एक सुंदर शिल्प

डॉ. श्रीकांत चोरघडे
बुधवार, 23 मे 2018

आठ सप्टेंबर १९७३ची ही गोष्ट. त्या काळात उन्हाळा व पावसाळा या दोन ऋतूंमध्ये माझ्याकडे येणाऱ्या बालरुग्णांची संख्या भरपूर असे. पालकांनी खूपच गळ घातली तर मी रुग्णाला भरती करून घेत असे. ‘बाळाचं जे काही बरवाईट व्हायचं असेल, ते तुमच्याच हातून होऊ द्या,’ इतका दुर्दम्य विश्‍वास पालक त्या काळात डॉक्‍टरांवर टाकायचे. सकाळी चार वाजता आलेला कॉल एका नवजात बालकासाठी होता. दिलेल्या तारखेच्या एक महिन्याआधीच जन्म झालेला. जेमतेम दीड किलो असलेलं बालक होतं ते! ‘जगेल की नाही?’ जयंत व संजीवनी आमटे या दाम्पत्याच्या प्रश्‍नाला माझ्याकडे उत्तर नव्हतं.

आठ सप्टेंबर १९७३ची ही गोष्ट. त्या काळात उन्हाळा व पावसाळा या दोन ऋतूंमध्ये माझ्याकडे येणाऱ्या बालरुग्णांची संख्या भरपूर असे. पालकांनी खूपच गळ घातली तर मी रुग्णाला भरती करून घेत असे. ‘बाळाचं जे काही बरवाईट व्हायचं असेल, ते तुमच्याच हातून होऊ द्या,’ इतका दुर्दम्य विश्‍वास पालक त्या काळात डॉक्‍टरांवर टाकायचे. सकाळी चार वाजता आलेला कॉल एका नवजात बालकासाठी होता. दिलेल्या तारखेच्या एक महिन्याआधीच जन्म झालेला. जेमतेम दीड किलो असलेलं बालक होतं ते! ‘जगेल की नाही?’ जयंत व संजीवनी आमटे या दाम्पत्याच्या प्रश्‍नाला माझ्याकडे उत्तर नव्हतं. ‘तुम्हाला योग्य वाटेल ते करा,’ अशा शब्दांत त्यांनी माझ्यावर विश्‍वास दाखवला. माझं ज्ञान पणाला लावून उपलब्ध साधनांचा वापर करून मी जे उपाय केले, त्याला यश आलं व ते बालक आईसोबत आठव्या दिवशी घरी गेलं. त्याचा जीव वाचणं ही मी त्या सर्वसाक्षीची कृपा समजतो. मूल ठीक होऊन वजन वाढल्यावर बारसं केलं व नाव ठेवलं शिरीष.

जीव वाचला असला, तरी पुढची चिंता सगळ्यांनाच होती. पण शिरीषच्या आई-बाबांची सकारात्मक मानसिकता यासाठी कामाला आली असावी. शिरीष वाढत होता, तसे त्याला तापामध्ये झटके येणं सुरू झालं. पुढे पुढे तर ताप नसला तरीही अधूनमधून आकडी येणं सुरू झालं. नंतर आचक्‍यांचं प्रमाण व तीव्रता कमी झाली. शिरीषची शारीरिक वाढ चांगली होत होती. शाळेत गेल्यानंतर त्याला अभ्यासात गती नव्हती, असं लक्षात आलं. शाळेतली मुलं चिडवायची म्हणून त्यानं शाळा सोडली. त्याच्या वर्गशिक्षिका अंजली डबीर त्याला घरी शिकवायच्या. त्याचा मोठा भाऊ हुशार होता. तो पुढे इंजिनिअर झाला. मधल्या काळात घरी शिरीष रिकामा राहू नये म्हणून त्याला बुक बाइंडिंगच्या प्रशिक्षणासाठी पाठवलं. शेजारी असलेल्या मुलाच्या नादानं तो ज्युदो-कराटे शिकू लागला. त्यानं रिकामं राहू नये एवढी काळजी त्याच्या आई-बाबांनी घेतली. तो १५ वर्षांचा असताना त्याला मित्राच्या कारखान्यात कामाला पाठवलं. तिथं काम करणारे कामगार त्याला चिडवायचे. एकदा त्यानं रागाच्या भरात हल्ला केला व तिथं त्याचं जाणं बंद झालं. आमटे दाम्पत्याचा मोठा मुलगा कमावता झाला होता. त्याच्याशी विचारविनिमय करून जयंतरावांनी नोकरी सोडली. घराच्या खर्चाचा भार मोठ्या भावानं उचलला व आई-वडिलांनी त्याच्या शिक्षणाकडे संपूर्ण लक्ष द्यायचं ठरवलं.

शिरीषची आई सुगरण होती. त्यांनी आधी दिवाळीच्या पदार्थांपासून सुरवात केली. काही काळ शिरीषबरोबर बाबा गिऱ्हाइकांकडे जायचे. शिरीष सायकल शिकला होता. हळूहळू माहिती झालेल्या घरी तो माल घेऊन जायचा व पैसे घेऊन यायचा. पुढे पुढे वर्षभर स्वयंपाकासाठी लागणारी पिठं व मसाले, सरबत, फिनेल असे जवळजवळ १५० प्रकारचं साहित्य आई-बाबा तयार करायचे व पत्ता शोधून शिरीष पोचवून द्यायचा. दुर्दैवानं मधल्या काळात मोठ्या भावाचा अपघाती मृत्यू झाला. पैशाची आवक बरी होती व कुटुंबाची राहणी साधी होती. त्यामुळे शिरीषच्या मदतीनं कुटुंबाचा खर्च सहज होऊ लागला.

शिरीषच्या आईबाबांनी जो काय मानसिक त्रास भोगला असेल तो तेच जाणोत; पण मुलाला मार्गाला लावण्यात ते यशस्वी झाले. मानसिकरीत्या दुर्बल असलेल्या मुलामुलींचा सांभाळ करताना पुष्कळ पालक मेटाकुटीला येतात. पण त्या बालकातील क्षमता ओळखून त्याला एक कमावता कुटुंबघटक बनवण्याचं अवघड काम करणाऱ्या शिरीषच्या आई-वडिलांना माझा सलाम. खरे पालक हे असे असावेत.
दगडातून मूर्ती करणारा मूर्तिकार घण वापरत नसतो. लहान हातोडा व छिन्नीचा हलक्‍यानं वापर करून सुंदर शिल्प घडवत असतो. शिरीषच्या पालकांनी तेच केलं.

Web Title: editorial dr shrikant chorghade write article in pahatpawal