माणसाशी माणसासारखे वागा

दीप्ती गंगावणे
शुक्रवार, 9 मार्च 2018

दोन पायांच्या, बिनपंखांच्या ‘माणूस’ नावाच्या प्राण्याला खऱ्या अर्थाने मनुष्यत्वाकडे नेण्याच्या प्रवासात नीतितत्त्वे, नीतिमूल्ये मार्गदर्शकाची भूमिका बजावतात. आपले व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवन ‘कसे असते/ आहे’ याची दखल घेऊन ते ‘कसे असावे’ याची चर्चा वेळोवेळी या तत्त्वांच्या, मूल्यांच्या संदर्भात करावी लागते. सहज-सुलभ वृत्तीने प्राणिपातळीकडे वळू पाहणाऱ्या व्यक्तीला आणि समाजाला नैतिक आदर्शांची आठवण देऊन मनुष्यत्वाकडे वळवावे लागते. शक्‍य असेल तेव्हा इतरांवर वर्चस्व गाजवण्याची एक स्वाभाविक वृत्ती माणसांमध्ये असते. प्राणिपातळीवरील जीवनसंघर्षात ती आवश्‍यकही असते.

दोन पायांच्या, बिनपंखांच्या ‘माणूस’ नावाच्या प्राण्याला खऱ्या अर्थाने मनुष्यत्वाकडे नेण्याच्या प्रवासात नीतितत्त्वे, नीतिमूल्ये मार्गदर्शकाची भूमिका बजावतात. आपले व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवन ‘कसे असते/ आहे’ याची दखल घेऊन ते ‘कसे असावे’ याची चर्चा वेळोवेळी या तत्त्वांच्या, मूल्यांच्या संदर्भात करावी लागते. सहज-सुलभ वृत्तीने प्राणिपातळीकडे वळू पाहणाऱ्या व्यक्तीला आणि समाजाला नैतिक आदर्शांची आठवण देऊन मनुष्यत्वाकडे वळवावे लागते. शक्‍य असेल तेव्हा इतरांवर वर्चस्व गाजवण्याची एक स्वाभाविक वृत्ती माणसांमध्ये असते. प्राणिपातळीवरील जीवनसंघर्षात ती आवश्‍यकही असते. माणसाला साजेसे जीवन जगण्यासाठी मात्र ती अडचणीची ठरते. अनेक नैतिक, सामाजिक समस्यांना जन्म देते. एक अगदी साधे-सोपे नीतिमत्त्व असे सांगते, की इतरांनी आपल्याशी जसे वागावे असे आपल्याला वाटते, तसेच आपण त्यांच्याशी वागावे. स्वतःसाठी एक तत्त्व, इतरांसाठी वेगळे, हे वागणे न्यायाला धरून नाही, म्हणूनच नैतिकदृष्ट्या चुकीचे आहे. आपल्यापैकी प्रत्येकालाच आपल्याला एखाद्या जनावराप्रमाणे वागवलेले आवडत नाही. ‘वापरा आणि फेकून द्या’ या तत्त्वानुसार एखाद्या वस्तूप्रमाणे आपला वापर करून, नंतर आपल्याकडे पाठ फिरवणे मानवत नाही. या प्रकारच्या वागण्याच्या भावनिक परिणामांच्या पलीकडे जाऊन आपण हे वागणे नीतीला अनुसरून नाही असे मानतो आणि ते योग्य आहे; कारण असे वागणे आपले मनुष्यत्व नाकारत असते. साहाजिकच, आपले इतरांशी वागणेही त्यांच्या मनुष्यत्वाला अपमानित करणारे असता कामा नये, असे नीती सांगते. वर्चस्ववादी व्यक्तींना नेमका याचाच विसर पडतो. माणसा-माणसांमध्ये कितीही फरक असले, तरी मूलभूत मनुष्यत्वाच्या पातळीवर सगळी सर्वसाधारण माणसे समानच असतात आणि त्यांच्या मनुष्यत्वाचा, व्यक्तित्वाचा, स्वातंत्र्याचा आदर राखला जायला हवा. इतरांवर प्रभुत्व गाजवण्याची अनियंत्रित आकांक्षा असणाऱ्या व्यक्ती आणि व्यक्तिसमूह मात्र वंश, वर्ण, लिंग, वर्ग, धर्म, जात यांच्या आधारे स्वतःला श्रेष्ठ आणि इतरांना कनिष्ठ, हलके मानून त्यांचे मनुष्यत्वच हिरावून घेण्याचा प्रयत्न करतात. हा एक अतिशय गंभीर नैतिक अपराध आहे. त्याचा परिणाम फक्त वंचित समूहांनाच नाही, तर संपूर्ण मानवजातीला भोगावा लागतो. या समूहांना माणूस म्हणून विकसित होण्याचा हक्क आणि संधी नाकारणे एकंदर मानवी समाजाच्या अधोगतीला कारणीभूत ठरणारे असते. कालच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने केवळ स्त्री-पुरुषच नव्हे, तर इतर सर्व भेदांच्या आणि त्या भेदांमधून निर्माण केलेल्या विषमतांवर आधारित समाजव्यवस्था, विचारव्यवस्था, नातेसंबंध या सगळ्यांकडे डोळे उघडून बघणे आणि त्यांचे मूल्यमापन करणे औचित्यपूर्ण ठरेल.

Web Title: editorial dipti gangawne write article in pahatpawal