निसर्गदर्शनातली सुंदरता

निसर्गदर्शनातली सुंदरता

कोकणातल्या एका समुद्रकिनाऱ्याजवळच्या गावी सहज सहलीसाठी गेलो होतो. सोबत परिवार होता. निसर्गाच्या सहवासात दोन दिवस राहावं, जरा परिसर-बदल अनुभवावा असं काहीसं मनात होतं; आणि तसंच घडत होतं. आम्हा साऱ्यांची मनं मोकळा अवकाश पाहून फुलून आली होती. कौलारू छपरांची घरं, अंगण परसातली माडा-पोफळींची, फणसांची झाडं, लाल मातीच्या पायवाटा, समुद्राची अखंड गाज आणि हवेत तरळणारा समुद्रकाठच्या गावमातीचा गंध... मन थाऱ्यावर होतं आणि नव्हतंही. संध्याकाळची वेळ होती. वर्दळ नसलेला समुद्रकिनारा. दूरवर पसरलेली फिकट पिवळ्या वाळूची ओलसर पुळण. ऊन कलतं झालेलं. समुद्राच्या उसळत्या लाटा सोनेरी रंग माखून किनाऱ्याकडं परतत होत्या. समुद्रावर दूर क्षितिजाच्या पलीकडं तो तेजाचा गोळा केशरी झालेला होता. साऱ्या वस्तुमात्रांवर एक विलक्षण मोहिनी पसरलेली. काही पर्यटकांचे, तरुण मुलांचे सूर्यास्ताचा फोटो काढण्याचे प्रयत्न चाललेले. सूर्य अथांग पाण्यात बुडतानाचे दृश्‍य पाहताना शब्द मावळले. दिठीनं खोल आत घेतलेला तो नितांत सुंदर सूर्यास्ताचा देखावा मनात उरला.

मी आता पायातल्या चपला काढून पुळणीवर ठेवल्या. साऱ्यातून स्वतःला बाजूला सारून समुद्राचा झालो. मला वाटलं, एक अपार मोकळीक आणि असीम सुंदरता माझ्या आत आणि बाहेर पसरलीय आणि तीच सर्वदूरही आहे. रंगवलेल्या चित्राची मला आठवण आली. एक निसर्गचित्रच अबोध मनानं रंगवलं होतं. चित्रात निळेशार आडवे डोंगर, उगवतीचा लालबुंद सूर्य, डोंगरातून वळणावळणांनी निघालेली गर्द जांभळी नदी, पाण्यातली उलट्या त्रिकोणाची होडी, एक झोपडी, गच्च हिरवं झाड आणि ‘चार’च्या आकड्यांची पाखरांची माळ होती. तसं तर हे चित्र साऱ्याच लहान मुलांचं होतं. आपली पहिली अभिव्यक्ती रंगाकारातून साकार करणारं. मनात आलं, चाकोरीबाहेर पाऊल पडल्याशिवाय निसर्गातली सुंदरता दिसणार तरी कशी?
रंगवलेलं चित्र बालकल्पनेतलं होतं; आणि आता डोळ्यांतून हृदयात उतरलेलं चित्र प्रत्यक्ष निसर्गदर्शनानंतरचं होतं. मला वाटलं, पहिल्यांदा रंगवलेलं चित्र असंस्कारित आणि कुठल्याही प्रभावाशिवाय साकार झालेलं होतं. त्यातले रंग आणि आकार वास्तविक नव्हते. तरीदेखील ते चित्र खूप सुंदर होतं. मग सुंदरता निर्माण करणारी कोणती गोष्ट त्या चित्रात होती? मनात आलं, काळाचा स्पर्श नसलेलं निरागस मन. या अपार निरागसतेमुळंच स्वतःला प्रकट करणं सुंदर होतं. वय वाढत जातं, तसं कलेविषयी आसक्त असलेलं, सुंदरतेची ओढ असलेलं मन एका जाणिवेनं निसर्गदर्शनाच्या मागे धावतं; आणि या जाणिवेमुळंच निसर्गाच्या दर्शनातली सहजता हरवते.  सुंदरता म्हणजे आपल्या संवेदनशील मनाची तरलताच असते. ही तरलता योग्य आहार, जगण्याची स्वाभाविक रीत यातून जपली जाते. कुणा दुसऱ्याचा विचार अंगीकारून तिला जपावं लागत नाही. मन तरल असतं, तेव्हाच हृदयात उतरतं आणि काळाचा स्पर्श नसलेलं निरागस मनच तरल असतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com