ढिंग टांग : कडका बजेट!

ब्रिटिश नंदी
गुरुवार, 20 जून 2019

सर्वसाधारणपणे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याच्या बुधवारी आमची महिनाअखेर सुरू होते, हे खरे आर्थिक सत्य आहे. पण ह्या कोरड्याठाक सत्याला डरणाऱ्यापैकी आम्ही नव्हेत. कडकीच्या काळात दिवस कसे काढावयाचे ह्याचे गुह्य आम्ही जाणून घेतले आहे. आमच्या दृष्टीने आर्थिक विवंचना संपुष्टात आली आहे. सांगावयास अतिशय आनंद होतो, की आमचे परात्पर गुरू जे की सुधीर्जी मुनगंटीवार्जी ह्यांनी दिलेल्या कानमंत्रामुळे आमचे जीवन सुखी जाहले. गुरू चांगला भेटला की शिष्याचे नशीब फळफळते, म्हंटात ते हे असे. आता तुम्ही विचाराल की बुवा, हल्लीच्या दिवसात कडकीतील शिष्यास (फुकट) मार्गदर्शन कुठला गुरू करितो?

वाचकहो, आपली शंका उचित असून त्याचे उत्तर देणे हे आमचे कर्तव्य आहे. आमचे मार्गदर्शक मुनगंटीवारगुरुजी ह्यांचे नाव घेताना आम्ही कानाची पाळी घट्ट पकडीत आहो, हे ध्यानी घ्यावे.

महिनाअखेर कशी निभवावी? असा मूलभूत प्रश्‍न आम्ही त्यांस एकदा केला असता त्यांनी ‘मज्जेत’ असा एकशब्दी गुरुमंत्र दिला होता. तो आम्ही शिरसावंद्य मानला. ‘‘माझे गुडघे खूप दुखत होते. चार पावले चालता येत नव्हते. तेवढ्यात कोणीतरी सांगितले की नियमित ‘घुटनारिवटी’ का घेत नाहीस?...आता मी नाचूसुद्धा शकतो’’ ह्या चालीवर ‘मुनगंटीवारगुरुजींच्या गुरुमंत्रामुळे आम्ही कडकीत जगायलासुद्धा शिकलो’ असे आम्ही जाहिरातीतदेखील सांगायला एका पायावर तयार आहो. असो. गुरू आणि शिष्य ह्यांच्यात झालेला तो ऐतिहासिक संवाद संक्षिप्त स्वरूपात देत आहो.
गुरू मुनगंटीवारजी : काय आहे बे?
शिष्य म्हंजे आम्ही : कडकी आली!!
गुरू : मग, मी काय नाचू?
शिष्य : जगू कसा? कृपया उपदेश द्यावा!
गुरू : पैसे संपले की माणसाने स्वप्न बघावीत!
शिष्य : म्हंजे? दुकानदार जळके लाकूड घेऊन मागे लागल्याची?
गुरू : नाही बे... दुकानदार आपला गालगुच्चा घेऊन ऱ्हायला आहे, अशी!!
शिष्य : पैशाचे सोंग कसे आणावे?
गुरू : उधारीपाधारी करून!
शिष्य : तोही मार्ग खुंटला आहे गुरुवर्य!
गुरू : मग, बड्या बड्या बाता करून द्याव्या!
शिष्य : तेच तर करतो आहे गुरुजी!!
गुरू : मग झालं तर... रडतो कशाला? माणसानं कसं सदा हसतमुख राहावं! बिनपैशाच्या गोष्टीत मन रमावं! माझंच उदाहरण बघ!!
शिष्य : बघतोय!
गुरू : काही नाही तं चार वर्षांत मी महाराष्ट्रात कोटीच्या कोटी झाडं लावून दिली!!
शिष्य : पैसे काही झाडाला लागत नाहीत, असं आपले अर्थतज्ज्ञ असलेले एकेकाळचे पंतप्रधानच म्हणाले होते!!
गुरू : चूक आहे ते! पैसे झाडालेच लागतंत!! झाडाचं राहू दे... मी महाराष्ट्रातले पंचवीस टक्‍के वाघ वाढवले! पैसा नाही तं नाही, वाघ तं वाढले!
शिष्य : कडकीबद्दल सांगा!
गुरू : सोप्पं आहे बे...खिश्‍यात फद्या नसताना दणादणा कोटी कोटीचे आकडे उच्चारायचे! येत्या चार-सहा महिन्यांत गब्बरगंड होणार असल्यागत बर्ताव करायचा! लोक पैशाबद्दल विचारायला लागले की झाडं, हरणं, वाघबिघ असलं काहीतरी पर्यावरण टाइप बोलायचं! लोक वाघाबिघाबद्दल बोलायला लागले की व्याजदर, कर्जाची उचल, नवीन योजनेची आखणी, आश्‍वासनं वगैरे लाइन लावायची. मध्ये मध्ये शेरोशायरी घालून कंटेंट भरला की झालं काम...आहे काय नि नाही, काय?
शिष्य : हाच का तुमचा कडकीचा कानमंत्र?
गुरू : ह्याला बजेट म्हणतात भौ, बजेट!

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial dhing tang british nandi article