अंदाजाचा सुखद शिडकावा (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 एप्रिल 2018

यंदा सर्वसाधारण पाऊस पडेल, हा हवामान खात्याचा अंदाज शेती क्षेत्रालाच नव्हे, तर एकूण अर्थव्यवस्थेलाही सुखद दिलासा देणारा आहे. निसर्गाचे हे अनुकूल दान खऱ्या अर्थाने लाभदायी ठरण्यासाठी आत्तापासून जोमाने तयारीला लागले पाहिजे.

यंदा सर्वसाधारण पाऊस पडेल, हा हवामान खात्याचा अंदाज शेती क्षेत्रालाच नव्हे, तर एकूण अर्थव्यवस्थेलाही सुखद दिलासा देणारा आहे. निसर्गाचे हे अनुकूल दान खऱ्या अर्थाने लाभदायी ठरण्यासाठी आत्तापासून जोमाने तयारीला लागले पाहिजे.

वे गवेगळ्या घटनांमुळे अर्थव्यवस्थेविषयी काळजीचे मळभ दाटत असतानाच यंदाचा मॉन्सून सरासरीइतका बरसेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त करून सर्वच घटकांना सुखद दिलासा दिला आहे. यावर्षीचा पाऊस समाधानकारक राहील, असे एकापाठोपाठ आलेले दोन अंदाज सर्वसामान्यांच्या जीवनात आशा पल्लवीत करणारे आहेत. सरासरी ९६ टक्के पाऊस पडेल आणि त्यात पाच टक्के कमी-अधिक फरक पडू शकतो, असे अंदाज सांगतो. या सांगाव्याने शेअर बाजारातही आनंदाचा शिडकावा केला आहे. अंगाची लाही लाही करणारा, अस्वस्थ करणारा उकाडा जाणवत आहे. ‘अवकाळी’चे ढग सध्या गडगडत आहेत. काहींची धांदल उडत आहे; तर काहींच्या जिवाची तगमग वाढत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आलेला हा सांगावा सुखाच्या पेरणीला लागा, असे सूचित करत आहे.

वर्षाखेरीला किंवा नववर्षाच्या सुरवातीला लोकसभा निवडणुकांचा बिगुल देशभर वाजेल. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचीही मोर्चेबांधणी गती घेईल. त्यादृष्टीनेही पावसाचे बरसणे लाखमोलाचे असते. आपली बरीचशी शेती ही प्रामुख्याने पावसावर अवलंबून असल्याने शेतीचे अर्थकारण घडणे वा बिघडणे हे वरुणराजाच्या कृपादृष्टीवर अवलंबून असते. साधारणतः साठ टक्‍क्‍यांवर जनतेचे अर्थकारण आजही शेती आणि तिच्याशी संबंधित उद्योग, व्यवसायाशी निगडित आहे. या संबंधित सर्वच घटकांचा हुरूप या सांगाव्यामुळे वाढला असेल, यात शंका नाही. गेली काही वर्षे महाराष्ट्रात गावपातळीवर सुरू असलेला जलसंधारणाच्या कामांचा झपाटा प्रशंसनीय आहे. सरकारी यंत्रणेची वाट न पाहता लोकसहभागातून जलसंधारणाची कामे करीत गावशिवार हिरवेगार करण्याच्या निकोप स्पर्धेने ग्रामीण जीवनात मूळ धरले आहे. ही कामे मराठवाड्यासह पश्‍चिम महाराष्ट्रातल्या गावोगावी होत आहेत. पावसाचा सांगावा लक्षात घेता त्याला गती दिली पाहिजे. कारण, या वेळी ‘एल निनो’चा परिणाम सप्टेंबर किंवा त्यानंतर दिसणार आहे. म्हणजेच, आपल्याकडचा पावसाळा आटोपत असताना. त्यामुळे पाऊसमानावर त्याचा प्रभाव जाणवणार नाही, असे दिसते.
कृषी खात्याच्या खरीप आढावा बैठकी सध्या सुरू आहेत. त्यातल्या नियोजनाला दिशा द्यायला, ते अधिक बिनचूक करायला आणि धोरणात्मक बाबी अधिक टोकदार ठरवायला, या अंदाजाची मदत होणार आहे. तथापि, ‘देव आहे द्यायला आणि पदर नाही घ्यायला’, अशी बळिराजाची अवस्था होऊ न देणे सरकारी यंत्रणेच्या हातात आहे. बोंड अळीचे थैमान आणि त्याचे दुष्परिणाम यातून कापूस उत्पादक सावरलेला नाही. डाळी आणि कडधान्यांचे गडगडलेले भाव याची चिंता आहे. त्यांची सरकारी खरेदी पूर्ण झालेली नाही, चुकारे बाकी आहेत. कर्जमाफीचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच असल्याने भांडवलाचा प्रश्‍न शेतकऱ्यांना भेडसावणार आहे. त्यावरील तोडग्याचे नियोजन केले पाहिजे. हंगामाच्या तयारीला पैसा मिळाला नाही, तर काळदेखील त्याला आणि आपल्यापैकी कोणालाच माफ करणार नाही. दर्जेदार बी-बियाण्यांसह खते, कीटक आणि कीडनाशकांची उपलब्धता याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे. बोंड अळीच्या प्रादुर्भावाने धास्तावलेल्या कापूस उत्पादकाला दिलासा द्यायला हवा. सोयाबीन, कडधान्यांचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज असल्याने त्याचे बियाणे पुरेसे उपलब्ध केले पाहिजेत. बियाण्यांबरोबर उत्पादित मालाच्या भावाचीही ठोस हमी द्यायला हवी. नेहमी चर्चेत आणि वादात अडकणारी पीकविमा योजना शेतकऱ्याला रडवणारी नव्हे, तर सक्षमपणे उभी करणारी ठरली पाहिजे. अस्मानी संकटाचे स्वरूप वेगाने बदलत आहे. मदतीचा हात देताना तांत्रिक बाबींचा किस निघतो आणि बळिराजा वाऱ्यावर राहतो, असे या योजनेबाबत घडते. ते टाळले पाहिजे. पावसाचा प्राथमिक अंदाज ही नांदी आहे. त्यातली वाढणारी बिनचूकता शेतकऱ्याला नियोजनाला, निर्णय घ्यायला आणि पिकांसाठी सावध पावले उचलायला मदतकारक ठरणारी आहे. त्यामुळेच स्थानिक हवामान सल्ला केंद्रांचे जाळे अधिक बळकट आणि सक्षम केल्यास शेतकऱ्याला पिकाची जोपासना आणि काळजी यासाठी उपयुक्त ठरेल. हे अंदाजही वेळेत शेतकऱ्यांपर्यंत पोचले पाहिजेत. विशेषतः सलामी दमदार आणि नंतर धाबे दणाणून सोडणे, अशी आपल्याकडील पावसाची स्थिती असते. त्याने शेतकऱ्याच्या तोंडचे पाणी पळते. पीक वाळते, काढून द्यायची वेळ येते, तेव्हा पावसाची हजेरी लागते. त्यामुळेच सरासरीइतकाच महत्त्वाचा मुद्दा आहे तो पावसाच्या वेळापत्रकाचाही. त्या बाबतीतही वरुणराजाची कृपादृष्टी तेवढीच राहील, अशी आशा करायला हरकत नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial imd forecasts average monsoon rains in 2018