत आहो. त्याचे असे झाले की...
कांग्रेस प्रवक्‍त्याने आम्हाला सदर केसचे ब्रीफिंग देताना ‘त्या पेटाऱ्यात काय असावे?’ ह्या प्रश्‍नाखातर तीन शक्‍यता व्यक्‍त केल्या. एक, त्या पेटाऱ्यात चिक्‍कार पैसा दोन हजारांच्या नोटेच्या स्वरूपात असावा. दोन, राफेल विमान खरेदीची वादग्रस्त कागदपत्रे असावीत. तीन, खुद्द कमळाध्यक्ष अमितभाई शहा त्या पेटीत दडून गपचूप आले असावेत.

...हे ऐकून आम्ही डाव्या गालात मुस्करलो. (कां की कॅप्टन झुंजार असाच मुस्करत असे.) एक सिगारेट पेटवावी असा विचार मनात आला होता. त्या दृष्टीने आम्ही काही हालचालीही केल्या. परंतु, तो बेत आम्हाला रद्द करावा लागला. कां की कांग्रेस प्रवक्‍त्याच्या खिश्‍यात असले काही नव्हते!! आडात नाही, ते पोहऱ्यात कोठून यावे? खिशात नाही, ते ओठात कोठून यावे? शेवटी आम्हीच खिशातून एक प्रकारचे चैतन्यचूर्ण काढून मळायला घेतले...
‘‘त्या पेटीत काळा पैसा असणार, हे उघड आहे!’’ कांग्रेस प्रवक्‍ते दातओठ खात म्हणाले. काळा पैसा म्हटले की कांग्रेसवाल्यांना शिळक येत्ये. (हेही उघड आहे.) आम्ही पुन्हा मुस्करलो.

‘‘त्या पेटीला काळा रंग आधी लावला की नंतर, त्यावर ते ठरेल!’’ आम्ही शक्‍यता धुडकावली. पैसे आधी पेटीत ठेवून नंतर काळा रंग फासला, तर रंग लागून तो पैसा काळा होऊ शकतो, हे वैज्ञानिक सत्य आम्हाला माहीत होते. ती पेटी नंतर पांढऱ्या रंगाच्या मोटारीत ठेवण्यात आली, ह्याकडेही आम्ही लक्ष वेधले. आमच्या बुद्धिमत्तेने स्तिमित झालेल्या कांग्रेस प्रवक्‍त्याने घाम पुसत दुसरी शक्‍यता विचारात घेतली.
‘‘राफेलची कागदपत्रं असणार...त्यातली काही चोरीला गेली आहेत!’’ प्रवक्‍ता म्हणाला. आम्ही पुन्हा मुस्करलो. राफेलची कागदपत्रे सुरक्षित आहेत, हे आम्हाला आधीच ठाऊक होते. पण हे गुपित आम्ही कशाला फोडू?
‘‘फू:!! काया पेटायाट सॉतॉठ कॉगुद पॉक...ब्रुक फ्रुफ्रु...फिक...’’ आम्ही ठामपणाने त्यांचा युक्‍तिवाद धुडकावला. मुखातील चैतन्यचूर्णामुळे उच्चार अंमळ वेगळे आल्याने गोंधळलेल्या प्रवक्‍त्याने खिशातून निमूटपणे रुमाल काढून आपला सदरा वगैरे पुसले. त्यांचा चेहरा क्रुद्ध झाला होता.
‘‘मग त्या काळ्या पेटीत आहे तरी काय?’’ त्याने संतापाने विचारले.
‘‘निवडणूक दौऱ्यात कपडे धुवायचे राहून जातात बऱ्याचदा!’’ आम्ही सुचवले. एव्हाना आम्ही तोंड मोकळे करून आलो होतो.
शेवटी हतबल होऊन प्रवक्‍ता उठून गेला. आम्ही तोवर पेटाऱ्यातील ऐवज हुडकून काढला होता. राफेलची खरीखुरी किंमत, बेरोजगारी, दरवाढ, किसानांच्या आत्महत्या आणि कायमस्वरूपी घरी राहायला आलेली कडकी, अशा अनेक मुद्‌द्‌यांचे अवजड सामान त्या काळ्या पेटाऱ्यात कुलुपबंद होते, हे आम्ही नाही ओळखणार तर कोण?

Web Title: editorial dhing tang british nandi article