शक्तिप्रदर्शनाचा 'अधर्म'

डॉ. इरेश सदाशिव स्वामी
शनिवार, 14 एप्रिल 2018

अलीकडच्या काळात जगभरात ‘देश’ आणि ‘धर्मा’च्या नावाने सुरू झालेल्या हिंसाचाराने संवेदनशील अंतःकरण असणाऱ्यांना अस्वस्थ व्हायला न झाले तरच नवल! ज्याला धारण केले जाते तो धर्म, अशी ‘धर्म’ शब्दाची व्याख्या आहे. ‘धृ’ धातूने हा शब्द बनला आहे. वाजसनेयी संहितेमध्ये ‘निश्‍चित नियम (व्यवस्था किंवा सिद्धांत) आचरणाचे नियम’ असा अर्थ सांगितला आहे. ‘ध्रुवेण धर्मणा’ असे म्हटले असले, तरी धर्म शब्दाचा अर्थ हा काळाबरोबर बदलत गेल्याचे लक्षात येते.

अलीकडच्या काळात जगभरात ‘देश’ आणि ‘धर्मा’च्या नावाने सुरू झालेल्या हिंसाचाराने संवेदनशील अंतःकरण असणाऱ्यांना अस्वस्थ व्हायला न झाले तरच नवल! ज्याला धारण केले जाते तो धर्म, अशी ‘धर्म’ शब्दाची व्याख्या आहे. ‘धृ’ धातूने हा शब्द बनला आहे. वाजसनेयी संहितेमध्ये ‘निश्‍चित नियम (व्यवस्था किंवा सिद्धांत) आचरणाचे नियम’ असा अर्थ सांगितला आहे. ‘ध्रुवेण धर्मणा’ असे म्हटले असले, तरी धर्म शब्दाचा अर्थ हा काळाबरोबर बदलत गेल्याचे लक्षात येते. अंततः हे ‘मानवाच्या विशेषाधिकार, कर्तव्य आणि बंधनाचं द्योतक आहे.’ वैशेषिक सूत्रकाराने धर्माची व्याख्या करताना असे म्हटले आहे, की ‘ज्यामुळे आनंद आणि निःश्रेयसची प्राप्ती होते, त्यालाच धर्म म्हणावे.’  त्याव्यतिरिक्‍त त्या त्या काळातील मान्य असणाऱ्या परिभाषा अशा आहेत. - ‘अहिंसा हाच श्रेष्ठ धर्म आहे’, ‘अहिंसा परमोधर्म:’, ‘आनृशंस्यं परो धर्मः’, ‘आचारः परमो धर्मः’. गौतम धर्मसूत्रानुसार वेद धर्माचे मूळ आहेत.
संत शरणदासांनीही वेळोवेळी धर्मासंबंधी आपली स्पष्ट मते नोंदवली आहेत. महात्मा बसवेश्‍वरांनी अत्यंत सोप्या शब्दांत म्हटले आहे. ः दय विल्लद धर्म अदु यावुदय्या? दयवे बेकु सकल प्राणिमात्र गळाल्लि। दयवे धर्मद्‌ मूलवय्य! अर्थात, दयाभाव नसणारा असा कोणता धर्म या पृथ्वीतलावर आहे? सकळ प्राणिमात्रांविषयी दयेचा भाव असला पाहिजे. दयाभाव हेच धर्माचे मूळ आहे. गुरुनानकांनीदेखील हेच सांगितले आहे - ‘दया धर्म का मूल है.’ संत तुलसीदासांनी ‘परहित सरिस धर्म नहीं भाई, पर पीडा सम नहीं अधमाई’ - इतरांच्या हिताचा विचार करण्याहून श्रेष्ठ धर्म नाही, इतरांना दुखावणं हाच अधर्म आहे, किती सोपी, साधी धर्माची व्याख्या सांगितली आहे. धर्माच्या नावावर धर्मांध लोक माणसांच्या जिवावर उठले आहेत. हिंसाचाराला ऊत आला आहे. धर्मसंस्थापकांनी, सत्पुरुषांनी सांगितलेल्या तत्त्वानुसार चालण्यापेक्षा त्यांचे अनुयायी जमावाने एकत्र येऊन त्याचे प्रदर्शन करीत आहेत. अशावेळी इतर समूहांच्या भावना दुखावत असल्याचे आढळते. त्याचे पर्यवसान हिंसाचारात होते. अहिंसा, सत्य, अस्तेयाचा संदेश साऱ्या विश्‍वाला देणाऱ्या देशात हे घडावे, यासारखे क्‍लेशकारक आणखी काय असू शकते? यात निष्पापांचा हकनाक बळी जातो.

धर्म ही काही शासकीय सवलती मिळवण्याची बाब असू शकते, हे पूर्वी कुणाला खरे वाटले नसते. पण काही धूर्त राज्यकर्त्यांना मनुष्याच्या लोभी वृत्तीची जाण असल्याने सर्वसामान्यांसाठी हे मधाचे बोट दाखवून समाजात मने गढूळवण्याचे काम केले आहे. ‘आचारवे स्वर्ग, अनाचारवे नर्क’ हे सांगणाऱ्या महात्मा बसवेश्‍वरांच्या अनुयायांमध्ये असहिष्णुतेचा, आक्रमकतेचा भाव पाहून, त्याहून वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, धर्मधुरिणांनी त्याचे नेतृत्व करीत रस्त्यावर उतरणे हे त्यांना, त्या समाजाला शोभणारे नाही. धर्माचे संस्थापक कोण? त्यांचा काळ कोणता? त्याचे प्राचीनत्व, अर्वाचीनत्व निश्‍चित करण्यासाठी सभा-संमेलन इथपर्यंत ठीक आहे. खरे तर त्याचीही गरज नाही. मोठमोठ्या मिरवणुका काढून शक्‍तिप्रदर्शनाची तर मुळीच आवश्‍यकता नाही. असे केल्याने सरकारवर, शांतता-सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिस यंत्रणेवर निष्कारण ताण येतो, हे तथाकथित धर्मधुरंधरांच्या लक्षात येत असणारच. केवळ एखाद्या विशिष्ट धर्माविषयी हे आहे असे नाही, तर देशात नि बाहेरही हे आढळते. अशावेळी जबाबदारी वाढते ती शिक्षणव्यवस्थेची. पण आपल्याकडे त्या क्षेत्राची स्थितीही चिंताजनक आहे. ज्यांचा अभ्यास नाही अशा अर्धवटांची शासकीय समित्यांवर वर्णी लागली आहे. त्यावरून राज्यकर्त्यांच्या बुद्धीची कीव करावी तितकी कमी आहे. पाठ्यपुस्तके, संदर्भग्रंथांत विवाद्य मुद्दे आजदेखील वर्षानुवर्षे तसेच शिकवले जातात. मोजक्‍या महानगरांतील कथित पंडित, समीक्षकांची मते प्रमाण मानली जातात. प्राथमिक ते पदव्युत्तर पाठ्यक्रमनिर्धारण करणाऱ्या मंडळावर अशा थोरामोठ्यांची मांदियाळी पाहायला मिळते. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, विद्यापीठीय स्तरावर फारसे आशादायक चित्र नाही. अलीकडच्या ज्ञानदानाचे पवित्र काम करणाऱ्या शिक्षणमहर्षींविषयी तर सांगायलाच नको! कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासारखा निःस्पृह, निःस्वार्थ भावनेने बहुजनांना शिक्षित करणारा सत्‌पुरुष आज कुठे आढळत नाही. आता शिक्षणसंस्था मॉल्स झाल्या आहेत. शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक शोषण होत असताना सरकार डोळ्यांवर कातडे ओढून काही झालेच नाही, अशा आविर्भावात राज्य करीत असते. ही गोष्ट अत्यंत गंभीर आहे.

Web Title: editorial dr eresh sadashiv swami article