सृष्टीतलं हे नवेपण!

हेमकिरण पत्की
मंगळवार, 2 जानेवारी 2018

आपण पहाटे फिरायला बाहेर पडतो. आपलं मनही आपल्यासोबत बाहेर पडतं, सोबत चालायला लागतं. आपल्यासारखे अनेक जण फिरायला बाहेर पडलेले असतात. माणसांचे थवेच्या थवे रस्त्यांवर दिसतात. त्यांचे वेष, त्यांची गती, एकमेकांमध्ये घडणारी संभाषणं... आपले डोळे सगळं न्याहाळत असतात. सगळं निरखलं जातं, टिपलं जातं. चालता चालता पळभर आपलं आपल्याशीही बोलणं बंद होतं. आपल्या ते ध्यानातही येतं. मनाची ही स्थिती कुठल्याही प्रकारच्या यांत्रिकतेतून आलेली नसते. अशाच स्थितीत मनाच्या खोल तळातून एक विचार उमलतो ः सगळं नवीनच तर आहे ! मन भवतालाच्या नवीनतेनं भरून जातं. दिठी टवटवीत होते.

आपण पहाटे फिरायला बाहेर पडतो. आपलं मनही आपल्यासोबत बाहेर पडतं, सोबत चालायला लागतं. आपल्यासारखे अनेक जण फिरायला बाहेर पडलेले असतात. माणसांचे थवेच्या थवे रस्त्यांवर दिसतात. त्यांचे वेष, त्यांची गती, एकमेकांमध्ये घडणारी संभाषणं... आपले डोळे सगळं न्याहाळत असतात. सगळं निरखलं जातं, टिपलं जातं. चालता चालता पळभर आपलं आपल्याशीही बोलणं बंद होतं. आपल्या ते ध्यानातही येतं. मनाची ही स्थिती कुठल्याही प्रकारच्या यांत्रिकतेतून आलेली नसते. अशाच स्थितीत मनाच्या खोल तळातून एक विचार उमलतो ः सगळं नवीनच तर आहे ! मन भवतालाच्या नवीनतेनं भरून जातं. दिठी टवटवीत होते. पायाखालचा रस्ता, दुतर्फाची झाडं, प्रभातीचा उजेड सगळंच कसं चेतनेच्या धारेखाली न्हाऊन निघाल्यासारखं... कंटाळा कुठल्या कुठं विरून जातो.

मनात येतं, रक्‍त जसं अभिसरणानं नवं होतं, शुद्ध होतं, तसंच या दिठीचं आहे. निसर्गाच्या निरीक्षणानं दिठी टवटवीत होते, शुद्ध होते. नवीनता अशी इंद्रिय संवेदनेत विरघळल्यावर काहीच जुनं राहत नाही. जे जाणवतं, अनुभवाला येतं, ते नवीनच वाटू लागतं. ही स्थितीच खरंतर मनाची स्वाभाविक स्थिती असते.

आपल्या ध्यानात येतं, सृष्टीमध्ये, माणसामध्ये नित्यनूतनता आहे. सतत आपल्या आत आणि बाहेर काही नवीन घडतं आहे. दरवर्षी वसंत ऋतू येतो. झाडं तीच असतात, पण पालवी नवी असते. हे नवंपण हृदयाला एकदा उमजलं की नित्यनूतनतेचं आपण साक्षात दर्शन घेऊ शकतो. निसर्गातला परिवर्तनाचा धर्म हा असा सरळसाधा आहे! आपण मात्र तो किती गुंतागुंतीचा करून टाकतो! अंगणातल्या बदामाच्या झाडाचा पाचोळा आपल्याला कचरा वाटतो. पावसानं होणारा चिखल आपल्याला चिकचिक वाटते. उन्हाळ्यातलं ऊन दिठी कोरडी करेल की काय, अशा भीतीसह आपण ते डोळ्यांत घेतो. हे नवीन असणं एखाद्या ‘फॅशन’सारखं नसतं. ते सहज असतं. स्वाभाविकतेनं जगणाऱ्यालाच ते दिसतं.

सारं जगच नवीन वर्षाचं स्वागत करतं. मग या नवीन वर्षाचा आशय काय असतो? कॅलेंडर नवं असतं, पंचांग नवं असतं, म्हणून वर्ष नवं असतं काय? खरंतर या अर्थाचं नवेपणाला सातत्य नसतं. आधीची कुठलीच गोष्ट त्यात निव्वळ वरवरचा बदल घेऊन येत नसते. अगदी उदाहरणच घ्यायचं झालं तर एखाद्या मेणबत्तीचं घेता येईल. मेणबत्ती पेटवतो, तेव्हा उजेड पडतो. पण तीच वाऱ्यानं विझते तेव्हा अंधार दाटतो. आपण ती मेणबत्ती पुन्हा पेटवतो, तेव्हा आसपास पहिलाच उजेड पडत नाही. मेणबत्ती तीच असली, तरी उजेड नवा असतो.

नवीन वर्षाचं स्वागत करताना चेतनेतलं हे नवंपण हृदयात उतरेल, तर सुखभोगांच्या गोष्टींशिवाय आपण आनंदी असू. केवळ समोरचा काळच साजरा करायचा नाही, तर त्या पलीकडचं व्यापक अवकाश आपल्याला कवटाळायचं आहे, हे आपल्या ध्यानात येईल.

Web Title: editorial hemkiran patki article