सुप्त लाटेची गाज...! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

आजची तिथी : विकारीनाम संवत्सर चैत्र शुद्ध पंचमी.
आजचा वार : एव्हरीडे इज संडे!
आजचा सुविचार : लाटांच्या लाटालाटीत
        एकच दीपस्तंभ खराखुरा,
        नमोजी म्हंजे शिंपल्यातला मोती,
        बाकी सगळा वाहून आलेला कचरा!
.............................
नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) गेले काही दिवस कानामध्ये कुणीतरी फुंकर मारल्यासारखा आवाज येतो आहे. वर्णन करणे अवघड आहे. दूरवर कुणाकडे तरी कुकर लावला असेल, असे सुरवातीला वाटले. दुर्लक्ष केले. पण दिवसरात्र कुकर लावणारे हे घर कुठले असेल? कोड्यात पडलो.
कानात काडी घालून पाहिली. लसणीचे तेल घालून पाहिले. पण छे! मधून मधून आवाज येतच होता. शेवटी कानात कापसाचे बोळे घातले. प्रचाराच्या दौऱ्यात एकदा आमचे कविवर्य आठवलेजी भेटले. त्यांना विचारले तर म्हणाले, ‘‘चौपाटीवर जा, तिथे काढून देतात कानातला मळ... मोदीजींच्या पुण्याईने उगवेल भारतात पुन्हा कमळ!’’
‘‘आँ?’’ मी म्हणालो.
‘‘काँग्रेसच्या चिखलात उगवली कमळे, आधी काढा तुमच्या कानातले बोळे!’’ ते म्हणाले. मी ओशाळून कान रिकामे केले. त्यांचा सल्ला कानाआड केला. लांब दांडी कानात घालून हळूवारपणे फिरवली की छान गुंगी लागते असे ते सांगत होते! असेल असेल...मी काही चौपाटीवर गेलो नाही.
आमचे मंत्रिमंडळातले सहकारी श्रीमान गिरीशभाऊ महाजन ह्यांना प्रकृतीचे छान कळते. त्यांनाही विचारून पाहिले. ते म्हणाले, ‘‘आंघोळीच्या वेळी कानावर पाण्याचे हाबके मारा...मीही असंच करतो!’’ तेही करून पाहिले. दोन दिवस कानात दडे बसले!! कानात पाणी राहून गेले असेल, म्हणून मान तिरकी करून एका पायावर उड्या मारून पाहिल्या. पण चारचौघांत अशा किती उड्या मारणार? बरे दिसत नाही. आचारसंहितेमुळे सध्या काम बरेच कमी आहे, म्हणून बरे! नाहीतर पंचाईत झाली असती! भर क्‍याबिनेट मीटिंगमध्ये कोण तरी आपल्या कानात फुंकर मारते आहे, ही कल्पनाच मला सहन होत नाही. अर्थात, तसा मी हलक्‍या कानाचा नाही की कोणीही उठून माझे कान फुंकावेत!! जाऊ दे.
प्रचाराच्या कामात जसजसा बिझी होत चाललो आहे, तसतसा कानातला आवाजही गडद होत चालला आहे. जणू काही एखादा अज्ञात रेडिओ कानात खरखरतो आहे. आश्‍चर्य म्हणजे टीव्ही बघताना, पेपर वाचताना, भाषण करताना हा आवाज बंद होतो. जरा शांत झाले की पुन्हा गूं गूं गूं गूं सुरू!! हा काय प्रकार असेल? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या कानात आवाज येतात, ही बातमी बाहेर फुटली तर हाहाकार उडेल, असे वाटून मी आधी कुणाला फारसे बोलत नव्हतो.
आमचे ज्येष्ठ सहकारी श्रीमान चंदुदादा कोल्हापूरकर हे अनुभवी गृहस्थ असल्याने शेवटी त्यांनाच सल्ला विचारला.
‘‘कसला आवाज येतो हो हा कानात?’’ हे वाक्‍य उच्चारण्याआधी आम्ही बोळे काढून ठेवले होते, हे सांगणे नलगे! त्यांनी आमच्या कानाजवळ कान आणून बारकाईने ऐकले.
‘‘मलाही ऐकू येतोय तो आवाज..!’’ थोड्या वेळाने त्यांनी जाहीर केले. मला खूप बरे वाटले.
‘‘समुद्राच्या लाटेसारखा येतोय...नै?’’ मी.
‘‘लाटेसारखा काय? सुप्त लाटच आहे ती आपल्या नमोजींची!’’ त्यांनी गौप्यस्फोट केला. इतके हायसे वाटले म्हणून सांगू!!
...तेव्हापासून मी महाराष्ट्रात सर्वच्यासर्व ठिकाणी कमळे फुलणार असे आत्मविश्‍वासाने सांगू लागलो. नमोजींची सुप्त लाट आहे, खरोखर आहे... नीट कान देऊन ऐकणाऱ्याला बरोब्बर ऐकू येते. आता आमच्या विरोधकांचेच कान फुटले आहेत, त्याला आम्ही काय करणार?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com