नैतिकतेच्या ठेकेदारांना चपराक

marriage file photo
marriage file photo

प्रेम कधी कोणाचे कोणावर बसेल आणि जन्मजन्मांतरीच्या गाठी जुळतील, ते सांगता येणे कठीण आहे. मात्र एकविसाव्या शतकात भारतात असे प्रेम करण्यावर स्वत:ला समाजाच्या सद्‌सदविवेकबुद्धीचे राखणदार समजणाऱ्यांनी अनेक बंधने घातलेली आहेत. विवाह हा सगोत्रच झाला पाहिजे आणि त्यास जात-धर्म यांची सीमारेषा असली पाहिजे, असे आजही अनेक जण मानतात. त्यामुळे त्याविरोधात जाऊन आपल्या प्रेमाची पूर्तता करणाऱ्यांना जात-पंचायतीचे तथाकथित नियम पायदळी तुडविल्याबद्दल ‘सन्मानाचा अपमान’ झाल्याचा आरोप ठेवून देहदंडाची शिक्षाही फर्मावणाऱ्या ‘खाप’सारख्या जात-पंचायती आहेत. असे वर्तन करणाऱ्यांमध्ये स्वत:ला सुशिक्षित म्हणवून घेणाऱ्या ‘उच्चभ्रू’ वर्गातील लोकही सामील असतात, असे वारंवार दिसले आहे. मात्र अशी मनमानी करणाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने सणसणीत चपराक लगावली असून, कोणत्याही दोन सज्ञान व्यक्‍तींनी सहमतीने केलेला विवाह हा कायदेशीर असल्याचा निर्वाळा दिला आहे. कोणताही विवाह हा कायदेशीर आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार न्यायालयाला आहे, खाप पंचायतींना नाही, असे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने स्पष्ट केल्यामुळे आता तरी या तथाकथित पंचायतींना चाप बसेल, अशी आशा आहे. नवी दिल्लीत गेल्याच आठवड्यात अंकित सक्‍सेना याने आंतरजातीय विवाह केल्याबद्दल त्याच्या प्रेयसीच्या कुटुंबीयांनी त्याची गळा चिरून हत्या केली. या पार्श्‍वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने घेतलेली ही भूमिका प्रेमीजनांना दिलासा देणारी तर आहेच, शिवाय त्यामुळे सज्ञान युवक-युवतींच्या सहमतीच्या हक्‍कावर शिक्‍कामोर्तबही झाले आहे. अर्थात, या प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी ‘सगोत्र विवाहा’च्या विरोधात खाप पंचायतीतर्फे बराच बाष्कळ युक्‍तिवाद केला गेला; पण न्यायालयाने तो फेटाळून लावला. प्रेमप्रकरणांतून होणारे सगळेच विवाह हे सगोत्र नसतात आणि बहुतेक वेळा ते आंतरजातीय असतात आणि त्यातील वैमनस्यातून मग त्याविरोधात काही केले जाते, असे दाखवून देण्याचा प्रयत्न या वेळी स्वत:ला पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या मधू किश्‍वर यांनी केला. मात्र न्यायालयाने हा दावा फेटाळून लावताना, आपल्याला वैयक्‍तिक स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये स्वारस्य नसल्याचे तर स्पष्ट केलेच; शिवाय अशा विवाहांमुळे उद्‌भवणाऱ्या कायदा-सुव्यवस्था परिस्थितीची दखल घेण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय समिती नेमण्याचा मनोदयही जाहीर केला. मात्र पोलिसच ‘कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ’ होऊ नये म्हणजे मिळवले!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com