घोकंपट्टीच्या पलीकडे (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

शिक्षणात नवे प्रयोग करताना शिक्षणातून पुढच्या आयुष्यात उभे करू शकणारी कौशल्ये बाणवणे, हे आव्हान आहेच. त्याचबरोबर शिक्षणाचा हेतू प्रगल्भ माणूस घडवणे, व्यक्तिमत्त्व फुलवणे हाही असायला आहे.

शिक्षणात नवे प्रयोग करताना शिक्षणातून पुढच्या आयुष्यात उभे करू शकणारी कौशल्ये बाणवणे, हे आव्हान आहेच. त्याचबरोबर शिक्षणाचा हेतू प्रगल्भ माणूस घडवणे, व्यक्तिमत्त्व फुलवणे हाही असायला आहे.

‘शाळांतून सध्या सुशिक्षित नवनिरक्षरांची पिढी तयार करण्याचे काम जोमाने सुरू असते,’ हे विलासराव देशमुख यांनी शिक्षणमंत्री असताना एकदा काढलेले उद्‌गार आपल्याकडच्या एकूण शैक्षणिक दुरवस्थेवर नेमके बोट ठेवणारे आहे, असे म्हणावे लागेल. एकीकडे विद्यार्थ्यांच्या पाठीवर पाच-दहा किलोच्या दप्तराचे ओझे आणि मनावर असलेले ‘रॅट रेस’मधून तरून जाण्याचे ओझे, अशा दुष्टचक्रात विद्यार्थिवर्ग सापडल्याचे ते म्हणाले होते. हे वास्तव आजही बदललेले नाही. विद्यार्थ्यांचा शालेय अभ्यासक्रम किमान निम्म्याने कमी करण्याची सरकारची मनीषा मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी अलीकडेच जाहीर केल्याने देशातील कोट्यवधी विद्यार्थ्यांना मोठाच दिलासा मिळाला आहे. आज पदवी आणि निमपदवी परीक्षांसाठी असलेल्या अभ्यासक्रमापेक्षाही शालेय अभ्यासक्रम हा जास्त आणि त्या त्या वयातील विद्यार्थ्यांना न झेपणारा असा असल्याचे जावडेकर म्हणत आहेत. त्यात तथ्य आहे. शिक्षणाचे सध्याचे स्वरूप पाहता विद्यार्थ्यांच्या मनात जास्तीत जास्त माहिती मनात कोंबण्याचा प्रयत्न होतो; परंतु त्याचा जीवनव्यवहारात उपयोग करण्याचे शिक्षण प्रभावीपणे दिले जात नाही. निव्वळ माहिती आणि ज्ञान यात मूलभूत फरक आहे. देशात संगणकीय युग अवतरल्यानंतर लहानग्या विद्यार्थ्यांच्या हातातदेखील माहितीचे महाजाल येऊन ठेपले आहे; पण ही माहिती म्हणजेच ज्ञान असे अनेकांना वाटू लागले आहे. ते लक्षात घेतले तर ‘विद्यार्थी म्हणजे निव्वळ डिक्‍शनऱ्या आणि डेटाबॅंक बनू पाहत आहेत!’ ही जावडेकर याची प्रतिक्रिया रास्तच आहे. आज विद्यार्थी शालान्त परीक्षांमध्ये १०० टक्‍के गुण मिळवत आहेत आणि त्यात त्यांना अभ्यासक्रमबाह्य उपक्रमांतून मिळवलेले गुण मिळवल्यावर त्यांची टक्‍केवारी शंभराहून अधिक झाल्याचे बघावयास मिळते. सध्याची शिक्षणपद्धती कोणत्या स्तराला गेली आहे, याचेच हे निदर्शक आहे. परीक्षातंत्रालाच निखळ ज्ञानापेक्षा महत्त्व आले, की एक पोकळ व्यवस्था तयार होते. तसे होत नाही ना, याचा मुळापासून चिकित्सक विचार करावा लागेल.

अर्थात, अभ्यासक्रम कमी करताना शिक्षण विभागाला अत्यंत काळजीपूर्वक काम करावे लागणार, यात शंकाच नाही. आज शालान्त परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढच्या प्रगत अभ्यासक्रमासाठी अनेक प्रवेशपरीक्षा द्याव्या लागतात. तेव्हा त्यांना शालेय अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन नवनवे विषय आणि संकल्पना आत्मसात कराव्या लागतात. त्यासाठीचा पाया पक्का करण्याचे काम व्हायला हवे. त्यामुळे अभ्यासक्रम कमी करताना, तो पुढच्या परीक्षांना कसा उपयुक्‍त ठरेल, याचाही विचार होणे जरुरीचे आहे. सध्याचे पदवीधारक हे दैनंदिन जीवन सुखकर होण्यासाठी आवश्‍यक ते ज्ञान क्‍वचितच मिळवतात आणि त्यासाठी त्यांना कौशल्याधारित शिक्षण द्यायला हवे, हा विचार १९६०च्या दशकात नियुक्‍त करण्यात आलेल्या कोठारी आयोगाच्या शिफारशींनंतर पुढे आला आणि त्यामुळेच महाराष्ट्रात ‘दहा अधिक दोन अधिक तीन’ असा नवा ‘पॅटर्न’ उभा राहिला. तेव्हा ‘दहा अधिक दोन’नंतर म्हणजेच बारावीनंतरही विद्यार्थ्यास आपल्या पायावर उभे राहता यावे म्हणून त्यास कौशल्याधारित शिक्षण देण्याचा विचार झाला होता. मात्र, तो कागदावरच राहिला. त्यामुळेच पदवीधारकांचे पेव उभे राहिले. आज अभियांत्रिकी असो की आणखी काही, त्यास व्यवस्थापन वा अन्य शिक्षणाची जोड असेल, असेच विद्यार्थी जीवनात यशस्वी होताना दिसत आहेत. त्यामुळेच केवळ ‘ॲकॅडमिक’ ज्ञानाच्या पलीकडले व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम किमान आता तरी तयार होतील, अशी आशा आहे. त्यापलीकडली आणखी एक बाब म्हणजे अभ्यासक्रमात कपात करण्याच्या नावाखाली आधुनिक आणि तंत्र-विज्ञानविषयक शिक्षणाऐवजी काही पुराणमतवादी अभ्यासक्रम तर शिक्षणक्षेत्रात घुसवण्याचा हा डाव नाही ना, अशीही शंका अनेकांच्या मनात आहे. तेव्हा जावडेकर यांच्या या निर्णयाचे स्वागत जरूर आहे. मात्र, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनावर काही नवे कालबाह्य विचारांचे ओझे तर लादले जाणार नाही ना, याचीही काळजी जावडेकर यांना घ्यावी लागणार आहे. शिक्षणात नवे प्रयोग करताना शिक्षणातून पुढच्या आयुष्यात उभे करू शकणारी कौशल्ये बाणवणे, हे आव्हान आहेच. दुसरीकडे शिक्षणाचा हेतू प्रगल्भ माणूस घडवणे, व्यक्तिमत्त्व फुलवणे हाही आहे, हे विसरण्याचे कारण नाही. अन्यथा, ‘जीवन ही अशी शाळा आहे की जेथे आधी परीक्षा होते आणि नंतर शिक्षण मिळते!’ या उक्‍तीचीच प्रचीती दस्तुरखुद्द जावडेकर यांनाच येण्याची शक्‍यता नाकारता येत नाही!

Web Title: editorial education school student maharashtra