कुरापतींची ‘हद्द’ (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जानेवारी 2018

काश्‍मीरमध्ये ज्या नियोजनबद्ध पद्धतीने जवानांच्या तळावर हल्ला करण्यात आला, ते पाहता हल्ल्यामागे पाकिस्तानचीच फूस आहे. अशा कुरापतींना ठोस उत्तर देण्याची गरज आहे.

सरत्या वर्षाच्या शेवटच्या पहाटेस दहशतवाद्यांनी काश्‍मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यातील केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) तळावर हल्ला केल्यामुळे नववर्षात भारताबरोबर पाकिस्तान नेमके कसे संबंध ठेवू इच्छित आहे, याची कल्पना आली आहे. ‘जैशे मोहंमद’ या दहशतवादी संघटनेने हा हल्ला केल्याचे सांगण्यात येत असले, तरी या आणि अशा दहशतवादी संघटनांना पाठबळ पुरवण्याचे काम पाकिस्तानच करत असते, हे वारंवार सिद्ध झाले आहे. ‘सीआरपीएफ’च्या प्रशिक्षण तळावरील या हल्ल्याचे स्वरूप लक्षात घेतले, की हा हल्ला कसा नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आला होता, ते स्पष्ट होते. पाच जवान या हल्ल्यात धारातीर्थी पडले. त्यामुळेच नित्यनेमाने होणाऱ्या चकमकींपैकी एक असे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. दहशतवाद्यांनी प्रथम गस्त घालणाऱ्या वाहनावर गोळीबार केला आणि नंतर ते या तळावर घुसले. तेथे प्रामुख्याने जवानांची कुटुंबकबिल्यासह निवासस्थानेच होती, असे नाही तर तळावरची मुख्य कार्यालये, सिग्नल सेंटर व इस्पितळही होते. हे लक्षात घेतले की या हल्ल्याचे गांभीर्य लक्षात येते. याचा अर्थ स्पष्ट आहे. या तळाचा संपूर्ण आराखडाच दहशतवाद्यांकडे होता आणि पाकिस्तानी लष्कराच्या साह्याविना हे होणे कठीण होते. या हल्ल्यास ‘सीआरपीएफ’च्या जवानांनी चोख उत्तर देत, दोन दहशतवाद्यांचा खातमा केला असला, तरी भारतीय दल हे नेहमीप्रमाणेच गाफील अवस्थेत सापडले, ही बाब नाकारता येणार नाही. एकीकडे दहशतवाद्यांमार्फत हा हल्ला घडवून आणतानाच, मुंबईवरील हल्ल्याच्या कटाचा प्रमुख सूत्रधार हाफीझ सईद हा नजरकैदेतून मोकाट सुटल्यावर, त्याने पॅलेस्टाईनला सहानुभूती दाखवण्यासाठी आयोजिलेल्या मेळाव्याची पाकिस्तान सरकारने पाठराखण केली आहे. हे सारे सहजासहजी घडून आलेले नाही. पाकिस्तान सरकारची फूस या दोन्ही घटनांमागे असल्याचेच त्यामुळे अधोरेखित झाले आहे. त्याच वेळी राजौरी परिसरातही पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात एक भारतीय जवान धारातीर्थी पडल्याचे वृत्त असून, त्यामुळे सरत्या वर्षांत पाकिस्तानने सीमारेषा ओलांडून केलेल्या गोळीबारात हुतात्मा झालेल्या भारतीय जवानांची संख्या २३ झाली आहे. त्यामुळेच पाकिस्तानच्या या कुरापतींना आता ठोस उत्तर देण्यावाचून पर्याय उरलेला नाही.

या कुरापतींना पार्श्‍वभूमी होती ती गेल्या आठवड्यात हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानच्या कैदेत असलेले भारतीय नौदलाचे अधिकारी कुलभूषण जाधव यांची व त्यांच्या कुटुंबीयांच्या भेटीची. या भेटीमुळे आपण मोठे मानवतावादी असल्याचा डिंडिम पाकिस्तान जागतिक स्तरावर पिटू पाहत असला, तरी ही भेट जाधव यांच्या कुटुंबीयांची कमालीची अवहेलना करून, घडवून आणली गेली होती. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी त्याबद्दल तिखट शब्दांत पाकिस्तानला समज दिल्यानंतरच्या चारच दिवसांत हे हल्ले झाले आहेत. त्यामुळेच पाकिस्तानचे भारताबद्दलचे धोरणही उघड झाले आहे. मात्र, या पार्श्‍वभूमीवर जाधव कुटुंबीयच नव्हे, तर संपूर्ण देशाचाच पाकिस्तानने केलेल्या अवमानाच्या दुसऱ्याच दिवशी दोन्ही देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची थायलंडच्या राजधानीत झालेली भेट बुचकळ्यात टाकणारी आहे. अर्थात, या भेटीनंतरही पाकिस्तानने आपल्या कारवाया सुरूच ठेवल्या आणि रविवारी पहाटेच ‘सीआरपीएफ’च्या तळावर हल्ला चढवला. एकीकडे अशा रीतीने परस्परविसंगत घटनांची मालिका सुरू असतानाच, काश्‍मिरी तरुणांचा पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी संघटनांकडे असलेला ओढा कमी होत चालल्याचा भारतीय अधिकाऱ्यांचा दावा किती फसवा आहे, तेच यामुळे स्पष्ट होत आहे. त्यासाठी भारतीय लष्करावर होणाऱ्या दगडफेकींच्या संख्येत कशी घट झाली आहे, त्याची आकडेवारी दिली जात आहे. त्यात तथ्य असेलही; मात्र त्यामुळे पाकिस्तानी लष्कर व दहशतवादी संघटनांच्या कारवायांकडे डोळेझाक करून चालणार नाही. सुदैवाने स्वराज यांनी या घटना गांभीर्याने घेतल्या असून, सीमेवर सातत्याने होणाऱ्या चकमकी, तसेच पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवादी यांची घुसखोरी बघता पाकिस्तानबरोबर क्रिकेट सामने आयोजित करता येणे अवघड असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये एकीकडे सीमेवर तणावाचे वातावरण असताना आणि पाकिस्तानच्या कारवायांमध्ये रोज भारतीय जवान हुतात्मा होत असताना, खरे तर क्रिकेटच्या मैदानावरील आणखी एका ‘युद्धा’चा विचारही होता कामा नये. एकंदरीतच नव्या वर्षातही शेजारी देशाची खुमखुमी ही आपल्यासाठी मोठीच डोकेदुखी ठरणार, हाच या साऱ्याचा अर्थ आहे.

Web Title: editorial jammu kashmir terrorist crpf attack