ढिंग टांग : कौन बनेगा मुख्यमंत्री?

ब्रिटिश नंदी
बुधवार, 12 जून 2019

आजची तिथी : विकारी नाम संवत्सरे श्रीशके १९४१ ज्येष्ठ शुद्ध नवमी.
आजचा वार : मंडेवार.
आजचा सुविचार : नमो मुखे म्हणा। नमो मुखे म्हणा।
पुण्याची गणना। कोण करी।।
कमळाच्या मिषें। मीची गा सीएम।
बाकीच्यांचा नेम। चुकलाचि।।

.............................
नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (रोज १०८ वेळा लिहिणे.) खरे पाहता मला मुख्यमंत्रिपदात बिलकुल स्वारस्य नाही. मराठी रयतेची सेवा करण्याची संधी मिळते म्हणून मी त्या खुर्चीवर बसतो इतकेच. (मी त्या खुर्चीत बसलो की अनेकांना उगीचच मिर्ची लागते.) पण मला महाराष्ट्रात पर्याय तरी कुठे आहे? जाऊ दे.

आजची तिथी : विकारी नाम संवत्सरे श्रीशके १९४१ ज्येष्ठ शुद्ध नवमी.
आजचा वार : मंडेवार.
आजचा सुविचार : नमो मुखे म्हणा। नमो मुखे म्हणा।
पुण्याची गणना। कोण करी।।
कमळाच्या मिषें। मीची गा सीएम।
बाकीच्यांचा नेम। चुकलाचि।।

.............................
नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (रोज १०८ वेळा लिहिणे.) खरे पाहता मला मुख्यमंत्रिपदात बिलकुल स्वारस्य नाही. मराठी रयतेची सेवा करण्याची संधी मिळते म्हणून मी त्या खुर्चीवर बसतो इतकेच. (मी त्या खुर्चीत बसलो की अनेकांना उगीचच मिर्ची लागते.) पण मला महाराष्ट्रात पर्याय तरी कुठे आहे? जाऊ दे.
दिल्लीहून आल्यानंतर स्फुरण चढल्यासारखे झाले आहे. सार्वत्रिक निवडणुकांमध्ये जबर्दस्त यश मिळवल्यानंतर खुद्द श्रीमान मोटाभाईंनी पाठ थोपटली. ‘आता लक्ष्य विधानसभेकडे’ असा मंत्रही दिला. आगामी निवडणुकांसाठी टार्गेट निश्‍चितीसाठी मोटाभाईंनी दिल्लीत मीटिंग बोलावली होती. आमचे मोटाभाई पक्षाध्यक्ष नसते तर एखाद्या कोचिंग क्‍लासचे सर झाले असते! शंभरपैकी नव्वद टक्‍के मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला ते शंभरपैकी शंभर कां मिळवले नाहीत, म्हणून ओरडले असते!! परवा तसेच झाले... मीटिंगसाठी गेलो तेव्हा मोटाभाईंचे दर्शन झाले. गेल्या गेल्या त्यांनी ‘‘आवो आवो, सीएम!’’ अशा शब्दांत स्वागत केले. मी नमस्कार केला. विधानसभेला मित्रपक्षासोबत आमचे सगळे ठरले आहे, औंदा विजयाचा दणका मारणारच, अशी गॅरंटीही दिली. साक्षात मा. उधोजीसाहेबांसारखा पाठीराखा उभा असल्यावर का नाही द्यायची ग्यारंटी? असो.
‘‘आवती चूंटणीमां केटला नंबर आणणार?’’ त्यांनी भिवया उडवत विचारले.
‘‘अब की बार २२९ पार!’’ मी त्वेषाने म्हणालो. त्यांनी भेदक नजरेने माझ्याकडे पाहिले.
‘‘ए ना च्याले...ज्यादा आणायच्या! आगळा सीएम आपडोज जोईए...सांभळ्यो?,’’ त्यांनी दर्डावून सांगितले.
...मोटाभाईंनी असे म्हटल्याची बातमी मीडियात फुटली आणि इकडे मुंबईत कहर झाला. मुंबईत परतेपर्यंत उधोजीसाहेबांचे मोजून बारा मिस्ड कॉल होते. शेवटी त्यांना फोन करून ही अफवा असल्याचे सांगितले. समान वाटपाचे आपले ठरले आहे, अशी जाणीव त्यांनी पुन्हा एकदा करून दिली.
...बातमी फुटली, तेव्हा मा. उधोजीसाहेब कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला सहकुटुंब सहखासदार गेले होते. साहजिकच त्यांचे पित्त खवळले असावे! कारण त्या देवदर्शन दौऱ्यामध्ये-
‘‘नणंदेचं कार्ट किरकिर करितं,
खरुज होऊ दे त्याला,
भवानीआई रोडगा वाहीन तुला’’
...हे सुप्रसिद्ध रोडगागीत सामूहिकरीत्या म्हणण्यात आल्याचे मला कळले. आता नणंद कोण?, नणंदेचे कार्टे कोण?, हे महाराष्ट्रात कोणीही सांगेल!! जाऊ दे. मी फार मनावर घेणार नाही.
मित्रपक्षाची नाराजी आहेच, पण पुढल्या टर्ममध्ये घवघवीत यश मिळवूनही मुख्यमंत्रिपद मित्रपक्षाला द्यावे लागणार असेल, तर मग निवडणूक लढवाच तरी कशाला? ह्या निर्वाणीच्या पवित्र्यात आमच्याकडची काही मंडळी आली आहेत.
एकंदरीत पुढला काळ संघर्षाचा असणार, हे नक्‍की.
आंध्र प्रदेशात नवनिर्वाचित मुख्यमंत्री जगनमोहन ह्यांनी पाच-पाच उपमुख्यमंत्रिपदे निर्माण केली आहेत. असे उपमुख्यमंत्र्यांचे कळप नेमून विषय मिटवावा, असा एक विचार बळावू लागला आहे. ह्यातून राज्याचा विकास कसा साधणार, हा प्रश्‍न असला तरी असंतुष्टांना शांत करण्यासाठी तो पर्याय असतोच.
पाच उपमुख्यमंत्रीपदाचा तोडगा मा. उधोजीसाहेबांपुढे ठेवून बघावा म्हणतो! बघूया, काय म्हणतात ते!! काहीही असले तरी मुख्यमंत्री एकच राहणार आणि तो मीच असेन! दुसरा पर्याय तरी काय आहे?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial dhing tang british nandi article