आपत्तीतून सुखाचा शोध

डॉ. श्रीकांत चोरघडे
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

जु न्या काळी एक विनोद ऐकला होता. एक मठ्ठ व्यक्ती तिसऱ्या मजल्यावर राहत असे. गॅलरीत वाळत घातलेला त्या व्यक्तीचा पायजमा वाऱ्याने उडून खाली पडला. तेव्हा त्या व्यक्तीला कुणीतरी सांगितलं, ‘‘अरे, तुझा पायजमा उडून खाली पडला.’’ त्यावर त्यानं दिलेलं उत्तर मजेशीर होतं. ‘‘बरं झालं रे बाबा, मी त्या पायजम्यात नव्हतो. नाहीतर तिसऱ्या मजल्यावरून पडलो असतो तर माझं काही खरं नव्हतं.’’

जु न्या काळी एक विनोद ऐकला होता. एक मठ्ठ व्यक्ती तिसऱ्या मजल्यावर राहत असे. गॅलरीत वाळत घातलेला त्या व्यक्तीचा पायजमा वाऱ्याने उडून खाली पडला. तेव्हा त्या व्यक्तीला कुणीतरी सांगितलं, ‘‘अरे, तुझा पायजमा उडून खाली पडला.’’ त्यावर त्यानं दिलेलं उत्तर मजेशीर होतं. ‘‘बरं झालं रे बाबा, मी त्या पायजम्यात नव्हतो. नाहीतर तिसऱ्या मजल्यावरून पडलो असतो तर माझं काही खरं नव्हतं.’’
यातला विनोदाचा भाग सोडला तर यात एक सकारात्मक संदेशसुद्धा आहे. ‘एखादी अप्रिय घटना आपल्या आयुष्यात घडली नाही,’ याची फार कमी वेळा आपण दखल घेत असतो. प्रत्येक घटनेला दोन बाजू असतात. त्यातली कुठली बाजू कशा नजरेनं बघतो, हे प्रत्येक व्यक्तीच्या मानसिकतेवर, विचारपद्धतीवर अवलंबून असतं.
वयाच्या नवव्या वर्षी वैधव्य प्राप्त झालेल्या, नागपूरस्थित मातृसेवा संघ या संस्थेच्या संस्थापिका (कै.) कमलाताई होस्पेट यांना त्यांच्या कार्याबद्दल ‘पद्मश्री’ प्रदान करण्यात आली. माफक दरात बाळंतपण करणाऱ्या या संस्थेचे जाळे विदर्भ व जुन्या मध्य प्रदेशात पसरलेले होते. त्यासोबत दुर्बल मनस्क, अपंग मुलामुलींसाठी सेवा व पुनर्वसन, वृद्धाश्रम, समाजकार्य महाविद्यालय अशा विविध माध्यमांतून कमलाताईंच्या हातून समाजसेवा घडली होती. कमलाताई दरवर्षी धनत्रयोदशीला आपल्या वैधव्याचा वाढदिवस साजरा करीत असत. ‘वैधव्य प्राप्त झालं नसतं तर मी रांधा, वाढा, उष्टी काढा एवढंच कर्तृत्व गाजवू शकले असते,’ असं त्या म्हणायच्या.
आपल्या आयुष्यात एखादा क्षण निवांत असतो, तेव्हा देवानं आपल्याला काय चांगलं दिलं, हा विचार सुखावून जातो. पण, त्यासोबतच कुठल्या वाईट गोष्टी आपल्या आयुष्यात घडल्या नाहीत, हाही विचार केला तर आनंद निश्‍चितच वाढेल.

हल्ली परीक्षांचा मोसम सुरू आहे. परीक्षार्थ्यांच्या मनात नेहमी धाकधूक असते. पेपर कसा जाईल? आपण नापास तर होणार नाही? यात कुठेतरी आपण नापास होऊ, या भीतीचं सावट असतं. नकारात्मक विचार करण्याची सवय असणाऱ्या व्यक्ती कायम अस्वस्थ असतात. पण, प्रत्यक्ष नकारात्मक आयुष्य जगत असताना मनाची उभारी कायम ठेवणं सोपं नसतं.

गालिब नावाचा शायर सर्वांना परिचित आहे. त्याचं आयुष्य अतिशय खडतर गेलं. तो राजकवी होता. त्याच्यावर बादशहाची खप्पामर्जी झाली म्हणून त्याला बंदिवास घडला. त्याचे सगळे नातेवाईक त्याच्या आधी देवाला प्यारे झाले. अशा दुर्दैवाच्या फेऱ्यात अडकलेल्या गालिबनं काय विचार केला?
आकाशातून संकटं निघतात
ती विचारत येतात गालिब कुठे राहतो?
हसत राहण्यासाठी जी दुःखं आपल्या वाट्याला आली नाहीत, त्यांचा विचार करायची सवय हवी.

Web Title: editorial dr shrikant chorghade write article in pahatpawal