ढिंग टांग : यशाचा योग!

ब्रिटिश नंदी
Friday, 21 June 2019

सर्वप्रथम आपणा सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनेकानेक शुभेच्छा. देव करो आणि आपणा सर्वांना दीर्घायुरारोग्याचा लाभ होवो. आपल्या हाताची बोटे स्वत:च्या अंगठ्याला हमेशा टेकोत आणि भोजनोपरांत वज्रासनात बसल्यावर पायास रग न लागो!! आपल्याला मयूरासनदेखील जमो आणि आपल्या ताडासनाच्या मुद्रेला कोणीही न हसो!! आता असो.

सर्वप्रथम आपणा सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनेकानेक शुभेच्छा. देव करो आणि आपणा सर्वांना दीर्घायुरारोग्याचा लाभ होवो. आपल्या हाताची बोटे स्वत:च्या अंगठ्याला हमेशा टेकोत आणि भोजनोपरांत वज्रासनात बसल्यावर पायास रग न लागो!! आपल्याला मयूरासनदेखील जमो आणि आपल्या ताडासनाच्या मुद्रेला कोणीही न हसो!! आता असो.

वाचकहो, ‘सबका साथ, सबका विकास और सबका योगाभ्यास’ हे आमचे ब्रीद आहे. एकसो त्रीस करोड देशवासीयांपैकी हरेकाने रोज किमान अर्धातास योगाभ्यास केला तर हा देश कुठल्या कुठे जाईल, ह्याबाबत आमच्या मनात तरी शंका नाही. योगाभ्यासाबद्दल ही गोडी आम्हाला आमचे परमगुरू हठयोगी प्रो. बामदेव बाबा ह्यांच्यामुळे लागली. प्रो. बाबाजी ह्यांना कोण ओळखत नाही? केवळ देशकार्यासाठी त्यांनी योगाभ्यासाला वाहून घेतले. प्रो. बाबाजींच्या योगशिबिरात आम्ही विस्मयकारक गोष्टींची अनुभूती घेतली. पोटाची खोळ खळाखळा हलविताना पाहून आम्ही सलग वीस मिनिटे शवासनात गेलो होतो. शेजारील योगसाधकाने आमच्या मुखावर पाणी शिंपडले तेव्हा कोठे आम्हास शुद्ध आली. त्या घटनेनंतरच आम्ही प्रो. बाबाजी ह्यांचा अनुग्रह घेतला. सांगावयास अतिशय आनंद वाटतो की आज आम्ही बद्धपद्मासनात बसावयास हळूहळू शिकत आहो. पद्मासन घालणे तितकेसे अवघड नसून त्यातून स्वत:च्या पायांची सोडवणूक करणे, अधिक आव्हानात्मक आहे, असे आमचे मत आहे. परंतु, त्याबद्दल पुढे केव्हातरी लिहू.

त्यांच्या प्रेरणेने जनलोक आपापल्या नरदेहाच्या विविध प्रकारे घड्या घालण्यास उद्युक्‍त झाल्यानंतर प्रो. बाबाजी ह्यांनी उद्योगक्षेत्रात प्रवेश केला. सांगावयास आनंद होतो की आज आम्ही प्रो. बाबाजी ह्यांच्या कंपनीत नोकरीस असलेल्या म्हशीचे दूध पितो!! आपणही प्यावे!! प्रो. बाबाजी ह्यांच्या म्हशीच्या दुधापुढे वाघिणीचे दूध म्हंजे फुळकुणी पाणी!! अशा ह्या एकमेवाद्वितीय योगगुरूच्या सान्निध्याचा योग बुधवारी आम्हास मिळाला. शीर्षासनात उभ्या असलेल्या प्रो. बाबाजी ह्यांना आम्ही नमस्कार केला- ‘प्रणाम बाबाजी!’ उत्तरादाखल बाबाजींनी आपले दोन्ही पाय जोडले व एक पाय आमच्या मस्तकावर ठेवला. एरवी हा आशीर्वाद ते हातांनी देतात. पण तूर्त ते शीर्षासनात होते.
‘‘पूज्य बाबाजी, नोकरीधंदा नाही, काय करू?’’ आम्ही.

‘‘मूरख बालक, योग करो योग! योग करेंगे तो प्रधानमंत्री होवें!’’ जमिनीच्या बाजूने शब्द आले. (शीर्षासनाचे लक्षात असू द्यावे!) आम्हीही तत्काळ डोक्‍यावर उभे राहिलो.
‘‘जिस मानवने योग किया उसका बेडा पार हुआ. जो योग नही करता, उसके कुंडली में सत्तायोग नही हो सकता! एक नौजवानने योग करना मना किया, तो लोगोंने उसे चुनाव में पछाड दिया! कुछ समझ में आ रहा है बेटा?’’ बाबाजींनी रोखठोक बजावून पोटाची खोळ खळाखळा हलवली. आम्ही तसलाच काही प्रयत्न केला नाही. कारण आम्ही एकतर शीर्षासनात होतो. पोटाची खोळ हलवून काय साधणार होतो? असो.
‘‘हमने राहुलबाबासे कहा है की आजसेही योगाभ्यास शुरु कर दो, २०२४ तक प्रधानमंत्री हो सकते हैं!’’ बाबाजींनी सरळ होत आम्हाला सरळ माहिती दिली. आम्हीही दाणकन खाली आलो.

‘‘म्हंजे ह्याचा अर्थ लोकांच्या मतदानाचा त्यांच्या पराभवाशी काहीही संबंध नाही?’’ आम्ही आश्‍चर्याने विचारले.
‘‘पागल हो क्‍या गर्दभ! चुनाव और प्रधानमंत्री का कुछ संबंध नही होता! ‘योग करो, सत्ता पाओ’ यही हमारा मंत्र है!!’’ बाबाजी म्हणाले.
आताशा आमच्या पोटाची खोळ (रिकाम्यापोटी) खळाखळा हलते. असो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial dhing tang british nandi article