प्रेमभावाचे अंकुरण

हेमकिरण पत्की
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

शहरातल्या एका शाळेत कविता वाचनासाठी मला बोलावलं होतं. माध्यमिक शाळा अगदी मध्यवर्ती ठिकाणी होती. शाळेत प्रवेश करण्यासाठी एक रुंद फाटक होतं. आत गेलं की उजव्या बाजूला मुख्याध्यापकांचं कार्यालय आणि कार्यालयामागं मुलांच्या विविध उपक्रमांसाठी सुसज्ज असं सभागृह होतं. याच सभागृहात कविता वाचनाचा कार्यक्रम झाला. मुख्याध्यापकांनी मुलांची हस्तलिखितं माझ्या पुढ्यात ठेवली. एकेका हस्तलिखिताच्या पानावरून माझी दृष्टी पुढं सरकत असताना ती एके ठिकाणी थबकली. हस्तलिखितातल्या अनुक्रमणिकेच्या पानामागं रंगीत पेन्सिलींनी रंगवलेलं एक लाल गुलाबाचं फूल दिसलं.

शहरातल्या एका शाळेत कविता वाचनासाठी मला बोलावलं होतं. माध्यमिक शाळा अगदी मध्यवर्ती ठिकाणी होती. शाळेत प्रवेश करण्यासाठी एक रुंद फाटक होतं. आत गेलं की उजव्या बाजूला मुख्याध्यापकांचं कार्यालय आणि कार्यालयामागं मुलांच्या विविध उपक्रमांसाठी सुसज्ज असं सभागृह होतं. याच सभागृहात कविता वाचनाचा कार्यक्रम झाला. मुख्याध्यापकांनी मुलांची हस्तलिखितं माझ्या पुढ्यात ठेवली. एकेका हस्तलिखिताच्या पानावरून माझी दृष्टी पुढं सरकत असताना ती एके ठिकाणी थबकली. हस्तलिखितातल्या अनुक्रमणिकेच्या पानामागं रंगीत पेन्सिलींनी रंगवलेलं एक लाल गुलाबाचं फूल दिसलं. त्या हस्तलिखिताची पानं उलटता उलटता माझी अंतर्दृष्टी शाळेच्या ‘त्या’ दिवसांत हरवली... सरसर शिरवं नि फिरून पडणारं ऊन डोळ्यांसमोर तरळलं...

शालेय जीवनातील तेव्हाचा एक तरल नि प्रेमळ प्रसंग मनात उभा राहिला. तेव्हा मी नववीत होतो. वर्गातल्या एका मुलीनं माझी पदार्थविज्ञानाची वही टिपणं उतरवून घेण्यासाठी मागितली होती. शाळा सुटल्यावर खुणेनं तिनं मला थांबायला सांगितलं होतं. किणकिणत्या हातांनी तिनं वही घेतली होती नि लिहून झाल्यावर पुन्हा परत करण्याविषयीचं बोलणं केलं होतं. मला केवढा आनंद झाला होता! हा आनंद माझ्या चेहऱ्यावर उमटला होता की नव्हता कुणास ठाऊक! मात्र तिच्या डोळ्यांत वेगळीच लुकलुक पाहिली होती. बोलल्याप्रमाणं तिनं ती वही एके दिवशी शाळा सुटल्यावर परत केली. तेव्हा आम्ही एकमेकांशी काहीच बोललो नाही. रात्री कंदिलाच्या उजेडात कच्च्या वहीत लिहिलेलं टिपण पदार्थविज्ञानाच्या वहीत उतरवून घेण्यासाठी वही उघडली. वहीच्या पहिल्याच पानावर नाव पत्त्याखाली त्या मुलीनं रंगीत पेन्सिलींनी रंगवलेलं उमलत्या पाकळ्यांचं गुलाबाचं फूल दिसलं. फुलाच्या गाभ्याशी अलवार दुमडल्या पाकळीवर एक पिवळ्या रंगाचं फुलपाखरू पंख उघडून निवांतलं होतं...
आज हा साराच प्रसंग मनात जसाच्या तसा जिवंत झाल्यावर वाटलं. यातून तिला काही सुचवायचं होतं की वयात येतानाचा तो एक सुंदर आविष्कार होता. तेव्हा काहीच कळालं नाही. एवढं खरं की माझ्या मनाचं फुलपाखरू झालं होतं...

आज कळू लागल्यावर नकळत्या वयातले कितीतरी प्रसंग आठवतात. मनात येतं, नकळत्या वयाचंही एक कळणं असतं, जे जगण्याच्या धावपळीत आपल्याला धूसर दिसतं; कधी कधी तर दिसतही नाही. पण ते आपल्याठायी अंतर्मनात असतंच-देहबुद्धीच्या उजेडासारखं. खरंतर या उजेडाकडं पाठ करून वयाचा कुठलाच थांबा मागं टाकता येत नाही आणि प्रेमाच्या अंतिम मुक्कामापर्यंत पोचता येत नाही. वयात येतानाचं भावस्थितीचं हळुवारपण नीट उमजावं लागतं. नाहीतर पुढली कळण्याची वाट अवघड होते. आपण कळण्या-नकळण्याच्या क्षितिजावर संवेदनशील होऊन सळसळायला लागतो, तेव्हाच आपल्यातल्या अमाप ऊर्जेचा अनुभव येतो. प्रयत्नांपलीकडले नियतीचे संकेत आपल्या दृष्टीला साक्षात दिसतात.

Web Title: editorial hemkiran patki write article in pahatpawal