ढिंग टांग : आपलं ठरलंय ना?

dhing tang
dhing tang

स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे संस्थान.
वेळ : ठरलेली! काळ : ठहरलेला!
प्रसंग : गोठलेला.
पात्रे : सौभाग्यलंकारमंडित वज्रचूडेमंडित सौभाग्यवती कमळाबाईसाहेब आणि साक्षात राजाधिराज उधोजी महाराज!
...............
(बाईसाहेबांच्या अंत:पुरात गडबड उडाली आहे. झोपाळ्यावर टेचात बसून बाईसाहेब भराभरा फर्माने रवाना करीत आहेत. एकीकडे फोन घेऊन ‘‘होक्‍का? चालणार नाही... नाही म्हंजे नाही...’’ असे निक्षून दर्डावत आहेत. तेवढ्यात उधोजीराजे प्रविष्ट होतात आणि सतरंजीत पाय अडकून धडपडतात. अब आगे...)
उधोजीराजे : (सर्रकन तलवार उपसत) खबर्दार! ही सतरंजी पुन्हा इथं कोणी ठेवली? ह्या सतरंजीच्या दशेत आंगठा अडकून आम्ही नेहमी अडखळतो, हे किती वेळा सांगायचं? सतरंजी हांतरणाऱ्याचे इथल्या इथे मुंडके मारले जाईल!!
कमळाबाई : (थंडपणे) आलात? या!!
उधोजीराजे : (बाईसाहेबांना बघून नरम येत) एक माणूस आमची वाट पाहात होतं का?
कमळाबाई : (पुटपुटत) अडलंय खेटर! (उघडपणे) हो त्तर!! ज्याप्रमाणे पावश्‍या पक्षी पावसाची वाट पाहाऽऽऽत असतो, तश्‍शीच आम्हीही वाट बघत होतो बरं का!!
उधोजीराजे : (खुश होत) तरीच!
कमळाबाई : (डोळे मिटमिटत) तरीच काय?
उधोजीराजे : (मिशीवर बोट फिरवीत खट्याळपणे) आम्हाला तिकडं उचकी लागली होती!!
कमळाबाई : (शहाजोगपणे) तिकडे कुठे?
उधोजीराजे : (खुलासा करत) आमचे सगळे यशस्वी सरदार-दरकदार घेऊन आम्ही देवदर्शनाच्या सहलीला गेलो होतो ना! एकवीराआई झाली, तुळजाभवानी झाली, झालंच तर कोल्हापूरची अंबाबाई झाली... आता अयोध्येला प्रभू रामाच्या चरणी निघालो आहोत!
कमळाबाई : (अहंमन्यपणे दुर्लक्ष करत) चला, आम्ही का तुमच्यासारखे देवळं पुजायला रिकामे आहोत? कित्ती कामं पडलीत! आम्हीही तुमच्यासारखे असे हिंडू लागलो तर दौलतीचा कारभार कोण हाकेल?
उधोजीराजे : (संयम सुटून) ही दौलत तुम्हाला आमच्यामुळे मिळाली, हे विसू नका!! आम्ही मनोमिलनासाठी रुकार दिला, म्हणून तुम्हाला हे अच्छे दिन पुन्हा दिसत आहेत! जरा तोंड सांभाळून बोलत चला!! कळलं?
कमळाबाई : (लब्बाडपणे) ते विसरून कसं चालेल आम्हाला? चांगली चार-पाच वरसं तुमची बोलणी खात सासुरवास भोगला! अपमान आणि विटंबनेचं दु:ख पदरात घेत निमूटपणे ऱ्हायल्ये! तुम्ही धुतकारलेत तरी शेवटपर्यंत स्वारीचे चरण सोडले नाहीत! ‘एकच प्याला’ नाटकातल्या सुधाकराची सिंधू लाजेल, अशी परायणता दाखवली मी! त्या तपश्‍चर्येचं फळ म्हणून कारभार आमच्या हाती आला आहे!!
उधोजीराजे : (गोरेमोरे होत) बरं ते राहू दे! दिल्लीचं तुमचं तख्त शाबूत राहिलं! तुमच्या मनासारखं झालं! आता ह्या महाराष्ट्रात आमच्या मनासारखं होऊ द्या, म्हंजे गंगेत घोडं न्हालं म्हणायचं!! (इकडे तिकडे बघत) जरा कान इकडे करा!...(कानात मोठ्यांदा) आपलं ठरलंय नाऽऽऽ...?
कमळाबाई : (चटकन बाजूला होत) इश्‍श! केवढ्यांदा ओरडताय कानात? दडा बसला ना आमचा!!
उधोजीराजे : (आवाज खाली आणत) आपलं ठरलंय नाऽऽऽ...?
कमळाबाई : (वस्सकन) काय ठरलंय?
उधोजीराजे : (हबकून) विसरलात की काय?
कमळाबाई : (मखलाशी करत) काही तरी ठरलं होतं खरं! पण नेमकं आठवतच नाहीए बै!!
उधोजीराजे : (घाबरून) अहो, असं काय करताय?
कमळाबाई : (चुटकी वाजवत) हां, आठवलं!
उधोजीराजे : (चेहरा उजळून) सांगा बरं... एकदा सांगाच! तुमच्या तोंडून ऐकलं की अवघ्या महाराष्ट्राचा जीव भांड्यात पडेल!
कमळाबाई : (सहजपणे) हेच की... महाराष्ट्रात आम्ही कारभार पाहायचा आणि तुम्ही देवदर्शनाच्या सहलीला जायचं! असंच ठरलंय ना?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com