ढिंग टांग : खुर्ची!

dhing tang
dhing tang

बाळासाहेबांना सकाळी जाग आली. काय करायचे आहे लौकर उठून? असा विचार करून त्यांनी कूस बदलली. तेवढ्यात आठवले, आज अधिवेशनाचा दिवस! मा. बाळासाहेब ताडकन उठून बसले. बाप रे! आज केवढे तरी काम आहे...
दुष्काळावरून सरकारला धारेवर धरायचे आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्त्यांबद्दल काय केलेत ते सांगा, असा खडसून जाब विचारायचा आहे. ‘गृहनिर्माणाच्या कामात हजारो कोटींचा घपला केलात, हे घ्या त्याचे पुरावे’, असे ठणकावून भरसभागृहात कागद फडकवायचे आहेत. जमले तर राजदंड वगैरे पळवण्याचाही बेत पार पाडायचा आहे. काहीच नाही जमले तर किमान सभागृहाच्या पायऱ्यांवर बसून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात घोषणाबिषणा द्यायच्या आहेत. विरोधी पक्षनेता म्हणून ही सारी आपली कर्तव्येच तर आहेत...

बाळासाहेब उठले. लगबगीने तोंडबिंड विसळून आंघोळबिंघोळ करून नाश्‍ताबिश्‍ता करून ते तयारबियार झाले. मनात विचारांची शृंखला सुरूच होती. लेकाचे नतद्रष्ट सत्ताधारी! चोर, लुटेरे!! माझा आख्खा महाराष्ट्र विकून खाल्ला ह्या लोकांनी!! बिचारी रयत स्वत:च्याच राज्यातून परागंदा होण्याची वेळ आली, पण ह्यांची सत्तेची धुंदी काही उतरत नाही. हे ठग आहेत, ठग... ह्यांना धडा नाही शिकवला तर विरोधी पक्षनेता बाळासाहेब म्हणून नाव लावणार नाही. बघतोच एकेकाला.
सत्ताधाऱ्यांच्या विरोधात यंदा राळ उठवायचीच, ह्या निर्धाराने मा. बाळासाहेबांना एकदम स्फुरण चढले. मुख्यमंत्र्यांच्या नाकात दम आणणणारा काबिल विरोधी पक्षनेता म्हणून आपला लौकिक असल्याची जाणीव होऊन मा. बाळासाहेब खुशालले. राज्याचा मुख्यमंत्रीदेखील आपल्याला बघून चळाचळा कापतो, हे काय कमी आहे? पण खरेच चळाचळा कापतो की तो त्यांचा अभिनय? जे काही असेल ते, आपण आपले कर्तव्य योग्यरीत्या निभावतो आहोत ना, मग झाले तर...

बाळासाहेबांनी पटकन वर्तमानपत्रे मागवून घेतली आणि कात्रणांवर नजर टाकली. येत्या अधिवेशनात त्या घोटघर धरणाच्या घोटाळ्याची कागदपत्रे दाखवून हलकल्लोळ उडवण्याचा त्यांचा इरादा होता. गेले काही महिने ते ह्या घोटाळ्याच्या मागे होते. ह्यावेळी थेट मुख्यमंत्र्यांवरच आरोप करायचा आणि पुराव्यानिशी घोटाळा बाहेर काढून ‘ब्रेकिंग न्यूज’ मिळवायची, त्यांनी ठरवले होते. मीडियातल्या दोस्तांना तयार राहायला सांगून त्यांनी बंदोबस्तही करून टाकला होता. घोटघर धरणाची फाइल चाळत त्यांनी काही काळ काढला. भाषणाची मनातल्या मनात जुळवाजुळव केली.
‘जनतेच्या घशातला घोट पळवणारे पापी सरकार’ अशी लाइन घ्यायची त्यांनी ठरवूनसुद्धा टाकले.
उत्साहात उठून मा. बाळासाहेबांनी पीएला बोलावून घेतले. ‘‘गाडी काढा!’’ त्यांनी फर्मावले.
‘‘कशाला?’’ पीए म्हणाला.
‘‘कशाला म्हंजे? अधिवेशनाला जायला नको?’’ मा. बाळासाहेब वैतागले.
‘‘अजून सीएमसाहेबांचा निरोप आलेला नाही,’’ पीएने माहिती दिली. मा. बाळासाहेब भडकले. सीएमच्या निरोपाचा काय संबंध? मी काय गुलाम आहे काय सत्ताधाऱ्यांचा? संतापाने ते काहीतरी बोलणार होते; पण तोंडातून शब्द फुटेनात. तेवढ्यात पीएने परिस्थिती ओळखून त्यांना आठवण करून दिली. ‘‘साहेब, तुम्ही विरोधी पक्षनेते होता... पण आता नाही! परवाच तुम्ही पक्ष बदलून मंत्रिपदाची शपथ घेतलीत ना? विसरलात इतक्‍यात?’’
...मा. बाळासाहेब अचानक भानावर आले. भ्रष्टाचार, नाकर्तेपणा, चोर, लुटेरे, थग्ज ऑफ महाराष्ट्र हे शब्द आता पूर्णपणे गाळायचे, हे त्यांच्या लक्षात आले. नव्या भाषणाची जुळवाजुळव करण्यापूर्वी त्यांनी घोटघर धरण घोटाळ्याचे कागद बंबात घातले आणि नव्याने भाषणाची तयारी करू लागले. नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी मा. मुख्यमंत्र्यांचे हात मजबूत करण्याची गरज आहे, हे त्यांचे भाषणातील प्रतिपादन फारच सकारात्मक वगैरे होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com