बागूलबुवा! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
शनिवार, 11 मे 2019

प्रिय बोंधु ओरोबिंदोबाबू, नोमोश्‍कार, दिल्लीत प्रोचार जोरात सुरू आहे हे कळले. उघड्या जीपमोधून फिरताना काळजी घ्यावी. रात्र वैऱ्याची आहेच; पण दिवस राक्षसाचा आहे! एका माणसाने जीपच्या बॉनेटवर चढून तुम्हाला लोकशाही थप्पड लगावली, ते बोघून दु:ख झाले. आपल्या महागठबंधनचे शोत्रू किती भोयोंकर आहेत, ह्याची जाणीव झाली. तुम्ही काळजी घ्यावी. नमोबाबू आणि ओमितबाबू ह्यांना अनुक्रमे दगडमातीचे लाडू आणि चिखलाची शोंदेश मिठाई पाठवत आहे. त्यांचे ऑपोऑप तोंड फुटेल. नाहीतरी ह्या इलेक्‍शोनमध्ये त्यांना लोकशाही थप्पड जनता लगावणारच आहे. आपली एकजूट अभेद्य होती, आहे आणि राहील.

प्रिय बोंधु ओरोबिंदोबाबू, नोमोश्‍कार, दिल्लीत प्रोचार जोरात सुरू आहे हे कळले. उघड्या जीपमोधून फिरताना काळजी घ्यावी. रात्र वैऱ्याची आहेच; पण दिवस राक्षसाचा आहे! एका माणसाने जीपच्या बॉनेटवर चढून तुम्हाला लोकशाही थप्पड लगावली, ते बोघून दु:ख झाले. आपल्या महागठबंधनचे शोत्रू किती भोयोंकर आहेत, ह्याची जाणीव झाली. तुम्ही काळजी घ्यावी. नमोबाबू आणि ओमितबाबू ह्यांना अनुक्रमे दगडमातीचे लाडू आणि चिखलाची शोंदेश मिठाई पाठवत आहे. त्यांचे ऑपोऑप तोंड फुटेल. नाहीतरी ह्या इलेक्‍शोनमध्ये त्यांना लोकशाही थप्पड जनता लगावणारच आहे. आपली एकजूट अभेद्य होती, आहे आणि राहील. निवडणूक जिंकल्यानंतर प्रोधानमोंत्री कोण, हे ठरवण्यासाठी भेटूच. तोपर्यंत अनेकानेक शुभेच्छा. आपनी दीदी. मोमतादीदी.
* * *
आदरणीय दीदी, शतशत प्रणाम. एवढ्या तुंबळ प्रचारात वेळात वेळ काढून तुम्ही पत्र पाठवून माझी विचारपूस केली, आभार! जी खंबीर व्यक्‍ती प्रत्यक्ष पंतप्रधानाला ‘मला वेळ नाही’ असे सांगते, त्या व्यक्‍तीने आपुलकीने आपल्या तब्बेतीची चौकशी करावी, हे निश्‍चितच दिलासा देणारे आहे. हल्ली मी उघड्या जीपच्याऐवजी (उघडा) ट्रक प्रचारासाठी वापरायला सुरवात केली आहे. ट्रकची उंची जास्त असते. माझ्यापर्यंत पोचणाऱ्या शत्रूच्या माणसास उडी मारून माझ्यापर्यंत पोचता येणे कठीण जाईल. तसा तो आलाच तरी मी सावध असेन! एका हाताने मी सलाम करतो, हात हलवून अभिवादन स्वीकारतो. दुसऱ्या हातात मी हेल्मेट पकडलेले असते. मी हेल्मेट घालूनच प्रचाराला बाहेर पडावे, अशी सूचना मला चंद्राबाबू नायुडु ह्यांनी (फोन करू) केली. ते थोडे अवघड आहे, असे मी त्यांना सांगितले. असो.

एक साधासुधा सिंपल आम आदमी आहे. मला माझी काळजी नाही. काळजी आहे ती मतदारांची, देशाच्या जनतेची आणि आपल्या महागठबंधनवाल्या पुढाऱ्यांची. ह्या निवडणुकीत मोदीजी पुन्हा निवडून येऊन पंतप्रधान झाले, तर त्यांच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री म्हणून अमित शहाजी येतील!! ह्याच्याइतके धोकादायक काहीही नाही, दीदी...काहीही नाही!! नुसती कल्पना करा की अमितभाई गृहमंत्री झाले आहेत...नुसत्या कल्पनेने अंगावर काटा येतो की नाही बघा!! त्यांच्याकडे आत्ताच बघितले तरी डेंजर वाटते. गृहमंत्री झाल्यानंतर आपल्या सर्वांना ते का सुटे सोडतील? तेव्हा काहीही करून ह्या जोडगोळीला सत्तेवर येण्यापासून रोखायला हवे. तशा अर्थाचे ट्‌विट मी सकाळीच केले आहे. ते जनतेला उद्देशून असले, तरी प्रत्यक्षात ते आपल्या महागठबंधनवाल्या सहकाऱ्यांसाठी आहे. ग्रहांची साथ मिळाली नाही तर ही जोडगोळी पुन्हा दिल्लीत पाच वर्षे ठाण मांडून बसेल. आणखी पाच वर्षे ह्यांना कोण झेलणार? तुम्ही बंगालात राहाल, चंद्राबाबू हैदराबादेत, मी मात्र मधल्यामध्ये त्यांच्या तावडीत सापडण्याची शक्‍यता आहे. मारकुटे मास्तर हातातले डस्टर सर्वांत जवळ बसलेल्या विद्यार्थ्याच्या डोक्‍यात हाणतात, त्यातला प्रकार होईल. छे, माझ्या हातातले हेल्मेट इतक्‍या लौकर सुटायची शक्‍यता दिसत नाही...

मतदान आता जवळपास अंतिम टप्प्यात पोचले असून २३ तारखेला मतमोजणी होणार असल्याने आपल्या सर्वांच्याच छातीतील धडधड वाढली असेल. माझ्या हृदयाचे ठोके मिनिटाला १४४ पडत असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. एका सिंपल आम आदमीच्या छातीत इतके धडधडत असेल तर तुमचे काय होत असेल? मला चिंता वाटते. यदाकदाचित २३ तारखेला काही विपरीत घडले तर तुम्ही लोकांनीही माझ्यासारखे हेल्मेट बाळगावे, अशी माझी आपुलकीची सूचना आहे. कळावे. आपला. आम आदमी.
ता. क. : दगडमातीचे लाडू पाठवलेत की प्लीज कळवा! मी लग्गेच ट्‌विट करीन!! थॅंक्‍यू. आ. आ.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial dhing tang british nandi article