पाकिस्तानचा दुटप्पीपणा उघड (मर्म)

sampadak
मंगळवार, 21 जून 2016

पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा सरकारने जिहादचे विद्यापीठ म्हणून मानल्या जाणाऱ्या ‘दारूल उलूम हक्कानिया नौशेरा‘ या मदरशाला 30 कोटी पाकिस्तानी रुपयांच्या निधीची अर्थसंकल्पातच तरतूद केली आहे. पाकिस्तान अधिकृतरीत्या दहशतवाद्याच्या पाठीशी उभे राहिल्याचे यातून अधोरेखीत होते. पाश्‍चिमात्य जगात त्यामुळे खळबळ उडाली असली, तरी भारताला यात नवीन वाटावे, असे काहीही नाही.

पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा सरकारने जिहादचे विद्यापीठ म्हणून मानल्या जाणाऱ्या ‘दारूल उलूम हक्कानिया नौशेरा‘ या मदरशाला 30 कोटी पाकिस्तानी रुपयांच्या निधीची अर्थसंकल्पातच तरतूद केली आहे. पाकिस्तान अधिकृतरीत्या दहशतवाद्याच्या पाठीशी उभे राहिल्याचे यातून अधोरेखीत होते. पाश्‍चिमात्य जगात त्यामुळे खळबळ उडाली असली, तरी भारताला यात नवीन वाटावे, असे काहीही नाही.

अनेक दशके भारत जगाच्या कानीकपाळी ओरडून सांगते आहे, की पाकिस्तान दहशतवाद्याच्या पाठीशी आहे. त्यांना प्रशिक्षण, शस्त्रास्त्रे पुरवते. घुसखोरीला मदत करून त्यांच्या माध्यमातून भारतासह जगाच्या कानाकोपऱ्यांत दहशतवादी हल्ले घडवत आहे. 2001 मध्ये संसदेवर झालेला हल्ला, 2006 मध्ये मुंबईत उपनगरी रेल्वेत झालेला आणि त्याचवर्षी वाराणशीत झालेला बॉंबस्फोट, 2008 मधील मुंबईवरील दहशतवादी हल्ला आणि काही महिन्यांपूर्वीचा पठाणकोट हवाईतळावरील हल्ला या सर्वांमागे पाकिस्तानचा दहशतवादी हातच होता. त्याबाबतचे पुरावे भारताने जगासमोर सादर केले. पाकधार्जिण्यांनी त्याला नाकारण्याचा प्रयत्न केला. आता तरी पाकिस्तानच्या दुटप्पी धोरणाला कडाडून विरोध करावा.

ज्या मदरशासाठी निधी मंजूर झाला तेथून तालिबानचा म्होरक्‍या मुल्ला उमर, हक्कानी नेटवर्कचा जलालुद्दीन हक्कानी, अल कायदाचा भारतासाठीचा हस्तक असिम उमर यांच्यासारख्या कडव्यांना प्रशिक्षण दिले आहे. 1947 मध्ये सुरू झालेल्या या मदरशाचा प्रमुख मौलाना सामी उल हक पाकिस्तानातील 40 संघटनांचा महासंघ असलेल्या दिफा-ए-पाकिस्तानचा अध्यक्ष आहे. या महासंघाच्या जमात उद दवा, सिपाह-ए-सहाबा या दहशतवादी संघटना सदस्य आहेत. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांचा सीमावर्ती भाग म्हणजे दहशतवाद्यांचे नंदनवन आहे. पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये भारतविरोधी जैश-ए-महंमद, जम्मू काश्‍मीर मुक्ती आघाडीसारख्या संघटनांच्या समर्थकांना प्रशिक्षण दिले जाते. पाकिस्तानात जाऊन शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण घ्यायचे आणि ‘आयएसआय‘च्या मदतीने आणि लष्कराच्या सहाय्याने भारतात घुसखोरी करून दहशतवाद माजवायचा हा नित्यक्रम आहे. त्याचे सज्जड पुरावे भारताने पुरवूनही कानाडोळा करणाऱ्या अमेरिकेसह पाश्‍चमात्य देशांनी आतातरी पाकिस्तानच्या संभावित मुखवट्याआड दडलेला दहशतवादाचा चेहरा ओळखून त्याला दुटप्पीपणा थांबवण्यास भाग पाडावे. क्रिकेटपटू इम्रान खानच्या तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे मुख्यमंत्री खैबर पख्तुनख्वामध्ये आहेत. याचीही नोंद त्याच्या चाहत्यांनी घ्यावी.

Web Title: Editorial Features marma