निव्वळ खडाखडी! (अग्रलेख)

Sampadak
मंगळवार, 21 जून 2016

महाराष्ट्राच्या सत्तेत सहभागी असलेल्या दोन्ही पक्षांनी आपापल्या कार्यकर्त्यांना संभ्रमात ठेवले आहे. नेत्यांनी बाह्या सरसावून आक्रमक भाषणे केली, तरी हा संभ्रम कायमच राहिला. 

महाराष्ट्राच्या सत्तेत सहभागी असलेल्या दोन्ही पक्षांनी आपापल्या कार्यकर्त्यांना संभ्रमात ठेवले आहे. नेत्यांनी बाह्या सरसावून आक्रमक भाषणे केली, तरी हा संभ्रम कायमच राहिला. 

शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याच्या दिवशीच भारतीय जनता पक्षाने आपल्या राज्य कार्यकारिणीची बैठक आयोजित करणे, हा योगायोग बिलकूलच नव्हता! नेमका तोच मुहूर्त साधून भाजप कार्यकर्त्यांनी आता ‘युती‘ नको, अशा घोषणांचा गजर करणे आणि त्यानंतर काही तासांतच झालेल्या सोहळ्यात शिवसेना पक्षप्रमुखांनी ‘स्वबळावर लढण्याची‘ ग्वाही शिवसैनिकांकडून वदवून घेणे, यात काही प्रमाणात साधर्म्य असले तरी, सध्या महाराष्ट्राच्या सत्तेत सहभागी असलेल्या या दोन्ही पक्षांनी आपापल्या कार्यकर्त्यांना संभ्रमात ठेवण्याचे उद्दिष्टही साध्य करून घेतले. उद्धव यांनी एकीकडे स्वबळावर लढायला तयार आहात का नाही, असा सवाल शिवसैनिकांना करणे आणि त्याचवेळी भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांनी शिवसेनेबद्दल चार शब्द बरे बोलणे, तर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मात्र वेगळाच सूर लावणे, या साऱ्या घटनांमागील हेतू एकच आहे आणि तो म्हणजे आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ही तथाकथित युती तोडण्याचे ‘पातक‘ आपल्या शिरावर येऊ नये, हाच आहे! त्यामुळेच गेले काही दिवस आपल्या मुखपत्रांतून भाजपवर अत्यंत तिखट टीका केली जात असतानाही, भाजपबरोबरच्या संबंधांबाबत ना उद्धव यांनी काही ‘रोखठोक‘ विधान केले, ना भाजपने कार्यकारिणीतील राजकीय ठरावात काही ठोस भूमिका घेतली. गेल्या काही दिवसांत या दोन्ही ‘मित्र‘ पक्षांमधील तणाव इतके टोकाला गेले आहेत, की आता मुंबई आणि अन्य महापालिकांच्या तोंडावर आलेल्या निवडणुकांत युती होणे, केवळ महाकठीण असल्याचे स्पष्ट झाले आहे. तरीही कोणी स्पष्ट बोलायला तयार नसल्यामुळे आता ही खडाखडी शेवटच्या क्षणापर्यंत सुरू राहणार, अशीच चिन्हे आहेत. 

सुवर्ण महोत्सवी सोहळ्याच्या निमित्ताने ठळकपणे सामोरा आलेला प्रश्‍न हाच आहे की आता शिवसेनेपुढील सर्वांत मोठे आव्हान कोणते आहे? या प्रश्‍नाचे निर्विवाद उत्तर ‘भाजप‘ हेच आहे. त्यामुळेच उद्धव यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचा कारभार यांना आपल्या भाषणात लक्ष्य केले. मात्र, त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मात्र त्यांनी स्तुतिसुमने उधळली. फडणवीस यांनीही त्यापूर्वी ट्विट करून ‘उद्धवजी ठाकरे आणि सर्व शिवसैनिकांना मनापासून शुभेच्छा!‘ दिल्या होत्या. त्यामुळे एकीकडे मुंबई भाजपचे अध्यक्षच महापालिकेतील शिवसेनेच्या कारभाराची लक्‍तरे चव्हाट्यावर आणत असल्यामुळे आता शिवसेना त्यास प्रत्युत्तर म्हणून मोदी सरकारला यापुढेही सातत्याने लक्ष्य करत राहणार, असे दिसत आहे.

त्याची चुणूकच उद्धव यांनी या सोहळ्यात दाखवली. वाढती महागाई, सीमेवर रोजच्या रोज होणाऱ्या कुरबुरी यांचा कठोर शब्दांत उल्लेख करत ‘सरकार बदललं; पण परिस्थिती मात्र तीच आहे!‘ असा टोला त्यांनी थेट मोदी यांना लगावला. ‘अच्छे दिन‘ची गोष्टच सोडा; काही क्षण तरी समाधानात जाऊ द्या!‘ - हे उद्धव यांचे वाक्‍य तर भाजपच्या नाकाला थेट मिरच्यांची धुरी देणारे होते. लोकसभेच्या वेळची युती पुढे तुटली आणि त्यानंतर मोदी यांनी एका राज्याच्या विधानसभेसाठी महिनाभरात महाराष्ट्रात 27 सभा घेतल्या, या उल्लेखामुळे त्यांच्या व्यथावेदना लपून राहिल्या नाहीत. मात्र, खरा प्रश्‍न या दोन्ही पक्षांनी आगामी निवडणुकांतील युतीबाबतचा संभ्रम कायम ठेवल्यामुळे आता या दोन्ही पक्षांची रणनीती काय राहणार, हा आहे. भाजपची साथ सुटली, तर बिगर-मराठी म्हणजेच प्रामुख्याने उत्तर भारतीय तसेच गुजराती मते आपल्याला मिळणार नाहीत, हे उद्धव जाणून असल्याचे त्यांनी केलेल्या हिंदुत्वाच्या गजरामुळे स्पष्ट झाले. हिंदुत्वावर पहिला हक्‍क आपलाच आहे, हे त्यांनी अयोध्येतील ‘बाबरीकांडा‘ची जबाबदारी बाळासाहेब ठाकरे यांनी कशी स्वीकारली आणि पुढच्या दंगलींमध्ये शिवसेनेने बजावलेली ‘हिंदू-संरक्षका‘ची भूमिका आदी उदाहरणे वारंवार देत ठासून सांगितले. त्यामुळे एका अर्थाने या भाषणाकडे बघितले तर उद्धव यांची स्वबळावर लढायची मानसिकता तयार झाली आहे, हेच दिसते, तर भाजपची रणनीती आता शिवसेनेचा सर्वार्थाने प्राण असलेल्या मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या कारभारातील ‘घोटाळे‘ बाहेर काढण्याची असू शकते. मात्र, मुंबई महापालिकेतील सत्तेत आपणही सहभागी आहोत, याकडे भाजप जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असला, तरी मुंबईकर मात्र ते विसरू शकत नाहीत. 

त्यामुळे 2019च्या विधानसभेत काय होईल, याची रंगीत तालीमच या जवळपास डझनभर महापालिकांच्या निवडणुकांतून बघायला मिळणार आहे. या महापालिका राज्याच्या दूरदूरच्या भागात आहेत. त्यामुळे अवघे राज्यच या दोन्ही पक्षांच्या ‘लीलां‘कडे बघत आहे. त्यात पाऊस पडायच्या आधीच गारठून गेलेली कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेत जसा शिवसेनेचे वाघ आणि भाजपचे सिंह एकमेकांविरोधात प्राणपणाने लढले, त्याचीच पुनरावृत्ती राज्यभरात बघायला मिळू शकते. शिवाय, एकमेकांविरुद्ध लढून पुढे पुन्हा सत्तेत येण्याचा पर्याय उपलब्ध आहेच! त्यामुळे निदान आजमितीला तरी या दोन्ही पक्षांनी आपापल्या कार्यकर्त्यांना संभ्रमातच ठेवले आहे.

Web Title: #Editorial, Features, Politics, BJP, Shiv Sena