आत्मप्रीतीची रीत

hemkiran patki
hemkiran patki

दुपार टळली होती. उन्हं उतरत होती. संधिप्रकाशाचा सोनेरी पिसारा अजून फुललेला होता. उन्हाळ्याचे दिवस होते. उकाड्यानं जीव नुसता हैराण झाला होता. पण मधूनच वाऱ्याची एखादी झुळूक अंगाला बिलगून पुढं जात होती. झाडांची दाट हिरवी, पण आता सोनेरी झालेली पानं वाऱ्याची झुळूक येताच सळसळत होती. घरट्याकडं परतण्याची पाखरांची एकच घाई चालली होती. दिवसाचा उजेड संपल्याची वार्ता पाखरांना कळली होती. त्याचं काळाचं भान आणि दिशांचा वेध किती अचूक होता!
मी एकटाच घराबाहेर पडलो होतो. मोकळा रस्ता, ढगावेगळं आकाश, पाखरांनी भरलेली आणि तरीही शांत असलेली झाडं मनाला ओढ लावत होती. माझ्या गुंतलेल्या मनाला असा मोकळा अवकाश हवा होता. तो माझ्या दृष्टीसमोरच होता. या रस्त्यावर जुनं गणपतीचं मंदिर होतं. मंदिराच्या बाहेर प्रवेशद्वारालगत एका फळ्यावर ‘स्वतःवर प्रेम करा’ या विषयावरल्या व्याख्यानाची सूचना लिहिली होती. मनात आलं, जन्मासोबत लाभलेल्या आपल्या रंग-रूपावर, गुणांवर, विकसनशील दृष्टीवर, सुखाचं कारण असलेल्या इंद्रियांवर आणि आपल्या संवेदन स्वभावावर आपण प्रेम करायला हवं. कारण या स्वतःवरच्या प्रेमाच्या अभावातूनच तर न्यूनगंड जन्माला येतो. या गंडाचा झाकोळ हृदय-संवेदनेवर पडतो. मग बघता-बघता आतलं अवकाश न्यूनत्वानं भरून जातं. स्वतः निर्माण केलेल्या कुठल्याही कृतीविषयी मनापासून संतोष वाटत नाही. हा असला असंतोष आपल्यालाच आपला शत्रू बनवतो.

मला आठवलं ः परवाच माझा एक जवळचा कविमित्र म्हणाला होता, की त्याला आता कविता लिहिण्यात रस राहिला नाही. घरातल्या संवादाच्या अभावामुळं, कार्यालयीन कामकाजातल्या ताणामुळं आणि नव्या कवितेशी त्याची नाळ जुळत नसल्यामुळं त्याचं कविता लिहिणं थांबलंय. कवितेच्या मूळ भावस्थितीत त्याला आता राहता येत नाहीय. त्याचं सारं बोलून झाल्यावर माझ्या मनातला एक प्रश्‍न मी स्वतःसह त्याला विचारला होता. कविता लिहिणं ही क्रिया मनाचा निचरा होणं आहे की हृद्‌गताचं सहज व्यक्त होणं आहे?

आपण इथं-तिथं बोलून आतली वाफ दवडतो. अभिव्यक्तीची आंतर-शिस्त आपल्यात किती आहे, त्यासाठीची तातडी, संवेदनेची तीव्रता, लिहिण्यामागचा आपला हेतू आपण नीट जाणून घेतलाय काय? हा विचारही महत्त्वाचा आहे. आपल्या कृतीतली आपली भावनिक गुंतवणूक जेव्हा समकालीन जाणिवेच्या तुलनेतून वा स्पर्धेतून घडत नाही तेव्हाच ती आनंदपर्यवसायी होते. अशी कृतीच आतल्या अपुरेपणाला पाहायचा स्वच्छ उजेड देते. नव्या कृतीसाठीची सुपीक भूमी होते. योग्य रीतीनं स्वतःवर प्रेम केलं तर परिस्थिती, मनःस्थिती आणि नियती याविषयीचं शहाणपण आपोआप उमलून येतं. वर्तमानात आपण जसे आहोत त्या असतेपणावर आपलं प्रेम जडायला हवं. हे प्रेमच हृदयातलं संगीत, मनाची शांतता आणि अज्ञाताचा प्रसाद असतो!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com