हे मौला! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
शनिवार, 20 एप्रिल 2019

हे मौला, तू सोडव गा
ही अवकाळाची गणिते
अंधाऱ्या वाटेवरती
तू पेटव ना ते पलिते

भेगाळ भुईच्या पोटी
दडलेले उष्ण उसासे
माध्यान्ही कण्हते सृष्टी
शेवटल्या श्‍वासासरिसे

विहिरींचे सुकले कंठ
वाऱ्याला नुरले त्राण
माळावर निवडुंगाचे
करिते का कुणि अवघ्राण?

भेगांचे दूर नकाशे
भूवरी कोण आखेल?
शुष्काच्या साम्राज्याची
सरहद्द कुठे संपेल?

निष्प्राण घरांच्या ओळी
वर सुजलेले आभाळ
अज्ञात चेटकी नाचे
वाजती पायीचे चाळ

हे मौला, तू सोडव गा
ही अवकाळाची गणिते
अंधाऱ्या वाटेवरती
तू पेटव ना ते पलिते

भेगाळ भुईच्या पोटी
दडलेले उष्ण उसासे
माध्यान्ही कण्हते सृष्टी
शेवटल्या श्‍वासासरिसे

विहिरींचे सुकले कंठ
वाऱ्याला नुरले त्राण
माळावर निवडुंगाचे
करिते का कुणि अवघ्राण?

भेगांचे दूर नकाशे
भूवरी कोण आखेल?
शुष्काच्या साम्राज्याची
सरहद्द कुठे संपेल?

निष्प्राण घरांच्या ओळी
वर सुजलेले आभाळ
अज्ञात चेटकी नाचे
वाजती पायीचे चाळ

हे मौला, तू बघशील
धुगधुगे आतला जीव
गरतीच्या भव्य कपाळी
फटफटले ना हे दुर्दैव

हे जीवित खुडबुडणारे
धडपडते श्‍वासासाठी
देहात कोंडला प्राण
ओरडतो पाण्यासाठी

कुणी देईल का हो माझ्या
ओठात जळाचे थेंब
बाहेर सरींचा भास
वाजतसे कानी चिंब

बेभान झळांच्या ओठी
कुठलेसे गीत बकाल
ही करुण सुरावट कुठली
अन्‌ चुकलेला हा ताल

माळावर एकुटवाणा
तो वृक्ष उभा का जळतो
शुष्काचे कवच उकलते,
दु:खाचा द्रव भळभळतो

निष्पर्ण मनाच्या खाचा
डोळ्यात उतरतो डोह
जगण्याची नुरली चिंता
मरणाचा होतो मोह

गुलमोहर का फुलतो अन्‌
पळसाला लागे वेड
ह्या मरणसोहळ्यापायी
कर्जाची उलटी फेड

ह्या अफाट माळावरती
झाडाची एकच फांदी
गुणगुणते अस्तित्वाच्या
उगमाची नवीन नांदी

झाडाच्या बुडख्याखाली
हे हडाडलेले ढोर
निर्वस्त्र उन्हाच्या संगे
मातीत खेळते पोर

गावात घरोघर आता
ह्या उन्हाउन्हाच्या गाथा
ल्या कौलारातून
हा अग्नि जाळितो माथा

हे मौला आवर आता
हा साकळला अवकाळ
गाईच्या डोळ्यांमध्ये
पाण्याची स्वप्न पखाल

हे मौला, तू सोडव गा
ही अवकाळाची गणिते
अंधाऱ्या वाटेवरती
तू पेटव ना ते पलिते


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial dhing tang british nandi article