ढिंग टांग : शंभर चाळीस पाच!

dhing tang
dhing tang

मुलांनो, ऐका, नीट लक्ष द्या... आज किनई आपला गणिताचा तास आहे. छे, छे, लग्गेच गणिताची पुस्तकं काढायची नाहीत हं दप्तरातनं! गणित हा विषय पुस्तकात्नं शिकायचा नाहीच्चे मुळी. तो किनई हसत खेळत शिक्‍कायचा असतो. चला शिकू या का मग गणित? छान.
मुलांनो, आता आपण हजेरी घेऊ या. चला आपापले रोल नंबर सांगा बरं! हं...एक, दोन...तीन...चार...आठ....दहा....अकरा...अरे अरे, गंपू, अकरा नाही म्हणायचं...‘दहा एक’ म्हण बरं!! दहा दोन, दहा तीन...दहा आठ...वीस...वीस एक...वीस दोन...वीस तीन...शाब्बास! आता आकडे असे म्हणायचे. इंग्रजीत आपण ट्‌वेंटी थ्री म्हणतो की नाही? तस्संच! कळलं?
चल बने, तू मला त्रेसष्ट हा आकडा कसा म्हणायचा ते सांग बरं!- त्रेसष्ट म्हणजे साठ तीन...कळलं? आता सदुसष्ट म्हण...सदू दुष्ट नाही, सदुसष्ट...हं! सदुसष्ट म्हंजे साठ सात..असं प्रत्येक आकड्याची फोड करून सांगायचं. लक्षात आलं ना?
दादू, तू सांग बरं...एकशे पस्तीस कसं म्हणणार? ए-क-शे- प-स-ती-स!!
एवढं कसं समजत नाही दादू...शेजारच्या देवेंद्राला कशाला विचारतोस. तू स्वत: सांग... अरे, एकशे पस्तीस म्हंजे शंभर तीस पाच!! कित्ती सोप्पंय! वाक्‍यात उपयोग करून बघ जमतंय का? म्हण : यंदा आम्ही इलेक्‍शनला प्रत्येकी शंभर तीस पाच जागा लढवू आणि मित्रपक्षांना दहा आठ जागा देऊ!! बघ, कित्ती सोप्पं झालं सगळं.
देवेंद्रा सांग बरं, मॅजिक फिगर कशी उच्चारायची ते? शंभर चाळीस पाच!! करेक्‍ट...हीच आपल्या महाराष्ट्राची मॅजिक फिगर आहे. काय म्हणालास? दोनशे वीस ही मॅजिक फिगर आहे? काहीतरीच!! छे!!
...तिकडे कोण कोपऱ्यात मस्ती करत आहे? बंट्या, गप्प बैस बरं! नाहीतर पलीकडल्या बाजूला मोजून दहा दोन पट्ट्या मारीन! दहा दोन म्हंजे काय? कळेल कळेल!! काय म्हणालास बबन? शेजारचा बंटी काय आहे? चारसो बीस आहे? बरं बरं! असू दे चारसो बीस...पण असं बोलू नये रे!! अं...चारसो बीस हे नव्या गणितानुसार ठीक आहे...हुशार आहेस हं तू! लौकर शिकतो आहेस सगळं. तुझे वडील पोलिस इन्स्पेक्‍टर आहेत ना? तरीच!! भलताच चाप्टर दिसतोस? बस खाली.
मुलांनो, आधी नीट लक्ष देऊन ऐका. आता गणितात पहिल्यासारखं काहीही उरलेलं नाही. आमच्या लहानपणी आम्ही अडीचकी, सवाइकी वगैरे म्हणत असू. मला तर दोनशेपर्यंत पाढे तोंडपाठ होते. काय म्हणालात? पाढे म्हंजे काय? अं...पाढे म्हंजे एक प्रकारचे जोडाक्षरयुक्‍त आकडे असतात. ते एका दमात म्हणायचे असतात. हल्ली हे सगळे आकडे मोबाइल फोनमध्येसुद्धा असतात. तुम्ही पाढेबिढे पाठ करण्याचं काही कारण नाही. आणि केलेतच, तर नव्या पद्धतीप्रमाणेच पाठ करा हं!!
तुम्हा मुलांना जोडाक्षरं धड म्हणता येत नाहीत, म्हणून प्रि. विनोदकाकांनी जोडाक्षरविरहित आकडे आणले आहेत. जोडाक्षरविरहित आकडे आणल्यामुळे आता तुमचे मेंदू भराभरा चालतील. म्हंजे तसं त्यांचं म्हणणं आहे. मग चालवाल ना मेंदू भराभरा? शाब्बास. ह्या नवीन मेथडला आपण ‘विनोदकाका मेथड’ असं म्हणू. कित्ती चांगले आहेत ना विनोदकाका? तुमच्यासाठी त्यांनी कित्ती कित्ती केलं. पण मुलांमध्ये फार रमल्यामुळे हेडमास्तरांनी त्यांची जिल्हाशाळेत बदली केली. हेडमास्तर अगदी कडक्‍क माणूस आहेत.
तेव्हा मुलांनो, तास संपेपर्यंत घोकत बसा : शंभर चाळीस पाच! शंभर चाळीस सहा! शंभर चाळीस सात...चालू द्या!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com